Asani Cyclone: 'असनी' चक्रीवादळ पुढील 24 तासांत तीव्र होणार, ममता बॅनर्जी यांचा दौरा पुढे ढकलला
Asani Cyclone : किनारपट्टी भागात चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी सुरू असून येथील एनडीआरएफ, एसडीआरएफ, कोस्टल गार्ड आणि नेव्ही अलर्टवर आहेत.
Asani Cyclone : 'असनी' नावाचे चक्रीवादळ पुढील 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे चक्रीवादळ आता विशाखापट्टणमपासून 940 किमी आणि ओडिशातील पुरीपासून 1000 किमी अंतरावर असल्याचे समजते आहे. चक्रीवादळ 10 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये येण्याची शक्यता असल्याने बंगालमध्ये 'हाय अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी त्यांचा जिल्हा दौरा पुढे ढकलला आहे.
चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी
बंगालच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी सुरू असून येथील एनडीआरएफ, एसडीआरएफ, कोस्टल गार्ड आणि नेव्ही अलर्टवर आहेत. बंगालमधील किनारी जिल्ह्यांच्या प्रत्येक भागात तसेच मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत आहेत. चक्रीवादळासाठी 5 आपत्कालीन प्रतिसाद पथके सज्ज आहेत.
ममता बॅनर्जींनी आपला दौरा पुढे ढकलला
दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा जिल्हा दौरा पुढे ढकलला आहे. टीएमसीचे (तृणमूल काँग्रेस) सरचिटणीस कुणाल घोष यांनी सांगितले की, 'असनी' वादळाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम मिदनापूर आणि झारग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा 3 दिवसांचा कार्यक्रम 10, 11 आणि 12 मे ते 17, 18 आणि 19 मे पर्यंत बदलण्यात आला आहे.
वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता
IMD ने सांगितले की, मंगळवारपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता या किनारी जिल्ह्यांसह राज्याच्या दक्षिण भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छिमारांना 10 मे पासून पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात तसेच ओडिशा किनारपट्टीवर जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, ओडिशाच्या किनारपट्टीलगतच्या समुद्राच्या स्थितीत 9 मे आणि 10 मे रोजी बदल दिसून येतील. दरम्यान, 10 मे रोजी समुद्रातील वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
जावाद, गुलाब, यास, आणि आता असनी...
डिसेंबर 2021 मध्ये जावाद चक्रीवादळ भारतात आले होते. त्याआधी गुलाब चक्रीवादळ सप्टेंबर 2021 मध्ये धडकले, तर मे 2021 मध्ये, यास चक्रीवादळाने बंगाल, बिहारसह अनेक राज्यांमध्ये कहर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
- Asani Cyclone News : असनी चक्रीवादळाचा प्रभाव, ओडिशा आणि पश्चिम बंगालसह आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
- Asani Cyclone : कोकण किनारपट्टीला 'असनी' चक्रीवादळचा धोका नाही; फेक मेसेज व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाचं स्पष्टीकरण