Maharashtra Breaking News 02 June 2022 : महाराष्ट्र एटीएसने जम्मू-काश्मीरमधून एका आरोपीला अटक केली
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
गायक केकेच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
कोलकातामधील कॉन्सर्टनंतर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर निधन झालेल्या गायक केके यांचं पार्थिव काल मुंबईत आणण्यात आलं. आज मुंबईतल्या वर्सोवा इथल्या स्मशानभूमीत केकेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. केकेला अखेरचा निरोप देण्यासाठी आज अख्खं बॉलिवूड येण्याची शक्यता आहे.
अवघ्या तरुणाईला प्रेम व्यक्त करायला शिकवणारा आवाज, प्रेम भंग झालेल्यांना आधार देणारा आवाज अशी केके यांची ओळख होती. केके यांनी बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत. 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील 'तडप तडप के इस दिल से' हे त्यांचं गाणं लोकप्रिय झालं होतं. 'खुदा जाने' सारखे रोमँटिक गाणे, 'इट्स द टाइम टू डिस्को' आणि 'कोई कहे कहता रहे' सारखे डान्स नंबर्स तसेच 'तडप तडप के इस दिल से' सारखी गाणी आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.
साकिनाका प्रकरणातल्या आरोपीला आज शिक्षा सुनावण्यात येणार
साकिनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. आरोपी मोहन चौहानला फाशी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. त्यावर दिंडोशी न्यायालय आज शिक्षा सुनावणार आहे. 10 सप्टेंबर 2021 रोजी एका 20 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात येवून तिच्यावर निर्घृण हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
केंद्र आणि राज्यामध्ये जीएसटी वाद, अजित पवार आज उत्तर देणार
केंद्र सरकारने राज्याचा थकीत जीएसटी दिला की नाही यावर नेमकं उत्तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार देणार आहेत.केंद्र सरकारने नुकतंच प्रसिध्दीपत्रक काढून महाराष्ट्र सरकारचा थकीत जीएसटीची रक्कम दिल्याचा दावा केला आहे.त्यानुसार आता तत्काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करा असं देखील म्हटल आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनही 14 हजार कोटी रुपये जीएसटी येणे बाकी आहे असं म्हंटल आहे. यावरून आता केंद्र विरूद्ध राज्य सरकारचा वादाचा नवा अंक सुरु झाला आहे.
कॉंग्रेसच्या नवसंकल्प शिबिराचा आज दुसरा दिवस
उदयपूर येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिंतन शिबिरानंतर काँग्रेसने राज्यात शिबिर आयोजित केलं आहे.या शिबिरात उदयपूर शिबिरातील धोरणांची अमलबजावणी करण्याचे प्रस्ताव पास केले जाणार आहेत. दोन पदांवर असलेले विविध पदाधिकारी एका पदाचा राजीनामा देणार असून एक व्यक्ती एक पद या सूत्राची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. काँग्रेसचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. आगामी काळात काँग्रेसचे जिल्हानिहाय एक दिवसीय चिंतन शिबिर होणार असून प्रत्येक जिल्ह्यातून 75 किलोमीटरची पदयात्राही काढली जाणार आहे.
पुणतांबा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस
पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू करत पाच दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. आज कांदा तसेच मोफत फळे वाटून सरकारचा निषेध केला जाणार आहे. पाशा पटेल आज आंदोलकांची भेट घेण्याची शक्यता आहे.
आजपासून सहा आरटीओ सेवा ऑनलाईन होणार
आजपासून सहाआरटीओ सेवा ऑनलाइन होणार आहे. परिवहन विभागच्या वतीने सहा फेसलेस सेवांचा शुभारंभ होणार आहे. लायसन्स रीन्युअल, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स, लायसन्स वरील पत्ता बदलणे, लायसन्स ट्रान्सफर करण्यासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, डुप्लिकेट आरसी बुक, आरसी बुकवरील पत्ता बदलणे या सेवांसाठी आता आरटीओ कार्यालयात चकरा मारायची किंवा अर्ज करण्याची गरज नसणार आहे. कारण आता या सर्व सेवा आजपासून ऑनलाइन सुरू केल्या जाणार आहे. यासाठी फोर्ट येथील परिवहन आयुक्त कार्यालयात या सुविधांच्या शुभारंभाचा कार्यक्रम होणार असून यासाठी परिवहन मंत्री अनिल परब सोबत परिवहन आयुक्त उपस्थित राहणार आहेत.
