Society Election: कैलास गोरंट्याल यांना खोतकरांचा झटका; शिवसेनेने मारली बाजी
Election News: काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल प्रणित शेतकरी विकास पॅनलचे सर्वच उमेदवार पराभूत झाले आहेत.
Jalna Society Election News: शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्यामुळे प्रतिष्ठेची बनलेल्या जालना जिल्ह्यातील पानशेंद्रा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचे निकाल लागले आहे. तर निवडणुकीत खोतकर गटाने बाजू मारत कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला आहे. अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांनी 54 मतांनी विजय मिळवला आहे.
अशी झाली लढत...
ग्रामीण भागात सोसायटीची निवडणुक प्रतिष्ठेची समजली जाते. त्यामुळे आपलाच विजय व्हावा म्हणून अनेक राजकीय डाव टाकले जातात. मात्र पानशेंद्रा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांचे बंधू रिंगणात होते तर विरोधात खुद्द आमदार कैलास गोरंट्याल असल्याने या निवडणूकीला आणखीनच महत्व आले होते. मात्र हाती आलेल्या निकालानुसार अतिशय अतीतटीच्या या लढतीमध्ये अर्जुन खोतकर प्रणित जयभवानी शेतकरी विकास पॅनलचे 13 ही उमेदवार निवडून आले आहेत. तर काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल प्रणित शेतकरी विकास पॅनलचे सर्वच उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांना 88 मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी संजय खोतकर यांना 142 मते मिळाली आहे.
दोन्ही गटामध्ये बाचाबाची..
दुपारी या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत असताना काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन दोन्ही गट समोरासमोर आले होते. या गोंधळामुळे काहीकाळ मतदान पक्रिया थांबवावी लागली होती. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. दरम्यान मतदान चार वाजता संपल्यानंतर साडेचार वाजता मतमोजणी करण्यात आली. त्यात खोतकरांच्या पॅनलचा मोठा विजय झाला आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
पानशेंद्रा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक खोतकर आणि गोरंट्याल या दोन्ही नेत्यांसाठी महत्वाची होती. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी निकालाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. तसेच दोन्ही गटात झालेल्या बाचाबाचीनंतर आणखी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.