(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बीडमध्ये दोन घटना, प्रेमसंबंधातून तरुणाने संपवले जीवन; हॉटेलमध्ये कपल पाहून जमाव संतप्त
अनिकेतचे मागील चार वर्षांपासून एका मुलीबरोबर प्रेम संबंध होते, या दोघांचे लग्न करायचे देखील ठरले होते.
बीड : प्रेमविवाह किंवा प्रेमसंबंधातून अनेकदा कुटुंबीयांच्या संमतीने जोडप्यांचे लग्न होऊन सुखाचा संसार सुरू होतो. मात्र, बहुतांश प्रकरणात प्रेमसंबंधाचे लग्नात रुपांतर होताना अनेक अडचणींचा सामना दोन्ही तरुणांना करावा लागतो. मुलगा किंवा मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध असतो, जातीचा विरोध असतो, समाजाचा किंवा गरीब-श्रीमंत या दरीतला विचारही खोलवर रुजलेला असतो. त्यामुळे, प्रेमसंबंधातून लग्न न झाल्याने ही तरुणी टोकाचं पाऊल उचलते. बीड (Beed) जिल्ह्यातील नेकनूर येथेही अशीच धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या आई-वडिलांकडून लग्नास नकार मिळाल्याने बीडच्या नेकनूर येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिकेत थोरात असं या तरुणाचं नाव असून त्याचा मृतदेह एका मंगल कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलाय. या घटनेनं नेकनूर शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, पोलिस (Police) अधिक तपास करत आहेत.
अनिकेतचे मागील चार वर्षांपासून एका मुलीबरोबर प्रेम संबंध होते, या दोघांचे लग्न करायचे देखील ठरले होते. यादरम्यान मुलीचे आई-वडील अनिकेतच्या घरी गेले असता मुलगी द्यायची की नाही यावरून वाद झाला. याच वादातून अनिकेत घरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर, कुटुंबीयांनी व मित्रपरिवाराने परिसरात शोधाशोध केली असता एका मंगल कार्यालयात अनिकेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, अनिकेतच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून त्यात पाच नावे आहेत. आता, या प्रकरणात नेकनूर पोलीस अधिक तपास करत आहे.
हॉटेलमध्ये कपल, जमाव हिंसक
दुसरीकडे बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका नामांकित हॉटेलमध्ये दोन जोडपे गेल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हे जोडपे ओळखीचे असल्याने काही जमाव एकत्र जमा झाला आणि जमावाकडून जोडप्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमाव हिंसक होत असल्याचं पाहून पोलिसांनी चक्क लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. तब्बल अर्धा तास हा गोंधळ सुरूच होता. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. सध्या बीडमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे.
हेही वाचा
हाच का 30 वर्षांतला विकास; माढ्यात डिजिटल झळकले, राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्य; अज्ञाताचा शोध सुरू