नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपुरात मोदींचं भाषण, काँग्रेस, मविआवर हल्लाबोल
नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला चिमूरच्या क्रांतिकारकांना अभिवादन केलं. बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीला देखील अभिवादन केलं.
चंद्रपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी प्रचारसभेचा आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मोदींनी धुळ्यातून आपल्या निवडणूक प्रचारसभांना सुरुवात केली. त्यावेळी, संविधान आणि जातीय राजकारणावरुन काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. तसेच, एक है तो सेफ है... असा नाराही मोदींनी दिला. त्यानंतर, आज विदर्भातील चिमूर मतदारसंघातून मोदींनी महायुतीसाठी प्रचारसभा घेतली. येथील सभेतून त्यांनी थेट महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. विकासाचा अडथळा निर्माण करणारी ही आघाडी म्हणजे बिघाडी आहे. तर, कलम 370 पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होतअसल्याचे सांगत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. तसेच, आम्ही नलक्षवादाला (Naxal) लगाम लागवल्याने येथील भागात उद्योग येऊ लागले असे मोदींनी म्हटले. दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेले जात असल्याची टीका महाविकास आघाडीचे नेते करत असताना, मोदींनी नक्षलग्रस्त भागात उद्योग आणल्याचे म्हटले.
नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला चिमूरच्या क्रांतिकारकांना अभिवादन केलं. बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीला देखील अभिवादन केलं. सभेत आलेल्या गर्दीचा विशेष उल्लेख करुन मोदींनी महायुतीने जाहीर केलेल्या भाजपच्या संकल् पत्राचे कौतुक केले. हे संकल्प महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी आहे, असेही मोदींनी म्हटले.
मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटले की, आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खिलाडी आहेत. जम्मू-कश्मीर अनेक दशकं दहशतवादात होरपळत होता, संविधानाची माळ जपणाऱ्यांनी सात दशकं बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कश्मीरमध्ये लागू होऊ दिलं नाही. मात्र, मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवून काश्मीरमधील लोकांचं भारताशी नातं जोडलं. देशात 70 वर्षांपासून दोन संविधान होते, जोपर्यंत मोदी आला नाही, तोपर्यंत देशात दोन संविधान होते. एक संपूर्ण देशात आणि दुसरं जम्मू काश्मीरमध्ये होतं. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि येथील उच्च न्यायालयातील न्यायाधीश संविधानाची शपथ घेत नव्हते. कारण, 370 कलम लागू असल्याने ही मोठी अडसर होती. मात्र, आपल्या आशीर्वादाने मोदी सरकार आल्यानंतर आम्ही कलम 370 हटवले. पण, काँग्रेसवाल्यांना हे पचनी पडत नाही, म्हणूनच तेथील सरकार काँग्रेससह पुन्हा एकदा कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करत आहेत, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
नक्षलवादाला चाफ लावत चंद्रपुरात उद्योग आणले
चंद्रपूरने अनेक वर्षे नक्षलवाद सहन केला, अनेक तरुणांचे बळी गेले, त्यामुळे या भागात उद्योग येऊ शकले नाहीत. आम्ही नक्षलवादावर लगाम लागली, त्यामुळे या भागात आता उद्योग येत आहेत. करोडो लोकांना पीएम आवास योजनेचा लाभ मिळाला. देशातील 25 कोटी लोकं दारिद्र्याच्यारेषेबाहेर आले, या भागातील चिंनोर तांदुळाच्या उत्तम क्वालिटीचाही मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला. तसेच, महाविकास आघाडीने जलयुक्त शिवार योजना थांबवली, असे म्हणत मोदींनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. हम एक है तो सेफ है.... असे म्हणत मोदींनी सर्वांना एकत्र राहण्याचे आवाहन केले. जर तुम्ही एक राहिला नाहीत, तर काँग्रेस तुमचं आरक्षण काढून टाकेन, असेही मोदींनी म्हटले.
हेही वाचा
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा