International Yoga Day 2023: ब्लड प्रेशर, डायबिटीजवर रामबाण उपाय ठरतील 'ही' 3 योगासनं; दिवसभरात फक्त 15 मिनिटं काढा अन् नक्की ट्राय करा
International Yoga Day 2023: मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही दिवसभरातील केवळ 15 मिनिटांचा वेळ काढून काही सोपी योगासनं करु शकता.
International Yoga Day 2023: आज आंतरराष्ट्रीय योग दिन... दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात योग दिन (Yoga Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 21 जून रोजी जगभरात ‘योग दिन’ साजरा केला जाणार आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आम्ही मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी योगाभ्यासाचे काही फायदे सांगणार आहोत. तसेच, मधुमेह आणि उत्त रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सोपी योगासनं सांगणार आहोत. ही योगासनं तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासोबतच इतर शारीरिक व्याधी दूर ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरतील. तसेच, शरीर लवचिक ठेवण्यासोबतच स्नायूंची ताकद आणि बळकट होण्यासाठीही मदत करतील. योगामुळे तुमच्या जीवनात नवी ऊर्जा मिळते. हळूहळू लोकांमध्ये योगाभ्यासाबाबत जागरुकता निर्माण होत आहे.
जर तुम्ही मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा सामना करत असाल तर ही योगासनं नक्की करा
1. कपालभाती
तुमची पाठ आणि खांदे आरामशीर आणि सरळ ठेवा आणि नंतर तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा, डोळे बंद करा. तळवे गुडघ्याकडे ठेवा. या योगाच्या सुरुवातीला सुखासन, अर्धपद्मासन, वज्रासन किंवा पूर्ण पद्मासन करत आरामशीर स्थितीत बसावं.
कसं कराल?
दीर्घ श्वास घ्या आणि नंतर श्वास सोडा. पोट वापरून, डायाफ्राम आणि फुफ्फुसावर प्रेशर टाका जेणेकरून श्वास सोडताना तो त्यातून बाहेर पडेल. श्वास सोडताना तो बाहेर काढण्यासाठी पोटावर दबाव टाकला की श्वास आपोआप बाहेर येऊ लागतो. ही प्रक्रिया 3 मिनिटं करा.
कपालभाती करण्याचे फायदे
कपालभाती करण्याचे फायदे असे आहेत की, यामुळे तुमचं पचन आणि श्वसन प्रणाली सुधारते. हे वजन कमी करण्यासाठी आणि स्नायूंना मोठ्या प्रमाणात टोन करण्यासाठी उपयुक्त आहे. तुमची एकाग्रता वाढवण्यासाठीही याचा फायदा होतो.
हे आसन कोणी करू नये
उच्च रक्तदाब, हर्निया, हृदयविकार, पाठीच्या समस्या असणाऱ्यांनी हे आसन करणं टाळावं.
2. मांडूका आसन
आपले गुडघे वाकवून आपल्या ओटीपोटापर्यंत आणा आणि वज्रासन स्थितीत बसा. नंतर दोन्ही हात समोर ठेवा. त्यानंतर हाताचा अंगठा आणि उरलेली बोटं वरच्या बाजूला ठेवा. नंतर आपल्या हाताचा कोपर ठेवा. आपल्या संपूर्ण शरीराला बॉलमध्ये आकार द्या. नंतर आपली मान पुढे ठेवून सरळ पाहा.
मांडूका आसनाचे फायदे
हे आसन तुमच्या पोटासाठी योग्य आहे. यामुळे पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. असं म्हणता येईल की, ते पोटाला एक प्रकारे मालिश करतं. बद्धकोष्ठता आणि पचनाच्या आजारांपासून आराम मिळतो. तसेच पोटातील गॅसची समस्याही दूर करतं. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम औषधासारखं काम करतं. यामुळे शरीर आरामशीर राहतं आणि अस्वस्थता कमी होते.
हे आसन कोणी करू नये
गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. यामुळे पाय दुखू शकतात किंवा ज्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनीही हे आसन करणं टाळावं. अल्सर असलेल्या लोकांनीही हे आसन करणं टाळावं.
3. हलासन
हलासन करताना एखादा सपाट पृष्ठभाग अथवा सपाट जागा पाहा. सपाट पृष्ठभागावर झोपा त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या शरीराजवळ ठेवा. आपल्या पोटाच्या स्नायूंचा वापर करुन आपले पाय 90 अंशाच्या उंचीवर न्या, हात आपल्या शरीराच्या जवळ ठेवा आणि नंतर आपले पाय आपल्या डोक्याच्या मागे हलवण्याचा नेण्याचा प्रयत्न करा. अजिबात घाई करु नका, हळूहळू पाय आपल्या डोक्यावरुन मागे नेण्याचा प्रयत्न करा. पाठीचा खालचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर डोक्यावर पुढे नेलेल्या पायाच्या बोटांनी फरशीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
हलासन केल्यानं होणारे फायदे
हलासन पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. तसेच, अनेक दिवसांपासून तुम्ही जर बद्धकोष्ठाच्या समस्येनं ग्रस्त असाल तर ही समस्याही दूर होण्यास मदत होते. थायरॉईड, किडनी, प्लीहा आणि स्वादुपिंड यांच्या समस्यांपासूनही दूर ठेवण्यासाठी हलासन फायदेशीर ठरतं. तसेच, उच्च रक्तदाबाची समस्येवरही हलासन फायदेशीर ठरतं. ज्या महिलांना मासिक पाळीत जास्त वेदना होतात त्यांच्यासाठी हे औषधासारखे काम करेल. याव्यतिरिक्त मेंदूचं आरोग्य वाढवणं, त्वचेचे विकार दूर करणं यांसारख्या समस्यांवरही हलासन उपयुक्त ठरतं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )