Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Rohit Pawar on Ram Shinde : मी राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले. मी माझे केस काळे करत नाही, पण काही जण केस काळे करतात आणि तरुणांसारखे ड्रेस घालतात, असा टोला रोहित पवारांनी राम शिंदेंना लगावला.
अहमदनगर : मी राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले. मी माझे केस काळे करत नाही, पण काही जण केस काळे करतात आणि तरुणांसारखे ड्रेस घालतात. त्यांना तरुणाविरोधात निवडणूक लढवायची आहे, असा टोला आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपचे विधान परिषद आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांना लगावला आहे. मिरजगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे आपचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
रोहित पवार म्हणाले की, 260 टँकरच्या माध्यमातून मी मतदारसंघात पाणी दिले. मला अनेक भागात कमी मतदान मिळाले पण मी विचार केला नाही. कोणताही भेदभाव न करता मी काम करतो. सायकल वाटताना देखील मी भेदभाव केला नाही. अनेक विरोधकांच्या मुलामुलींना सायकली मिळाल्या. पण त्या लहान मुलांना राजकारणाचे काय देणेघेणे आहे. ज्या ठिकाणी राजकारण करायचे त्याच ठिकाणी राजकारण करावं, निवडणूक झाल्यावर समाजकार्य करावं, असे त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
माझे विरोधक (राम शिंदे) म्हणतात रोहित पवार मुलांना चॉकलेट देतो. मी माझ्या लहान भावा-बहिणीला चॉकलेट देत असेल तर तुम्हाला वाईट का वाटते? नको त्या गोष्टींवरून राजकारण करू नये. मी राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले. मी माझे केस काळे करत नाही, पण काही जण केस काळे करतात आणि तरुणांसारखे ड्रेस घालतात. त्यांना तरुणाविरोधात निवडणूक लढवायची आहे, असं म्हणत रोहित पवारांनी नाव न घेता राम शिंदेंना टोला लगावला.
मनीष सिसोदिया आणि माझ्यात एक साम्य : रोहित पवार
ते पुढे म्हणाले की, मनीष सिसोदिया आणि माझ्यात एक साम्य आहे. त्यांच्यावरही ईडीची कारवाई झाली आणि माझ्यावरही कारवाई झाली. फरक एवढाच आहे की, सिसोदिया 17 महिने जेलमध्ये गेले होते, मी गेलो नाही. पण पुढे काय होणार माहिती नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवारांच्या कार्याला सलाम : मनीष सिसोदिया
यावेळी मनीष सिसोदिया म्हणाले की, आजचा दिवस देशाच्या राजकारणातील महत्वाचा आहे. एका पक्षाचा नेता शाळा बनवतो आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला उद्घाटनाला बोलावतो. रोहित पवारांनी दिल्लीत शाळा बघितल्या आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघात तशा शाळा बनवल्या. त्यांच्या कार्याला माझा सलाम. देशातील राजकारण असंच झालं पाहिजे. या राज्यात असं एक राजकारण सुरू आहे की, एकीकडे पक्ष फोडले जात आहे, कुटुंब फोडले जात आहे. मात्र, दुसरीकडे शाळा उघडल्या जातं आहे आणि दुसऱ्या पक्षातील नेत्याला उद्घाटनाला बोलवत आहे, असं राजकारण झालं पाहिजे. रोहित पवारांकडून आमच्या पक्षातील नेत्यांनी देखील शिकण्यासारखं आहे. दिल्लीतील सरकार शिक्षण विभागावर सर्वाधिक खर्च करते. ज्या देशात खूप चांगलं शिकवलं जातं त्या देशात मी दिल्लीतील शिक्षकांना पाठवले. शिक्षकांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी