Assam Flood Update : आसममधील पुरपरिस्थिती गंभीर, तब्बल 43 लाख लोकांना फटका, विमानाने पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा
Assam Flood Update : आसाममधील पुरपरिस्थिमुळे आतापर्यंत 73 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे. पुरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी पुराच्या पाण्यात वाहून गेले.
Assam Flood Update : आसाममधील पूरस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. राज्यातील 35 पैकी 33 जिल्ह्यांमधील सुमारे 43 लाख लोकांना या पुराचा फटका बसला आहे. या पुरात आतापर्यंत 73 जणांचा मृ्त्यू झाला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त भागात अन्न आणि इतर मदत साहित्य हवाई मार्गे पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय हवाई दलाचे एक विशेष विमान 21 जून रोजी आसाममधील सिलचर येथे 1 लाख लिटर डिझेल आणि पेट्रोल पुरवेल.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "भारतीय लष्कराच्या अनेक तुकड्या पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य करत आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, राज्य सरकारचे विभाग, अनेक सामाजिक संस्था मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. राज्यातील नागाव आणि मोरीगाव जिल्ह्यातील 2000 हून अधिक गावे अजूनही पुराच्या पाण्याच्या विळख्यात आहेत.
मृतांचा आकडा 73 वर
पुरपरिस्थिमुळे आतापर्यंत 73 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे. पुरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी पुराच्या पाण्यात वाहून गेले. सोमवारी पहाटे त्यांचे मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मदत आणि बचाव कार्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जेथे पूरस्थिती गंभीर आहे आणि लष्कर, एनडीआरएफ किंवा एसडीआरएफच्या बोटी पोहोचलेल्या नाहीत तेथे मदत सामग्री हवाई मार्गाने सोडण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, पुढील काही दिवस जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कार्यपद्धतीच्या नियमांची पर्वा न करता नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यावर भर द्यावा. काही क्षेत्रे मदत नियमावलीमध्ये समाविष्ट केली गेली नसतील तर आम्ही ते राज्याच्या मालकीच्या प्राधान्य विकास योजना आणि मुख्यमंत्री मदत निधी अंतर्गत येतील याची खात्री करू.
पूर परिस्थितीनंतर उद्भवणाऱ्या आजारांना प्रभावीपणे सामोरे जावे यासाठी राज्यातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांच्या मदतीने प्रदेशनिहाय मेगा आरोग्य शिबिरांचे नियोजन करण्याचे निर्देश सरमा यांनी अधिकाऱ्यांना दिले. पुराचे पाणी कमी होताच नुकसानीचे मूल्यांकन तातडीने सुरू करावे आणि लवकरात लवकर काम पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी जिल्ह्यांच्या उपायुक्तांना दिले.
पुरामुळे आसामधील सुमारे 1.90 लाख लोकांनी 744 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. छावण्यांमध्ये न गेलेल्या बाधितांना तात्पुरत्या केंद्रांवरून मदत साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, NDRF, SDRF, पोलिस आणि इतर यंत्रणांनी आतापर्यंत सुमारे 30,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.