Pune international film festival : 22 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून सुरुवात; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन
22 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या महोत्सवाचं (पीफ) उद्घाटन 18 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

पुणे : 22 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार (Pune international film festival)आहे. या महोत्सवाचं (पीफ) उद्घाटन 18 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे, असं महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.
गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. सदाबहार अभिनेते देव आनंद (26 सप्टेंबर 1923 ), गायक मुकेश (22 जुलै 1923), दिग्दर्शक मृणाल सेन (14 मे 1923), प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक एनटीआर (28मे 1923), संगीत दिग्दर्शक सलिल चौधरी (19नोव्हेंबर 1923) आणि गीतकार शैलेन्द्र (30ऑगस्ट 1923) यांचे जन्मशताब्दी वर्ष ‘पिफ’ साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे सचिव विकास खार्गे, ‘फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, विविध देशांचे कॉन्सूल जनरल आणि महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय ज्यूरीं उपस्थित राहणार आहेत.
यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रसिद्ध रेडीओ उद्घोषक अमिन सयानी, दिग्दर्शक-अभिनेते गौतम घोष आणि प्रसिद्ध नृत्यांगना-अभिनेत्री लीला गांधी यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’, तर संगीत संयोजक, गायक आणि गीतकार एम. एम. कीरवानी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे डॉ, जब्बार पटेल यांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘अ ब्रायटर टुमारो’ (इटली, दिग्दर्शक – नानी मोरेत्ती) हा उद्घाटनाचा चित्रपट (ओपनिंग फिल्म) दाखवण्यात येणार आहे.
18 ते 25 जानेवारी दरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२४’ होत आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (6 स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (3 स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपट गृहात (2 स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण 11 स्क्रीनवर चित्रपट दाखविले जाणार आहेत. महोत्सवासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू असून, चित्रपटगृहांवर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सुरू आहे. रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठी नोंदणी शुल्क रुपये 800 फक्त आहे.
विविध विषयांवर मास्टर क्लास
या महोत्सवात विकास खार्गे, अविनाश ढाकणे, जानू बरुआ, शाई गोल्डमन, मनोज वाजपेयी यांचे विविध विषयांवर मास्टर क्लास होणार आहेत. ‘नव्या मराठी सिनेमाच्या शोधात’ या विषयावर परिसंवाद होणार असून, त्यामध्ये निखिल महाजन, वरून नार्वेकर, रितेश देशमुख, मंगेश देसाई आणि संजय कृष्णाजी पाटील सहभागी होणार आहेत. तसेच चित्रपट महोत्सवांचे भविष्य आणि महत्त्व या विषयावरील परिसंवादामध्ये सैबल चटर्जी, बीना पॉल, एडवीनास पुकास्ता सहभागी होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
