कांदा निर्यातबंदीला 4 महिने पूर्ण, शेतकऱ्यांना आर्थिक फटका; निर्यात सुरु करण्याची मागणी
कांदा निर्यातबंदी करुन 4 महिने पूर्ण झाले आहेत. अद्यापही सरकारनं निर्यातबंदी उठवली नाही. त्यामुळं सरकारनं तातडीनं निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करतायेत.
Onion Export Ban : सध्या देशातील कांदा उत्पादक (Onion Farmer) शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कांदा निर्यातबंदीचा मोठा फटका शेतकऱ्यांना (Farmers) बसतोय. कांदा निर्यातबंदी करुन 4 महिने पूर्ण झाले आहेत. अद्यापही सरकारनं निर्यातबंदी उठवली नाही. त्यामुळं सरकारनं तातडीनं निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करतायेत.
8 डिसेंबर 2023 मध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी
केंद्र सरकारनं कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 8 डिसेंबर 2023 मध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. या घटनेला चार महिने पूर्ण झाले आहेत. या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. दरात मोठी घसरण झालीय. त्यामुळं कांद्याच्या निर्यातीवर बंदी उठवावी अशी मागणी केली जातेय. सध्या शेतकऱ्याच्या कांद्याला प्रतिकिलो पाच रुपयापासून 15 रुपयापर्यंतचा दर बाजारात मिळत आहे. निर्यातबंदीच्या पूर्वी कांद्याला बाजारात 4000 रुपयांचा दर मिळत होता. मात्र, निर्यातबंदी केल्यानंतर कांद्याला 800 ते 1000, 1200 रुपयापर्यंतचा दर प्रतिक्विंटलला मिळत आहे. याचा मोठा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय.
दरम्यान, सरकारनं कांद्याची निर्यातबंदी करताना 31 मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी असल्याचं सांगितलं होतं. मात्र, 31 मार्चला काही निर्यातबंदी उठवली नाही. पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार असल्याची माहिती सरकारनं दिली. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसेच विविध शेतकरी संघटनांनी देखील सरकारला इशारा दिलाय. लवकरात लवकर कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करु अशा इशारा संघटनांनी दिलाय.
कोणत्या बाजारपेठेत कांद्याला किती दर?
पुण्याच्या बाजारात आज कांद्याला 500 रुपये ते कमाल 1500 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. तर सरासरी 1000 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. तर कोल्हापूरच्या बाजारात कांद्याला 500 ते 1800 रुपयांचा प्रतिक्विंटलला दर मिळत आहे. म्हणजे सरासरी कांद्याला 1200 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. चंद्रपूरच्या बाजार समितीत कांद्याला 1300 ते 2000 रुपयांचा दर मिळत आहे. तिथं सरासरी कांद्याला 1500 रुपयांचा दर मिळत आहे. म्हणजे सगळीकडील दराचा विचार केला तर सरासरी कांद्याला 1000 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.
निवडणुकीच्या तोंडावर महागाई नियंत्रीत ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न
महाराष्ट्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. मात्र, दरात सातत्यानं चढ उतार होत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. कांद्याचा दर वाढला की सरकार निर्यातबंदी सारखे निर्णय घेते. मात्र, कांद्याचे दर कमी झाले की सरकार कोणताही निर्णय घेत नसल्याची भूमिका शेतकरी मांडत आहेत. दरम्यान, सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत. अशात सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्याही वस्तूचे दर वाढू नयेत अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळं सरकार कांद्याचे दर वाढू देत नाही. कारण दरवाढ झाल्यास निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं महागाई नियंत्रीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय.
महत्वाच्या बातम्या: