Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा अत्यंत आक्रमक पवित्रा घेत हत्या प्रकरणातील आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना सुद्धा बेड्या ठोकाव्यात अशी मागणी केली आहे.
Manoj Jarange Patil : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृ हत्या करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. एका निष्पाप सरपंचाची अपहरण करून 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आल्यानंतर पहिल्यांदा त्या गावामध्ये या घटनेविरोधात आवाज उठवण्यात आला. त्यानंतर या घटनेचे लोन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले. या घटनेनंतर राज्यामध्ये संतापाचा उद्रेक झाला असून आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत आरोपांची राळ उडवून दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार बीड जिल्ह्याचा खंडणीखोर वाल्मीक कराड असल्याचा आरोप होत असून तो मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय मानला जातो. त्यांचा व्यावसायिक भागीदार असल्याचा सुद्धा आरोप होत असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सात बाराच समोर आणला होता. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे सर्वाधिक अडचणीमध्ये आले आहेत.
जरांगे पाटील यांचे कट्टर विरोधक एकवटले
धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून बाजूला करणे शक्य नसलं, तरी त्यांना बिनखात्याचे मंत्री करावे अशी मागणीच बीड जिल्ह्यातील नेत्यांकडून तसेच राज्यातील विरोधी नेत्यांकडून होत आहे. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा अत्यंत आक्रमक पवित्रा घेत हत्या प्रकरणातील आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना सुद्धा बेड्या ठोकाव्यात अशी मागणी केली आहे. जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुद्धा अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे यांनी देशमुख कुटुंबियांना धमक्या कसल्या देता? अशी विचारणा करत जर कोणी त्यांना धमक्या दिल्या तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा दिला होता. यानंतर आता जरांगे पाटील यांचे कट्टर विरोधक सुद्धा एकवटले आहेत. गुणरत्न सदावर्ते, लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्या याच वक्तव्यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
24 तासांमध्ये तीन गुन्हे जरांगे पाटील यांच्या विरोधात दाखल
जरांगे पाटील यांनी केलेल्या आक्रमक वक्तव्याविरोधात बीड जिल्ह्यात त्यांच्या विरोधात गुंदे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मागील 24 तासांमध्ये तीन गुन्हे जरांगे पाटील यांच्या विरोधात नोंदवण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील परळी शिवाजीनगर आणि आंबेजोगाई या पोलिस स्टेशनमध्ये जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर धनंजय मुंडे समर्थकांनी थेट गुणरत्न सदावर्ते यांना व्हिडिओ कॉल करत जरांगे पाटील यांना तडीपार करा अशी मागणी केली. त्यामुळे आता निष्पाप सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी नेते एकवटले असतानाच मनोज जारंगे पाटील यांचे विरोधक सुद्धा त्यांच्या विरोधात एकवटले आहेत. विशेष करून गुणरत्न सदावर्ते आणि लक्ष्मण हाके सर्वाधिक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलत आहेत. जरांगे घुसायची भाषा आम्हाला करू नका. तुमच्यात दम असेल तर कुठे घुसायचं ते सांगा, अशी चितवणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा. अन्यथा दोन समाजात अराजकता निर्माण होईल असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सुरेश धस यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध करताना जरांगे पाटील यांच्यावरही टीका डागली आहे.
बीडमधील घटनेनंतर राज्यपातळीवरील नेते आरोपींना कठोरातील कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही मागणी करत असतानाच लक्ष्मण हाके, सदावर्ते यांनी मात्र जरांगे पाटील यांच्या विरोधात मोर्चा खोलल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षण आंदोलन सुरू असतानाही लक्ष्मण हाके यांच्याकडूनही उपोषण करण्यात आले. सदावर्ते यांनी न्यायालयीन मार्ग निवडला होता. दुसरीकडे आमदार सुरेश धस यांच्यावरती सुद्धा आरोप होत आहेत. ते मंत्रिपदासाठी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे. मात्र सुरेश धस यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ
दुसरीकडे, या प्रकरणामध्ये सातत्याने आक्रमक भूमिका घेतलेल्या सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सुद्धा बीड प्रकरणांमध्ये पोलखोल करताना हवेत गोळीबार करणाऱ्यांचे फोटो समोर आणले होते, तसेच अनेकांकडे परवाने सुद्धा नसल्याचे दाखवून दिले होते. त्यांनी सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये ठिय्या मांडला होता. मात्र, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. अत्यंत अश्लील भाषेमध्ये टीका होत असल्याचा आरोपही त्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी धमकी देणाऱ्यांची नावे सुद्धा जाहीरपणे सांगितली. त्यांनी यासंदर्भात पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या