Hemangi Kavi : 'बाई, बुब्स आणि ब्रा'नंतर येणारी हेमांगी कवीची प्रत्येक पोस्ट ट्रोल; ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत अभिनेत्री म्हणाली...
Hemangi Kavi : 'बाई, बुब्स आणि ब्रा'नंतर येणारी अभिनेत्री हेमांगी कवीची प्रत्येक पोस्ट ट्रोल होत आहे.
Hamangi Kavi : अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. काही दिवसांपूर्वी 'बाई, बुब्स आणि ब्रा...' ही हेमांगीची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल झाली. त्यानंतर काहींनी अभिनेत्रीला ट्रोल केलं तर काहींनी मात्र तिच्या या पोस्टचं कौतुक केलं. पण या पोस्टरनंतर येणारी हेमांगी कवीची प्रत्येक पोस्ट ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरू लागली आणि ट्रोलर्स मंडळी ट्रोल करू लागले. पण अभिनेत्री मात्र या ट्रोलर्स मंडळींकडे दुर्लक्ष करत आहे.
एबीपी माझाशी बोलताना हेमांगी कवी म्हणाली,"बाई, बुब्स आणि ब्रा..' या पोस्टनंतर मला ट्रोल करणाऱ्या मंडळींची संख्या नक्कीच वाढली आहे. आपल्या संस्कृतीला एक बाई धक्का देत आहे, असं या मंडळींना वाटत आहे. रोजचं काम असल्याप्रमाणे ही मंडळी ट्रोल करत आहेत. संस्कृतीसंदर्भात काही वक्तव्य केलं तर ते दडपून टाकण्याचा प्रकार या मंडळींकडून होत आहे. पण मुळात या मंडळींची संख्या फार कमी आहे. मला सपोर्ट करणारे 80 टक्के, तर ट्रोल करणारे 20 टक्के आहेत. त्यामुळे अशा लोकांना फार महत्त्व देणं मला योग्य वाटत नाही".
ट्रोलर्स मला घाबरतात : हेमांगी कवी
हेमांगी कवी पुढे म्हणाली,"टोलर्स मला घाबरतात. बाईच्या स्वातंत्र्याबद्दल बोलताना ट्रोलर्स मंडळी बिथरतात आणि पाहिजे तसा हल्ला करतात. त्यानंतर मग माझी कोणत्याही विषयासंदर्भातील प्रत्येक पोस्ट मोठ्या प्रमाणात ट्रोल केली जाते. माझी इमेज कशी मलूल होईल यासाठी ही मंडळी प्रयत्न करत असतात. पण दुसरीकडे चाहते जेव्हा मला भेटतात तेव्हा ते माझं कौतुक करतात. माझ्या पोस्टबद्दल भरभरून बोलतात. मॅडम तुम्ही उगाच कोणत्याही विषयावर का लिहिता? असं आजवर मला समोर येऊन कोणीही बोललेलं नाही. त्यामुळे लॉक प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ते जाणून घेणं आणि त्याला फार महत्त्व देणं मला योग्य वाटत नाही".
मी आधीपासूनच बोल्ड अन् बिनधास्त : हेमांगी कवी
हेमांगी कवी ही बोल्ड, बिनधास्त आणि सुंदर आहे. पण हेमांगी अचानक बोल्ड आणि बिनधास्त झाल्याचं म्हटलं जात आहे. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणते,"मी बोल्ड आणि बिनधास्त आहे हे आता दिसू लागलं आहे. पण मी आधीपासूनच बोल्ड आहे. सुंदर आहे का हे मला माहिती नाही. आता सोशल मीडियामुळे हे लोकांसमोर येत आहे. व्यक्त होण्यासाठी पूर्वी मला माध्यम मिळालं नव्हतं. त्यामुळे मी जे वागायचे, बोलायचे ते कोणाला दिसत नव्हतं. आता व्यक्त होण्याचं माध्यम मला मिळालं आहे. त्यामुळे मी व्यक्त होते. एकंदरीतच मी अचानक बोल्ड झालेली नसून आधीपासूनच अशी आहे".
भूमिकेची निवड करताना हेमांगी कवीचे निकष काय असतात?
भूमिकेची निवड करण्याबद्दल हेमांगी कवी म्हणाली,"मला असं वाटतं की, प्रत्येक भूमिकेसाठी स्वत:ला सिद्ध करावं लागतं. प्रत्येक भूमिका ही माझ्यासाठी चॅलेंज असते. भूमिकेची निवड करताना हाच निकष असतो की, भूमिका किती मोठी आहे यापेक्षा ती भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. त्यामुळे त्या भूमिकेच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा मी प्रयत्न करते. नाटक, सिनेमा, चित्रपट, वेबसीरिज किंवा पंधरा सेकंदाचं रील असो प्रत्येक गोष्ट चांगलं करण्याचा माझा प्रयत्न असतो".
संबंधित बातम्या