Jalgoan News : चालत्या बैलगाडीवर वीज तार कोसळली, विजेच्या धक्क्याने बैल आणि शेतकऱ्याचा मृत्यू
Jalgaon News : जळगावातील चिखली इथे रस्त्यावरुन बैलगाडी जात असताना अचानक विजेची तार बैलगाडीवर कोसळली. यावेळी वीजेचा धक्का बसून बैलगाडी हाकणाऱ्या शेतकऱ्यासह बैलाचा जागीच मृत्यू झाला.
Jalgaon News : चालत्या बैलगाडीवर (Bullock Cart) वीज तार कोसळून विजेचा धक्का बसून झालेल्या अपघातात बैलासह शेतकऱ्याचा (Farmer) जागेवरच मृत्यू झाला. जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील चिखली या गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. आज (1 सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
महावितरणच्या कारभारावर रोष
यावल तालुक्यातील चिखली इथे रस्त्यावरुन बैलगाडी जात असताना अचानक विजेची तार बैलगाडीवर कोसळली. यावेळी वीजेचा धक्का बसून बैलगाडी हाकणाऱ्या शेतकऱ्यासह बैलाचा जागीच मृत्यू झाला. यशवंत कामा महाजन (वय 65 वर्षे, रा. चिखली बुद्रूक) असं या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून महावितरण कंपनीच्या कारभारावर ग्रामस्थांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूमुखी पडलेला बैल आणि त्यावर शेतकऱ्याचा मृतदेह असं दृश्य बघून यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.
शेतात जात असताना दुर्दैवी मृत्यू
चिखली बुद्रूक इथे यशवंत कामा महाजन हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शेतमजुरी काम करुन ते त्यांचा उदरनिर्वाह भागवत होते. गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे बैलगाडी घेऊन शेतात जात होते. या दरम्यान गावापासून काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्यावरुन गेलेली विजेची तार अचानकपणे बैलगाडीवर कोसळला. या घटनेत विजेचा जोरदार धक्का बसून यशवंत महाजन यांचा मृत्यू झाला तर या घटनेत बैलगाडीचा एक बैलही जागीच दगावला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस पाटील भागवत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृत शेतकऱ्याला शासकीय मदत मिळावी, ग्रामस्थांची मागणी
गावात काल (31 ऑगस्ट) रात्री जोरदार पाऊस झाला होता. या जोारदार पावसामुळे महावितरण कंपनीचे आधीच सैल असलेले वीजेचे तार तुटले असावेत आणि त्यातून ही मोठी घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस पाटील भागवत पाटील यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली आहे. दरम्यान मृत यशवंत महाजन यांच्या पश्चात पत्नी अनुसयाबाई, मुलगा विकास असा परिवार आहे. दरम्यान महावितरणने वेळीच लक्ष देऊन जर हे वीजेचे तार ओढून घेऊन व्यवस्थित केले असते तर कदाचित आज ही घटना घडली नसती, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. दरम्यान मृत यशवंत महाजन यांना शासकीय मदत मिळावी अशीही मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. या घटनेमुळे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.