Maharashtra Incom Tax Raid : 'सरकारी पाहुण्यांचा' मुक्काम वाढला; अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांची सलग चौथ्या दिवशी 'आयकर'कडून चौकशी
Maharashtra Incom Tax Raid : आज सलग चौथ्या दिवशीही अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या काही कंपन्या आणि कारखान्यांवर आयकर विभागाचं धाड सत्र सुरु आहे.
Maharashtra Incom Tax Raid : अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या काही कंपन्या आणि कारखान्यांची आयकर विभागाकडून सुरु असलेली छापेमारी चौथ्या दिवशीही सुरुच आहे. तर काही कंपन्यांची चौकशी तूर्तास थांबवण्यात आली आहे. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याची चौकशीही आजही सुरु आहे. तर तिकडे बारामतीतल्या डायनामिक्स डेअरीतही सलग चौथ्या दिवशी आयकर विभागाचे अधिकारी ठाण मांडून बसलेत. दरम्यान अजित पवारांच्या दोन बहिणी डॉ. रजनी इंदुलकर आणि नीता पाटील यांच्या घरी आयकर विभागानं सुरु केलेली चौकशी थांबवण्यात आली आहे. पार्थ पवारांचे निकटवर्तीय सचिन शिंगारेंचा कारखाना आयान मल्टीट्रेडसंदर्भात देखील आयकरनं चौकशी तूर्तास थांबवली आहे. तर अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतल्या कार्यालयावर छापेमारी सुरु केली आहे. त्यांच्या श्री निर्मल कमर्शियल या कार्यालयात छापेमारी सुरु आहे.
पवारांशी संबंधित साखर कारखाने आणि संचालकांच्या घरी आयकर विभागाचं धाडसत्र
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स (Income tax) विभागाची कारवाई सुरु असल्याची माहिती आहे. दौंड शुगर ,आंबलिक शुगर , जरंडेश्वर साखर ,पुष्पदंतेश्वर शुगर,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरु असल्याची माहिती आहे. आयकर विभागाच्या वतीनं ही कारवाई करण्यात येत आहे. काही कारखान्यांवर आयकर विभागाची टीम पोहोचली आहे.
हे सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. राज्य सरकारच्या पोलिस यंत्रणेला कुठलीही कल्पना न देता सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू आहे. केंद्रीय यंत्रणांनी सकाळी सात वाजल्यापासून धाडीची कारवाई सुरु केली आहे. जरंडेश्वर कारखान्यात एक टीम दाखल झाली असल्याची माहिती आहे. तर अंबालिका साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जंगल वाघ यांच्या काटावाडीतील घरी तपास यंत्रणा पोहोचल्या आहेत. जंगल वाघ हे काटावाडीतील अजित पवारांच्या घराजवळच राहतात.
अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका कारखाना अजित पवारांच्या खाजगी मालकीचा आहे. त्याचबरोबर बारामतीतील डायनॅमिक्स डेअरीवर देखील छापा सुरु आहे. शरद पवारांशी संबंधित गोयंका कुटुंबीयाची आहे. या सर्व पवारांशी संबंधित संस्था असल्याची माहिती आहे.
अजित पवार काय म्हणाले?
आयकर विभागाने कुठे छापेमारी करावी हा त्यांचा निर्णय आहे. माझ्या संबंधित असलेल्या कंपन्यांचे सर्व कर वेळेवर भरले जातात. मी स्वत: अर्थमंत्री असल्यानं याची काळजी घेतो. आता ही रेड इन्कम टॅक्स विभागाने राजकीय हेतूपोटी टाकली याबाबत तेच सांगू शकतील. माझ्या नातेवाईकांच्या संबंधित कंपन्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. आता ते अजित पवारांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. याचं मला वाईट वाटतं, असं अजित पवार म्हणाले.
60 हून अधिक सहकारी साखर कारखान्यांना आयकर खात्याची नोटीस
राज्यातील सहकारी साखर कारखाने आधीच अडचणीत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील 60 हून अधिक सहकारी साखर कारखान्यांना आयकर खात्यानं सात हजार कोटी आयकर भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे. या सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या निर्धारित दरापेक्षा ऊस खरेदीसाठी दिलेली अधिकची रक्कम कारखान्याचा नफा आहे, असं करसूत्र लावून हा कर आकारण्यात आलं आहे. दुसरीकडे खासगी कारखान्यांना मात्र हे सूत्र न लावता त्याचा समावेश ऊस खरेदी खर्च सदरात केलं आहे. शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून सहकारी तत्त्वावरील केलेल्या चांगल्या प्रयत्नांना आयकर खात्याच्या या निर्णयामुळे फटका बसला आहे. हा मुद्दा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यापर्यंत नेला आहे.
अजितदादांकडे सरकारी पाहुणे आलेले, पाहुण्यांची आपल्याला चिंता नाही; धाडसत्रावर शरद पवारांचं भाष्य
पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबातच नसते, असं वक्तव्य शरद पवार यांनी आज सोलापुरातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना केलं. काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखाने आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागानं धाडी दिल्या. याबाबत बोलताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं.
शरद पवार म्हणाले की, "काल अजित पवारांकडे काही सरकारी पाहुणे पाठवले होते. ते पाहुणे येऊन गेले. पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबातच नसते." पुढे बोलताना ईडीची नोटीस पाठवणाऱ्यांना जनतेनं येडी ठरवलं, असंही शरद पवार म्हणालेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार यांना ईडीची नोटीस आली होती. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "तुम्हाला आठवतंय का? विधानसभा निवडणुकांपूर्वी बँकेच्या एका प्रकरणाबाबत मला ईडीची नोटीस पाठवली. त्या बँकेचा मी सभासद नव्हतो. त्या बँकेचं मी कधीही कर्ज आयुष्यात घेतलं नाही आणि असं असताना मला ईडीची नोटीस आली. मला त्यांनी ईडीची नोटीस दिली आणि संबंध महाराष्ट्राला भाजपनं येडी ठरवलं. आपल्याला नोटीस पाठवणाऱ्यांना जनतेनं मतपेटीच्या माध्यमातून येडी ठरवलं." तसेच पुढे बोलताना सत्तेचा गैरवापर करु नका, असा सल्लाही शरद पवारांनी भाजपला दिलाय. केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करुन कारवाया करतंय, अशी टीकाही शरद पवार यांनी यावेळी बोलताना केलीये.