Sangli News : वन विभागाच्या विमा नसलेल्या गाडीने झालेल्या अपघातात संसार उघड्यावर, 'त्या' कुटुंबाला विशेष बाब म्हणून मदत करणार; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा
Sangli News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामधील तडवळे गावात वन विभागाच्या विमा नसलेल्या गाडीने चार वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात उद्धवस्त झालेल्या संसाराला दिलासा मिळाला आहे.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामधील तडवळे गावात वन विभागाच्या विमा नसलेल्या गाडीने चार वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात उद्धवस्त झालेल्या संसाराला दिलासा मिळाला आहे. एबीपी माझाच्या वेबसाईटवर याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अपघातग्रस्त कुटुंबाला विशेष बाब म्हणून मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी एबीपी माझाने पाठपुरावा केला होता.
आटपाडी तालुक्यातील तडवळे गावच्या गटकुळे कुटूंबातील पती, चिमुकली गमावलेली महिला मदतीच्या प्रतीक्षेत होती. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, विमा काढण्याची जबाबदारी असलेला अधिकारी निलंबित करण्यात आला आहे. जो RFO अपघाताला जबाबदार आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गाडीचा विमा काढण्याची जबाबदारी ही त्याच्याकडेच होती.
ते पुढे म्हणाले, परंतु विशेष बाब म्हणून या कुटुंबाला मदत करण्यासाठी विभागामार्फत एक प्रस्ताव तयार केला आहे. मुख्यमंत्री निधीतून या प्रकरणात मदत करावी यासाठी प्रयत्न करणार आहे. या प्रकरणात दोन जणांचा मृत्यू झाला असून कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. या कुटुंबाची चूक नाही त्यासंबंधीत RFO ची चूक आहे. विमा नसलेली वाहन रस्त्यावर असतील, तर याबद्दल धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. मी सर्व विभागाचा निर्णय घेऊ शकत नाही परंतु माझ्या विभागापुरते तरी मी निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री मोठ्या मनाचे आहेत. या आधी अनेक प्रकरणात त्यांनी विशेष बाब मधून मदत केली आहे. या प्रकरणातही ती करतील अशी अपेक्षा आहे. एबीपी माझाने हा प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद.
चार वर्षांपूर्वी भीषण अपघात
या भीषण अपघाताची घटना 12 नोव्हेंबर 2018 मध्ये घडली होती. अपघातात आटपाडी तालुक्यातील तडवळे गावचे अनिल धर्मदास गटकुळे आणि अवनी गटकुळे ही चिमुकली ठार झाली. पत्नी सीमा या गंभीर जखमी झाल्या. या अपघाताला जबाबदार होते ते सांगली वन विभागातील विटा विभागातील वन विभागाचे वाहन आणि तेथील वनक्षेत्रपाल सागर मगर. चालक असतानाही या वनक्षेत्रपालाने वाहन चालवायला घेतले होते आणि वाहनावरचा ताबा सुटल्याने दुचाकीवरील तिघांना उडवले. त्या वन विभागाच्या वाहनाचा विमा देखील वन विभागाने न उतरवल्याने अपघातग्रस्त कुटूंबाला मदत मिळू शकली नाही. यामुळे एकीकडे सीमा याचा संसार उद्धवस्त झाला आणि दुसरीकडे अनिल यांच्या आई, मुलासह जगण्याचा संघर्ष करावा लागत आहे, आजही तो अपघाताचा क्षण आठवला की भीती वाटते असे अनिल यांची पत्नी सीमा सांगतात.
इतर महत्वाच्या बातम्या