वारंवार फोन करत त्रास दिल्याने महिलेकडून तरूणाचे अपहरण; त्यासाठी गाठले 360 किमी अंतर
फोन कॉल का करत होता? हा राग मनात धरत एका महिलेने आपल्या साथीदारांसह तब्बल 360 किलोमीटर अंतर गाठत एका तरुणाचे अपहरण केले
नाशिक : ऐकावे ते नवलच.. वारंवार फोन करत असल्याचा राग मनात धरत एका महिलेने आपल्या साथीदारांसह तब्बल 360 किलोमीटर अंतर गाठत एका तरुणाचे अपहरण केले आणि त्याला मारहाण केली. विशेष म्हणजे त्याचे मुंडनही केले. धुळे जिल्ह्यात ही घटना घडली आहे
पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या मोबाईलवर वारंवार एका मोबाईल क्रमांकावरुन एका तरुणाचे फोन येत होते. या महिलेने संबंधित प्रकार आपल्या मैत्रीण आणि तिच्या पतीला सांगताच त्यांनी मोबाईल क्रमांकावरून सदरील तरुणाचा नाव आणि पत्ता मिळवला. 30 जूनला पहाटे महिलेसह चौघांनी चारचाकीने थेट 360 किलोमीटर अंतर कापत धुळे जिल्ह्यातील नाना शिताना तांडा गाठले. या वस्तीवर राहणाऱ्या विलास मलकान चव्हाण या अठरा वर्षीय युवकाला घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याचे अपहरण करत त्याला बळजबरी आपल्या चारचाकीमध्ये बसवत हे सर्व जण पुण्याच्या दिशेने निघाले. विशेष म्हणजे मारहाणीवरच न थांबता या पाचही जणांनी विलासला नाशिकमधील फुलेनगर परिसरात असलेल्या एका सलून दुकानात नेत तिथे सलून चालकाकडून चक्क त्याचे मुंडन करून घेतले. सलून दुकानात राडा सुरु असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे पथक काही मिनिटात येथे दाखल झाले आणि त्यांनी या पाचही जणांना ताब्यात घेत विलासची त्यांच्या ताब्यातून सुखरूपपणे सुटका केली.
विलास चव्हाणने पंचवटी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार पुण्यातील सोनाली निंबाळकर, जयसिंग कौर तेजींदरसिंह छाबडा, निलेश जाधव, राहुल निंबाळकर आणि सागर गायकवाड या पाचही जणांविरोधात बळजबरीने घरात प्रवेश करणे, अपहरण, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. छावा संघटनेशी आम्ही संबंधित असल्याचं सांगत आरोपींकडून पोलिसांवर दबाव टाकला जात होता मात्र पोलिसांनी कुठल्या दबावाला बळी न पडता ही कारवाई केली.
दरम्यान संबंधित महिलेला विलास फोन कॉल का करत होता ? त्याचा हेतू नक्की काय होता याबाबतही पोलिस तपास करत आहे. विलास हा गरीब कुटुंबातील आहे तसेच त्याचे शिक्षणही कमी असल्याची माहिती पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी एबीपी माझाला दिली आहे.
एकंदरीतच काय तर तर फोन कॉल्स बाबत महिलेने कायदेशीर मार्ग अवलंबला असला तर न्याय नक्कीच मिळाला असता. मात्र बेकायदेशीर मार्ग अवलंबून कायदा हातात घेणं महिलेसह तिच्या साथीदारांना चांगलंच महागात पडलय. एका 18 वर्षीय तरुणाला जबर मारहाण करुन त्याचे अशाप्रकारे अपहरणही केले जात असतांना धुळे पोलिस काय करत होते ? एखादी मोठी दुर्घटना होण्याची ते वाट बघत होते का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या संपूर्ण घटनेमुळे नाना शिताना तांडा गावात संतापाची लाट उसळली आहे.