J P Gavit : एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
Maharashtra Assembly Elections 2024 : एकच पक्ष, एकच झेंडा अन् एकच चिन्हावर विधानसभेच्या दहा व लोकसभेच्या तीन निवडणुका लढण्याचा विक्रम माजी आमदार कॉ. जिवा पांडू गावित यांनी केलाय.
नाशिक : सत्तेसाठी दिवसागणिक पक्ष बदलणारे अनेक नेते आपण पाहिले आहेत. मात्र, राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) एकच पक्ष, एकच झेंडा अन् एकच चिन्हावर तब्बल विधानसभेच्या दहा व लोकसभेच्या तीन निवडणुका लढण्याचा विक्रम कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे (Kalwan Surgana Assembly Constituency) माजी आमदार कॉ. जिवा पांडू गावित (J P Gavit) यांनी केलाय. विशेष म्हणजे ते आता ११ वी विधानसभा लढवताय. जाणून घेऊयात त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत...
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विचाराचा पगडा असलेले जिवा पांडू गावित यांच्याकडे बघितल्यावर पक्षनिष्ठा कशाला म्हणतात हे खऱ्या अर्थाने लक्षात येते. आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या जिवा पांडू गावित यांनी शोषण आणि कष्ट जन्मापासूनच पाहिले आहेत. आई-वडील अशिक्षित, कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू ठेवून लढणाऱ्या गावित यांनी आजपर्यंत दहा वेळा विधानसभा निवडणुका लढविल्या आहे. त्यापैकी सात वेळा त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. तर तीन वेळा त्यांच्या पदरी पराभव आला आहे. मात्र, पराभवाने न खचता दुसऱ्या दिवशी ते पुन्हा जनतेच्या कामाला सुरुवात करतात हे विशेष. निवडणुकीत पराभव होणार हे लक्षात आल्यावरही केवळ पक्षाने आदेश दिला म्हणून गावित यांनी तीन वेळा लोकसभा निवडणूक देखील लढविली आहे.
जे. पी. गावितांचे कार्य
कष्टकरी लोकांच्या हातात सत्तेची सूत्रे आली पाहिजे हा कार्ल मार्क्स यांचा विचार घेवून गावित हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे ओढले गेले. बीएससीपर्यंत शिक्षण घेतलेल्या गवितांनी नोकरी न करता सुरगाणा भागात सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी व आदिवासींच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा सुरू केला. वन जमिनीच्या महत्त्वाच्या विषयावर त्यांचा लढा आजीवन सुरू आहे. हा लढा लढताना त्यांना अनेकदा जेलवारी देखील करावी लागली. 1978 साली ते रोजगार हमी योजनेवर मुकादम असताना मुकादमाकडून मजुरांना मिळणाऱ्या 3 रुपये रोजंदारीपैकी 1 रुपये कापले जायचे या शोषणाविरुद्ध गावितांनी आवाज उठविला आणि कष्टकऱ्यांना न्याय मिळवून दिला.
10 विधानसभा अन् तीन लोकसभा निवडणुका लढवल्या
1978 सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे तत्कालीन नेते नरेंद्र मालुसरे यांनी त्यांना निवडणुकीसाठी गळ घातली. त्यावेळी 11 उमेदवार रिंगणात असताना सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली. मात्र, गावित हे पहिल्यांदा विजयी झाले. मिळालेल्या आमदारकीच्या संधीचे त्यांनी सोने केले. विधानसभेत जनतेसह आदिवासी, दलित, शोषित व कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडून त त्यांना न्याय मिळवून दिला. त्यानंतर झालेल्या 1980, 1985, 1990 असा सलग तीन वेळा सुरगाणा - पेठ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळविला. 1995 साली त्यांना पराभव पत्करावा लागला. पुन्हा 1999, 2004 झाली विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. मात्र 2009 साली मतदार संघाचे विभाजन झाले आणि कळवण - सुरगाणा असा मतदार संघ अस्तित्वात आला. तेव्हा त्यांना माजी मंत्री ए. टी. पवार यांच्याकडून त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. पुढे 2014 साली जिवा पांडू गावित यांनी मंत्री ए.टी. पवार यांचा पराभव करीत पराभवाची परतफेड केली. नंतर पुन्हा 2019 च्या निवडणुकीत पुन्हा गावितांना पराभव पत्करावा लागला. आता पुन्हा ते 2024 ची विधानसभा लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
लोकसभेला शरद पवारांची ऑफर नाकारली
आतापर्यंतच्या सर्व निवडणुका त्यांनी एकच पक्ष आणि एकाच चिन्हावर लढविल्या आहेत. निवडणुकीतील जय पराजय हा भाग त्यांच्यासाठी अलहिदा. मात्र पक्षनिष्ठेला गावित यांनी आपल्या राजकीय जीवनात सर्वोच्च स्थान दिले आहे. नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महविकास आघाडीचे राज्यात वारे होते. स्वतः शरद पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. खासदारकी चालून आली असताना गावित यांनी पक्षनिष्ठा, तत्व व विचारधारेला बांधील राहत नम्रपणे ही ऑफर नाकारली. 75 वर्षीय गावित आज पुन्हा 11 व्या वेळेस विधानसभा निवडणुकीला उत्साहात आणि जोमाने सामोरे जात आहेत. निवडणुकीचा निकाल काय लागेल हा भाग वेगळा असला तरी आजच्या काळात असा एकनिष्ठ, पक्षनिष्ठा बाळगणारा नेता मिळणे तसे दुर्लभ आहे.
आणखी वाचा