BLOG : रॅडिकल (2023) - मॅक्सिकन अंडरडॉग्सचं भारतीय कनेक्शन
BLOG : मंसूर खानचा जो जीता वही सिकंदर (1992) आठवतोय? पैजामा छाप मॉडेल कॉलेजचा संजय लाल (आमिर खान) राजपूत कॉलेजच्या शेखर मल्होत्राला (दीपक तिजोरी) निर्णायक सायकल रेसमध्ये हरवतो. तोवर प्रेक्षक पैजामा छाप अंडरडॉग्सच्या प्रेमात पडलेले असतात. त्यांच्याशी भावनिक नातं तयार झालेलं असतं. जो अंडरप्रिव्हिलेज आहे तो जास्त आवडायला लागतो. त्याचा स्ट्रगल आवडतो. अंडरडॉग्सच्या सक्सेस स्टोरी वाचायला - पाहायला आवडतात. अंडरडॉग ही संकल्पना हॉलीवूडमध्ये वाढली. ती प्रेक्षकांना आवडली. जगभरात या अंडरडॉग्सच्या गोष्टींना मोठी मागणी आलीय.
या अश्या इन्स्पायरींग कथानकांची चर्चा होते तेव्हा एक नाव सातत्यानं पुढे येतं. जोशुआ डेव्हिड. जोशुआ पत्रकार आहेत. वायर्ड (Wired) या सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या अमेरिकन मॅगझीनमध्ये लिहितात. एपिक (Epic) या मॅगझीनचे ते को-फाऊंडर आहेत. त्यांनी लिहिलेले लेख आणि पुस्तकांवर सिनेमे बनलेले. स्पेअर पार्ट्स (2015) आणि आत्ताचा मॅक्सिकन स्पॅनिश भाषेतला रॅडिकल (2023) हे त्यापैकीच आहेत. स्पेअर पार्ट्समध्ये अमेरिकन ड्रीमची संकल्पना आहे. छोट्या शहरातल्या चार अंडर प्रिव्हिलेज मुलांची गोष्ट. चार धडपडी मुलं, दोन विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि एक रोबड बनवण्याची स्पर्धा अशी स्पेअर पार्ट्सची गोष्ट आहे.
वायर्डमध्ये इन्स्पायरींग स्टोरी करताना त्यांना सक्सेस स्टोरीचे असंख्य मेल यायचे. असाच एक मेल आला. त्यात कार्ल हेडन कम्युनिटी हायस्कूल, फिनिक्स, अॅरिझोना इथले चार विद्यार्थी रोबोट बनवत असल्याची माहिती होती. मेलमध्ये इंग्रजीच्या असंख्य चुका होत्या. ही मुलं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलेफोर्नियात आयोजित मरीन एडवांस टेक्नॉलॉजी एज्युकेशन रोबोटीक स्पर्धेत भाग घ्यायला आले होते. त्यांनी एक विचित्र दिसणारं रोबोटही बनवलं होतं. ही रोबट बनवण्याची गोष्ट भन्नाट होती. हे जोशुआ यांनी त्या कॉलेजला फोन केल्यावर समजलं. प्रत्यक्षात तिथं गेल्यावर रोबट बनवण्याची ही गोष्ट जबरदस्तच निघाली. त्यावर जोशुआ यांनी पुस्तक लिहिलं - Spare Parts: Four Undocumented Teenagers, One Ugly Robot, and the Battle for the American Dream. यावर सीन मॅनामरा या दिग्दर्शकानं स्पेअर पार्ट (२०१५) हा सिनेमा बनवला. तो जगभरात गाजला.
यंदा जोशुआंच्या वायर्ड मॅगझीनमध्ये प्रकाशित न्यूज आर्टिकलवरचा सिनेमा रॅडिकल (2023) चांगलाच गाजतोय. नुकत्याच पार पडलेल्या सॅन फ्रान्सिस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये रॅडिकलला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसा स्पेशल अवार्ड सिनेमाला मिळालाय. अमेरिका बॉर्डरवर असलेल्या मॅक्सिकन मॅटामोरोस शहरातली ही खरीखुरी गोष्ट आहे. इथल्या शालेतली अंडरप्रिव्हिलेज मुलं आणि शिकवण्यासाठी काही तरी नवीन करण्याची धडपड करणारा एक तरुण शिक्षक हे सिनेमाचे हिरो आहेत.
