सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखवल्या रक्ताच्या बोगस चाचण्या, कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात (Solapur Government Hospital) बोगस रक्त चाचण्या दाखवून कोट्यावधी रुपयांची बिलं उचलल्याचा आरोप होत आहे.
सोलापूर : सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात (Solapur Government Hospital) बोगस रक्त चाचण्या दाखवून कोट्यावधी रुपयांची बिलं उचलल्याचा आरोप होत आहे. सोलापूरच्या श्री साई डायग्नोस्टिक सेंटर नावाच्या संस्थेनं हा सगळा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक संस्थेने केला आहे. यासाठी तब्बल 30 हजाराहून अधिकची कागदपत्रे माहिती अधिकाराच्या माध्यमातून संघटनेने मिळवली आहेत. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय ते जाणून घेऊयात.
ठेकेदाराने डॉक्टरांच्या नावे बोगस सह्या करुन अपहार केल्याचा आरोप
सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात रक्त चाचणी घोटाळा झाल्याचा आरोप करण्याय येत आहे. बोगस रक्त चाचण्या दाखवून महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून कोट्यावधी रुपयांची बिलं उचलल्याचा आरोप सोलापुरतील सामाजिक संघटनेने केला आहे. यासाठी संत रोहिदास सामाजिक संघटनेने चक्क रिक्षाभरून आणलेली कागदपत्रे पुरावा म्हणून सादर केली आहेत. 1 एप्रिल 2022 ते 16 सप्टेंबर 2024 पर्यंत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील रक्त तपासणी करण्याचे कंत्राट श्री साई डायगनोस्टिक सेंटर या संस्थेला देण्यात आले होते. ज्या रक्त चाचण्याची सोय शासकीय रुग्णालयात नाही अशा चाचण्या करण्याचे कंत्राट या डायग्मोस्टिक सेंटरला देण्यात आले होते. मात्र ठेकेदाराने ड्युटीवरील डॉक्टरांच्या नावे बोगस सह्या करून हा अपहार केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
श्री साई डायग्नोस्टिक सेंटरच्या संचालकांची चौकशी करण्याची मागणी
या प्रकरणी ठेकेदार असलेल्या श्री साई डायग्नोस्टिक सेंटरच्या संचालकांची चौकशी व्हावी अशी मागणी 2024 सालीच विठ्ठल व्हनमारे यांनी शासकीय रुग्णालयच्या अधिष्टाताकडे केली होती. मात्र, सहा महिने उलटल्यानंतर देखील कोणताही अहवाल न आल्याने संघटनेने आंदोलनाचा इशारा देत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्ताना पत्र लिहलं आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी प्रकरण गंभीर असल्याचे म्हणत शासकीय रुग्णालयाच्या अधिष्टाताना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या आदेशानंतर या प्रकरणाची चार सदस्य समितींकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित रक्त चाचण्याचे सर्व बिलं थांबवन्यात आली आहेत. श्री साई डायग्नोस्टिकला कुठल्याही पद्धतीचे बिलं देण्यात आलेले नाहीत. चौकशी अहवाल आल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल.अशी माहिती सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. संजीव ठाकूर यांनी एबीपी माझाला फोनवरून दिली आहे.
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दररोज हजारो रुग्णांवर उपचार घेतात
या प्रकरणात ज्या श्री साई डायगनोस्टिक सेंटरवर आरोप करण्यात आलेत, त्याची बाजू जाणून घेण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दररोज हजारो रुग्णांवर उपचार केले जातात. केवळ सोलापूरच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यासह अगदी कर्नाटकतून देखील रुग्ण इथ येतात. मात्र या रुग्णांच्या नावाचा वापर करून कोणी त्याच्या गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची सविस्तर चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nashik Crime : नाशिक जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, माजी वैद्यकीय अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
