Hockey India Team Paris Olympics 2024 : 'चक दे इंडिया'मधील ऑस्ट्रेलियन टीमचा कोच ठरला हॉकी इंडियासाठी व्हिलन, ऑलिम्पिकमध्ये नेमंक काय झालं?
Hockey India Team Paris Olympics 2024 : भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेऊन ऐनवेळी रणनीतीमध्ये बदल करणारा ऑस्ट्रेलियन कोच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. रुपेरी पडद्यावरील हा कलाकार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघासाठी व्हिलन ठरला आहे.
Hockey India Team Paris Olympics 2024 : काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'चक दे इंडिया' (Chak De India) या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने कमाल केली होती. या चित्रपटात शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि इतर कलाकारांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात लक्षात आहेत. या चित्रपटात ऑस्ट्रेलियन टीमच्या कोचची भूमिकाही भारतीय प्रेक्षक विसरले नाहीत. भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेऊन ऐनवेळी रणनीतीमध्ये बदल करणारा ऑस्ट्रेलियन कोच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. रुपेरी पडद्यावरील हा कलाकार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघासाठी व्हिलन ठरला आहे.
पॅरिस ऑलिम्पिमकमध्ये भारताच्या हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. 'चक दे इंडिया' या चित्रपटात ऑस्ट्रेलियन संघाच्या कोचची भूमिका जोशुआ हर्ट यांनी साकारली आहे. याच जोशुआ हर्ट यांचा सध्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. जोशुआ यांनी रविवारी रात्री उशिरा दिलेल्या निर्णयामुळे भारतीय हॉकी संघाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला.
अमित रोहिदासला मिळाले होते रेड कार्ड
रविवारी ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताचा नंबर वन डिफेंडर अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाले. या कार्डमुळे तो संपूर्ण सामन्यासाठी बाद झाला. रेड कार्ड मिळाल्यानंतर रोहिदासवर एका सामन्याच्या बंदीचा धोका होता. हा निर्णय टूर्नामेंट संचालकांवर अवलंबून होता. जोशुआ हर्ट यांनी रोहिदासवर एका सामन्याची बंदी घातली. भारतीय संघ आता 16 ऐवजी 15 खेळाडूंसह उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे.
याआधीही जोशुआ यांच्यामुळे टीम इंडियाला धक्का...
जोशुआ हर्टने यापूर्वीच भारतीय संघाचे मन दुखावले आहे. 2011 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात वादग्रस्त सामना झाला होता. या सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू भिडले. यानंतर टूर्नामेंट डायरेक्टर ग्रॅहम नेपियर यांनी भारतीय संघातील पाच सदस्यांना निलंबित केले. यामध्ये तीन खेळाडूंशिवाय व्यवस्थापक आणि सहाय्यक प्रशिक्षकाचाही समावेश होता. भारतीय मिडफिल्डर गुरबाज सिंगने तीन, गुरविंदर सिंग चंडी आणि तुषार खांडकर यांच्यावर प्रत्येकी पाच सामन्यांची बंदी घालण्यात आली. भारतीय खेळाडूंवर करण्यात आलेल्या कारवाईच्या या निर्णयात जोशुआ हर्टचाही समावेश होता.