Nagpur Online Fraud : कथित बुकी सोंटू जैनच्या मालमत्तेच्या कस्टडी प्रकरणी 40 कोटींचा बॉण्ड जमा करा; जिल्हा सत्र न्यायालयाचे निर्देश
Nagpur Crime : कथित बुकी अनंत उर्फ सोंटू जैन याच्या घरी जप्त केलेल्या मालमत्तेच्या कस्टडीसाठी 40 कोटी रुपयांचा बॉण्ड जमा करा, असे निर्देश जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीने आयकर विभागाला देण्यात आले आहे.
Nagpur Crime News नागपूर : ऑनलाइन गेमिंग फसवणूक (Online Gaming Fraud) प्रकरणातील कथित बुकी अनंत उर्फ सोंटू जैन याच्या घरी जप्त केलेल्या मालमत्तेच्या कस्टडीसाठी 40 कोटी रुपयांचा बॉण्ड जमा करा, असे निर्देश जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीने आयकर विभागाला देण्यात आले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) गोंदिया (Gondia) येथील कथित बुकी अनंत उर्फ सोंटू जैन याच्या घरी धाड टाकून 17 कोटी रोख आणि 2 कोटी 44 लाख रुपयांचे सोने-चांदी जप्त केले होते. त्यानंतर जप्त केलेल्या मालमत्तेचा स्त्रोत आणि इतर चौकशीसाठी आयकर विभागाला या मालमत्तेची कस्टडी पाहिजे होती. मात्र, मालमत्तेची कस्टडी घेण्यापूर्वी मालमत्ता सुरक्षित राहावी यासाठी आयकर विभागाने 40 कोटी रुपयांचा बॉण्ड भरण्याचे निर्देश जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहे.
ऑनलाईन गेमच्या माध्यमातून कोट्यावधींची फसवणूक
सोंटू जैनने ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून नागपुरात स्थायिक झालेल्या एका मोठ्या तांदूळ व्यापाऱ्याच्या तरुण मुलाची कोट्यावधी रुपयांनी फसवणूक केली होती. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून झटपट कोट्यवधी रुपये कमवण्याचे स्वप्न दाखवून ही फसवणूक करण्यात आली होती. त्याने अशाच पद्धतीने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सोंटू दुबईत पळ काढला होता. पोलिसांना तपासातून मिळलेल्या माहितीप्रमाणे सोंटू जैनचं स्वतःचं गेमिंग ॲप होतं आणि त्याच्या माध्यमातून तो ॲप नियंत्रित करुन खेळणाऱ्याचा विजय किंवा पराभव नियंत्रित करत होता. त्यातूनच त्याने कोट्यावधींची संपत्ती जमवली होती. अशातच या तपासाचे धागे-दोरे आता पुढे सरकतांना जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीने आयकर विभागाला महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
घरात सोनं, चांदी, रोख रक्कमेसह कोट्यावधींची माया
सोंटू जैनवर नागपुरातील एका व्यापाऱ्याची ऑनलाईन गेमिंगमध्ये 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणासंदर्भात नागपूर पोलिसांनी 22 जुलै रोजी गोंदिया येथे सोंटू जैनच्या घरी धाड टाकून तब्बल 16 कोटी 89 लाखांची रोकड, 12 किलो 403 ग्रॅम सोनं आणि 294 किलो चांदी असा 27 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर गोंदियामधील काही बँक लॉकरमधूनही 4.54 कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली होती. त्यामुळे आता सोंटू जैनच्या घरी जप्त केलेल्या याच मालमत्तेच्या कस्टडीसाठी 40 कोटी रुपयांचा बॉण्ड जमा करा, असे निर्देश जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीने आयकर विभागाला देण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या