Bhiwandi : दंगली घडवण्याचे पाप आम्ही करत नसून खोटेनाटे आरोप खपवून घेणार नाही; कपिल पाटील यांचा सुरेश म्हात्रेंना थेट इशारा
एखाद्याला अजूनही विजय पचनी पडत नसेला तरी आपल्यावर कुठलेही खोटे आरोप केल्यास ते सहन करणार नाही, असा थेट इशारा कपिल पाटील यांनी सुरेश म्हात्रेंना दिला असून मी कठोर कारवाई करणार असल्याचेही सांगितलंय.
Bhiwandi Lok Sabha Election ठाणे : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे संत संमेलन हिंदू धर्मसभेचे आयोजन शनिवारी सायंकाळी करण्यात आले असून या सभेस तेलंगणा येथील आमदार टी राजा सिंह उपस्थित राहणार आहेत. या सभेवरून विद्यमान खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे (Suresh Mhatre) यांनी माजी खासदार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांच्यावर आरोप केले आहे. यात त्यांनी म्हटले होते की, बकरी ईदीच्या पार्श्वभूमी वर ही सभा होऊ द्यायला नको होती असे सांगत कपिल पाटील यांना भिवंडीत दंगली घडवायच्या आहेत का? असा प्रश्न उपस्थतीत करत खासदार बाळ्या मामा यांनी आरोप केले आहेत.
या आरोपांना माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उत्तर दिले असून नवीन नवीन खासदार झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते, असे सांगत धर्मसभा संमेलनसाठी येणारे टी राजा सिंह यापूर्वी 2015 मध्ये भिवंडी शहरात आले होते. त्यावेळेस तर मी लोकप्रतिनिधी होतो. मी सत्तेत असताना कोणती ही दंगल घडली नव्हती, आम्ही दंगल घडवणाऱ्यांपैकी नव्हे. तर प्रत्येकाला आपल्या जातीचा, धर्मचा अभिमान असला पाहिजे. परंतु तो प्रत्येकाने आपल्या पूर्ती मर्यादित ठेवला पाहिजे. समाजामध्ये वावरताना आपण भारतीय आहोत याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. एखाद्याला अजून विजय पचनी पडत नसेल तर त्याला आपण काय करणार. असे म्हणत यापुढे आपल्यावर कुठलेही खोटे आरोप केल्यास ते सहन करणार नाही, असा थेट इशारा कपिल पाटील यांनी दिला आहे.
सुरेश म्हात्रेंविरुद्ध मानहानीचा खटला भरणार - कपिल पाटील
भिवंडी शहरातील कोणताही मुस्लिम बांधव माझ्या बाबतीत असं वक्तव्य करणार नाही. दहा वर्षाच्या कार्यकाळात सर्व जाती धर्माच्या बहुजन समाजाच्या दलित, आदिवासी सर्व समाजासाठी काम केलं. मला वाटतं भविष्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी असे विधान केलं असेल, ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाची दिशाभूल करीत त्यांना एकत्र येऊन मतदान करण्यास भाग पाडलं. तशीच परिस्थिती विधानसभेत करण्याची विरोधकांची खेळी दिसून येत आहे, असा आरोप करीत उद्धव ठाकरे यांनी यांची दखल घेतली पाहिजे.
अशा पद्धतीचे वक्तव्य ते खपवून घेणार आहेत का, ज्या शिवसैनिकांनी भिवंडी लोकसभा निवडणुकीत त्यांना मतदान केलं त्यांना हे पटणार आहे का? ही भूमिका त्यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे. यापुढे आपल्यावर कोणतेही खोटेनाटे आरोप केलेले आपण खपवून घेणार नसून लवकरच त्यांना कायदेशीर नोटीस बजावून त्यांच्या विरुद्ध मानहानीचा खटला भरणार असल्याचा इशाराही कपिल पाटील यांनी शेवटी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या