अवकाळीनं घेरलं! पावसामुळं द्राक्ष मातीमोल, भातासह अनेक पिकांना फटका, पॅकेज जाहीर करण्याची मागणी
Unseasonal Rain in Maharashtra Update : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा ग्रामीण महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने हजेरी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलं आहे.
Unseasonal Rain in Maharashtra Update : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा ग्रामीण महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. राज्यात मागील दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलं आहे. अजूनही काही भागात पावसाची शक्यता कायम असल्यानं संकटाचे ढग बळीराजावर कायम आहेत.
हिंगोलीत ढगाळ वातावरणामुळे शेतकरी संकटात
राज्यात मागील दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलं आहे. अजूनही पावसाची शक्यता कायम आहे. या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाला आहे गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यातील थंडी गायब झाली आहे त्यामुळे या ढगाळ वातावरणाचा परिणाम हा शेतीवर मोठ्या प्रमाणात होणार आहे हरभरा तूर कापूस गहू ज्वारी यासारख्या पिकावर या ढगाळ वातावरणाचा परिणाम होणार आहे त्यामुळे शेतकरी संकटात आढळला आहे नेहमीच शेतकऱ्यांना कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटाचा सामना करावा लागतोय कधी जोरदार पाऊस कधी अवकाळी पाऊस तर कधी महावितरणने पेरणीच्या तोंडावरच लाईट बंद केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एकदा अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहे.
द्राक्ष बागायतदारांना विशेष मदत पॅकेज जाहीर करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे अवकाळी पावसाने 75 ते 80 हजार एकरावरील घडकुजीने नुकसान झाले आहे. सदर नुकसान सुमारे साडे तीन हजार कोटींचे आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांसाठी विशेष मदत पॅकेजची घोषणा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. सांगली जिल्ह्यात तासगाव, मिरज, पलूस, वाळवा, जत, खानापूर आणि कवठेमहांकाळ या तालुक्यात सुमारे लाख ते सव्वा लाख अकरावर द्राक्ष शेती केली जाते. ही शेती शासनाच्या मदतीशिवाय शेतकऱ्यांनी स्वबळावर वाढविली, फुलविली आहे. मात्र गत दोन वर्षे कोरोनामुळे द्राक्ष शेतीला फटका बसला. यंदा हंगाम चांगला जाईल असे वाटत असतानाच गेल्या आठवड्यात अवकाळीने फटका बसला. त्यात पुन्हा या आठवड्यात अवकाळीने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना अक्षरशः झोपवलेय. बागांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. ऑक्टोबर महिन्यात छाटणी घेण्याचे प्रमाण 75 ते 80 टक्के आहे. या महिन्यात छाटणी केलेल्या सर्व बागा फ्लोअरिंग अवस्थेत आहेत. या अवस्थेत पाऊस पडला तर पाणी त्यात जावून संपूर्ण घडाची कुज होते, तशी कुज सर्व 75 ते 80 हजार एकर वरील बागाची झाली आहे. तरी पाच लाखाचे उत्पन्न गृहीत धरले तर 75 ते 80 हजार एकर वरील नुकसानीचा आकडा साडे तीन चार हजार कोटींवर जातो. संपूर्ण बागांचे नुकसान झाले आहे. औषध फवारणीसाठीही प्रचंड खर्च होत आहे, यातून द्राक्ष बागायतदार वाचणे अशक्य आहे. त्यामुळेच द्राक्ष शेती आणि शेतकरी वाचविण्यासाठी या नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे करा पण पंचनामे करून शासन जी मदत जाहीर करेल ती मदत तुटपुंजी असते. त्या मदतीतून एका फवारणीचा खर्च ही भागत नाही. त्यामुळे द्राक्ष शेतीला लागणारा भांडवली खर्च पाहता मदत सुद्धा भरीव करण्याची आवश्यकता आहे. द्राक्ष शेतीतून देशाला दरवर्षी द्राक्ष, बेदाणा निर्यातीतून 2 हजार कोटींचे परकीय चलन मिळते. परकीय चलन मिळवून देणारी शेती अडचणीत असताना शासनाने विशेष मदतीचे पॅकेज जाहीर करावे किंवा द्राक्ष पीक विमा योजनेची मुदत संपलेली आहे ती वाढवून त्यातून शेतकऱ्यांना काही हातभार लावता येतोय का हे पाहावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.
तळकोकणातील भाताचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट
सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील सर्वाधिक भातचं उत्पन्न घेणारा जिल्हा म्हणून नावारूपाला आला आहे. मात्र आता याचं जिल्ह्यात अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं केलंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. भात कापणी शेवटच्या टप्प्यात असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा घात केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाताचं उत्पन्न घेणारे शेतकरी संकटात सापडले आहेत. वर्षभराची जमापुंजी ही भातशेतवर अवलंबून असते. मात्र आता अवकाळी पावसाने हिरावून घेतल्यानंतर खायचं काय आणि जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. गेले सात महिने सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. भात पाण्यात गेल्याने भाताला कोंब आले आहेत तर गवत कुजून गेलं. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. भात तर वाया गेला आहेच मात्र गवत कुजल्याने चारा नसल्याने जनावरांचे हाल होणार आहेत.