National Farmer's Day 2022 : आज 'शेतकरी दिन', बळीराजाच्या नावानं साजरा होणाऱ्या या दिवसाचं महत्व काय?
National Farmer's Day 2022 : देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 23 डिसेंबर रोजी भारतात 'शेतकरी दिन' साजरा केला जातो.
National Farmer's Day 2022 : 'राष्ट्रीय शेतकरी दिन' हा दरवर्षी भारतात 23 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिन 'शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो. चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने 2001 पासून चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 23 डिसेंबर हा दिवस 'शेतकरी दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेतीसंबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात.
राष्ट्रीय शेतकरी दिनाचा इतिहास
भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 पर्यंत त्यांनी अत्यंत अल्प कालावधीसाठी पंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली. अत्यंत साध्या मनाचे ते अत्यंत साधे जीवन जगणारे होते. आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी भारतीय शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक धोरणे सुरू केली.
चौधरी चरणसिंह यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि शेतकर्यांच्या हिताच्या विविध धोरणांनी भारतातील सर्व शेतकर्यांना जमीनदार आणि धनदांडग्यांच्या विरोधात एकत्र केले. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेल्या 'जय जवान जय किसान' या प्रसिद्ध घोषणेचे त्यांनी पालन केले. चौधरी चरणसिंह हे एक अतिशय यशस्वी लेखक होते आणि त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली ज्यात शेतकरी आणि त्यांच्या समस्यांबद्दल त्यांचे विचार मांडले गेले. शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी विविध उपायांच्या स्वरूपात खूप प्रयत्न केले.
चौधरी चरणसिंह हे शेतकरी कुटुंबातील होते आणि त्यामुळे भारताचे माननीय पंतप्रधान असूनही त्यांनी अतिशय साधे जीवन जगले. भारत हा मुख्यत: खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांमध्ये राहणारी बहुसंख्य लोकसंख्या शेतकरी आहे आणि शेती हा त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. अजूनही 70% भारतीय लोकसंख्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे.
1960 च्या दशकात पंजाब आणि हरियाणामध्ये विकसित झालेल्या हरित क्रांतीने देशाचे कृषी चित्र बदलले. यामुळे उत्पादकता वाढली आणि त्यामुळे भारत विविध कृषी मालामध्ये स्वयंपूर्ण झाला.
शेतकरी हा भारताचा कणा आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी केलेल्या महान कार्याचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करतो.
चौधरी चरण सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. यादरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाची कामं केली. त्यांच्यामुळेच आज शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्यांनी जमीनदारी रद्द केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी लेखापद पद बनवलं. त्यानंतर ते उपपंतप्रधान बनले आणि मग पंतप्रधानपदी विराजमान होऊन देशाची सेवा केली.
महत्त्वाच्या बातम्या :