Sharad Pawar at Solapur : अजितदादांकडे सरकारी पाहुणे आलेले, पाहुण्यांची आपल्याला चिंता नाही; धाडसत्रावर शरद पवारांचं भाष्य
Sharad Pawar at Solapur : काल अजित पवारांकडे काही सरकारी पाहुणे पाठवले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबातच नसते, असं शरद पवार यांनी धाडसत्राबाबत बोलताना स्पष्ट केलंय.
Sharad Pawar at Solapur : पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबातच नसते, असं वक्तव्य शरद पवार यांनी आज सोलापुरातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना केलं. काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखाने आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागानं धाडी दिल्या. याबाबत बोलताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं.
शरद पवार म्हणाले की, "काल अजित पवारांकडे काही सरकारी पाहुणे पाठवले होते. ते पाहुणे येऊन गेले. पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबातच नसते." पुढे बोलताना ईडीची नोटीस पाठवणाऱ्यांना जनतेनं येडी ठरवलं, असंही शरद पवार म्हणालेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार यांना ईडीची नोटीस आली होती. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "तुम्हाला आठवतंय का? विधानसभा निवडणुकांपूर्वी बँकेच्या एका प्रकरणाबाबत मला ईडीची नोटीस पाठवली. त्या बँकेचा मी सभासद नव्हतो. त्या बँकेचं मी कधीही कर्ज आयुष्यात घेतलं नाही आणि असं असताना मला ईडीची नोटीस आली. मला त्यांनी ईडीची नोटीस दिली आणि संबंध महाराष्ट्राला भाजपनं येडी ठरवलं. आपल्याला नोटीस पाठवणाऱ्यांना जनतेनं मतपेटीच्या माध्यमातून येडी ठरवलं." तसेच पुढे बोलताना सत्तेचा गैरवापर करु नका, असा सल्लाही शरद पवारांनी भाजपला दिलाय. केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करुन कारवाया करतंय, अशी टीकाही शरद पवार यांनी यावेळी बोलताना केलीये.
उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधील हिंसाचाराबाबत बोलताना आपण त्या हत्याकांडाची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली आणि म्हणूनच या धाडी पडल्यात असंही शरद पवार म्हणाले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाकही शरद पवारांनी यावेळी बोलताना दिली. तसेच भाजपविरोधातील या महाराष्ट्र बंदमध्ये शांततेत आणि कायद्याचं पालन करुन सहभागी व्हा, असं आवाहनंही शरद पवारांनी केलंय.
दरम्यान, सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर वक्तव्य केलं. उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये झालेला शेतकऱ्यांवरील हिंसाचार असेल, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी पडलेल्या आयकर विभागाच्या धाडसत्रावरही शरद पवारांनी या मेळाव्यात बोलताना टिप्पणी केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :