Atal Pension Yojana : केंद्र सरकारच्या योजनेत 210 ते 1454 रुपयांची गंतवणूक करा अन् 5 हजार रुपये पेन्शन मिळवा, जाणून घ्या
Atal Pension Scheme : अटल पेन्शन योजनेमध्ये दरमहा 210 रुपयांपासून ते 1456 रुपयांची गुंतवणूक केल्यास वयाच्या 60 वर्षानंतर पात्र नागरिकांना 1 ते 5 हजार रुपयांची रक्कम निवृत्तीनंतर मिळेल.
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) देखील त्यापैकी एक आहे. अटल पेन्शन योजनेत 18 ते 40 वर्ष वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकते. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला 1 ते 5 हजार रुपयांची पेन्शन दरमहा मिळू शकते. यासाठी या योजनेत दरमहा 210 रुपयांपासून 1456 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
अटल पेन्शन योजनेच्या अटी?
अटल पेन्शन योजना ही पेन्शन निधी विनियामक आणि प्राधिकरणाद्वारे नियंत्रित केली जाते. या योजनेत सहभागी होणारा व्यक्ती हा भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. याशिवाय त्याचं वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेसाठी खातं उघडता येतं. या योजनेचं खातं उघडताना नॉमिनी म्हणजे वारसदार आणि जोडीदाराची माहिती भरावी लागते. अटल पेन्शन योजनेसाठी दरमहा रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध असतो किंवा तिमाही अथवा सहा महिन्यातून एकदा देखील योगदान देता येऊ शकतं.
अटल पेन्शन योजनेचा तिहेरी लाभ
अटल पेन्शन योजनेत सहभागी व्हायचं असल्यास ज्याचं वय 18 वर्ष असेल त्यानं या योजनेत सहभागी व्हायचं ठरवल्यास त्याला 210 रुपये दरमहा भरावे लागतील. 40 वर्ष वय असणाऱ्या व्यक्तीला दरमहा 1456 रुपये भरावे लागतील. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला 5 हजार रुपयांपर्यंत रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते. हिच पेन्शन ज्यानं योजनेसाठी अर्ज केला आहे त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जीवन साथीदाराला मिळते. एखाद्या प्रकरणात वर्गणीदार आणि त्याच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यास वारसदाराला 60 वर्षांपर्यंत जमा झालेली रक्कम मिळते.
या योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही?
जे व्यक्ती आयकर भरतात त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळं आयकर भरणाऱ्या व्यक्तींना या योजनेत सहभागी होता येत नाही. तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत या योजनेसाठी अर्ज दाखल करु शकता. या योजनेत अर्ज दाखल केल्यानंतर दरमहा रक्कम ऑटो डेबिट हा पर्याय स्वीकारुन दरमहा रक्कम गुंतवता येते. या योजनेतून बाहेर देखील पडता येतं, अशा प्रकरणांमध्ये नागरिकांना अटल पेन्शन योजनेच्या खात्याचा देखभाल खर्च भरावा लागतो.
दरम्यान, अटल पेन्शन योजनेत सहभागी झाल्यानंतर प्रीमियमची रक्कम कमी अथवा वाढवता देखील येते. हा पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आतापर्यंत अटल पेन्शन योजनेत 6 कोटी 85 लाख व्यक्ती सहभागी झाले आहेत.
इतर बातम्या :