हार्दिक पटेल आज भाजपात प्रवेश करणार
गुजरात कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल आज सकाळी 11 वाजता भाजपात प्रवेश करणार आहे. कॉंग्रेसवर नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता आणि भाजपमध्ये प्रवेशाचे संकेत दिले होते. 18 मे रोजी हार्दिक पटेल यांनी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.2015 मध्ये पाटीदारांसाठी आरक्षणाच्या मागणीसाठी पटेलांच्या आंदोलनामुळे हार्दिक पटेल सर्वांना माहिती झाला. 2019 मध्ये हार्दिकने कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. 11 जुलै 2020 पासून त्यांच्याकडे गुजरात कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष होती.
हनुमान जन्म स्थळावरून नवा वाद
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कूर्मगाव उर्फ कुगाव हे हनुमानाचे जन्म ठिकाण असल्याचा दावा कुगाव ग्रामस्थांनी केला आहे. यासाठी त्यांनी पद्म पुरणावरून आलेला ग्रंथ भीमा महात्म्य या पुराण ग्रंथाचा आधार दिला आहे. भीमा नदीच्या तीरावर तपश्चर्या करणाऱ्या अंजनी मातेला इथे प्रसाद मिळाला, हनुमंताचा जन्म इथे झाल्याचा दावा महंत बल्लाळ आणि अभ्यासक दयानंद कोकरे यांनी केला आहे. नाशिक येथे झालेल्या धर्म सभेत बल्लाळ यांनी पुराव्यासह ही बाजू मांडली आहे. आता भारतीय पुरातत्व विभागाने कुगाव येथे येऊन अभ्यास करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.भीमा महात्म्य ग्रंथात दिलेले इतर सर्व देवस्थानचे दावे हे मोठे पुरावे असल्याचे सांगितले आहे. हनुमंताचे येथील पुरातन मंदिर उजनी जलाशयात वेल्यावर तेथील मूर्ती आणि दगडवर आणून नवीन मंदिर उभारले आहे.
पॉलिटेक्निक प्रवेशाला आजपासून सुरूवात, विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दहावी निकलाआधी भरता येणार
पॉलिटेक्निक प्रवेशाला आजपासून सुरूवात, विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दहावी निकलाआधी भरता येणार
आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षाला कुठल्याही शाखेत प्रवेश मिळणार
विद्यापीठांच्या परीक्षा या ऑनलाईनच होणार, ऑफलाइन परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांनी मानसिकता करावी :उदय सामंत
महाराष्ट्र एटीएसने जम्मू-काश्मीरमधून एका आरोपीला अटक केली
हाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने भारतातील LET ऑपरेटिव्हविरुद्ध मोठ्या कारवाईत जम्मू-काश्मीरमधील एका 30 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आफताब हुसैन शाह हा पुण्यातून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद जुनैदच्या संपर्कात होता आणि परदेशातील एलईटी ऑपरेटरच्या संपर्कात होता. एटीएस अधिकारी त्याची भूमिका आणि सहभाग तपासत आहेत.
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; जेष्ठ नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक : डॉक्टर प्रदीप आवटे
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढू लागली आहे. नव्या व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग वाढतो आहे. त्यामुळे कोमोरबीडीटी आणि जेष्ठ नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आवश्यक वाटल्यास निर्बंध येण्याची शक्यता आहे, असे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे म्हणाले आहेत.
Mumbai : दारूच्या नशेत मारामारी करणाऱ्या तीन नौदल जवानांना अटक
दारुच्या नशेत मारामारी करणाऱ्या तीन नौदल जवानांना अटक करण्याात आली आहे. एमआरए मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फोर्ट परिसरातल्या राजदूत वाईन्स परिसरात दारू खरेदी करताना ही घटना घडली आहे. तीन नौदल जवानांनी वादातून एकाला जबर मारहाण केली. मारहाण झालेल्या व्यक्तीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या तीनही नौदल जवानांना रिमांडसाठी बलार्ड इस्टेट मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आलं.
चंद्रपुर जिल्ह्यात आज पाच नवीन कोरोना बाधितांची नोंद
चंद्रपुर जिल्ह्यात आज पाच नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.