मॅटामोरोस शहर ड्रग्स माफियांसाठी सुप्रसिद्ध आहे. तिथं ड्रग्स विकणाऱ्या गँगमध्ये रोजच मारामारी आणि खून होत असतात. रस्त्यावर बेवारस पडलेले ड्रग्स पेडलर्सचे मृतदेह लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग आहेत. शहरात कचऱ्याचा डोंगर आहे. मॅक्सिकोतल्या अगदी आतल्या भागातून इथं लोक स्थलांतर करुन आलेत. ते इथं मिळणाऱ्या भंगारावर दोन वेळचं खायला मिळेल एव्हढं कमवतात. हातातोंडाची मारामारी आहे. शालेय मुलांचा वापर ड्रग्स तस्करीसाठी केला जातो. या अशा वातावरणात वाढत असलेली पालोमा नोयोला ब्युन्यू ही मुलगी मॅक्सिकोतल्या राष्ट्रीय स्पर्धेत पहिली आली. यानंतर सर्व देशाचं लक्ष या शहराकडे गेलं. वायर्डनं पालोमाला मॅक्सिकोतली स्टिव्ह जॉब्स म्हणत फ्रंट पेज वर चमकवलं. त्यात A Radical way of unleashing a generation of geniuses हे आर्टिकल जोशुआ डेव्हिडनं लिहिलं होतं. त्याचावरच रॅडिकल (2023) हा सिनेमा बनलाय.
रॅडिकलला भारतीय कनेक्शन आहे. सिनेमाचा हिरो सागियो कोऱ्या हा शिक्षक मॅटामोरोस शहरातच वाढला होता. इथली परिस्थिती पाहता शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या फारच कमी होती. सुरूवातीला मुलं आली तरी काही दिवसांनी गळायची. पुस्तकांतून शिकणं त्यांना कंटाळवाणं वाटायचं. नवीन काय करता येईल याचा विचार करताना साजियोला भारतातले टेडेक्स स्पीकर सुगाता मित्रा यांचा व्हिडिओ सापडला. सुगाता आयआयटी दिल्लीतून शिकलेत. ते कॉम्प्युटर सायन्टिस्ट आहेत. त्यांनी या व्हिडिओत दिल्लीतल्या कालकाजीत केलेल्या प्रयोगाची माहिती दिलीय. “Hole in the Wall” असं या प्रयोगाचं नाव होतं. आयआयटी दिल्ली कॅम्पसच्या भिंतीला त्यांनी भोक पाडलं. तिथं एक कॉम्प्युटर बसवला. आता तिथं नक्की काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी वरती सीसीटिव्ही बसवले. या भिंतीला लागून झोपडपट्टी आहे. तिथल्या मुलांनी तो कॉम्प्युटर हाताळायला सुरुवात केली. तोपर्यंत त्यांनी कधीच कॉम्प्युटर पाहिला नव्हता. कुणाच्याही मार्गदर्शन शिवाय या मुलं काही दिवसांत कॉम्प्युटर शिकले. त्यावर गेम खेळायला लागले. काही जण त्यावर पेंटींग करायला लागले. काही मुलांनी चक्क कविता लिहिल्या. आता हा भिंतीतल्या भगदाडातला कॉम्प्युटर झोपडपट्टीतल्या प्रत्येकाला आपल्याकडे खेचत होता. आता वयाची मर्यादा राहिली नाही. सुगाता मित्रांनी या प्रक्रियेेला नाव दिलं “Minimally Invasive Education,” कुठलंही मार्गदर्शन नसताना मुलांनी स्वत:च शिकणं. या व्हिडिओत मित्रा यांनी अशी अनेक उदाहरणं दिली होती. 2013 पर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. डाऊनलोड केला.
मॅक्सिकोतला सागियो कोऱ्या त्यापैकी एक होता. त्याने सुगाता मित्रांचा हा प्रयोग आपल्या विद्यार्थ्यावर केला. त्यातून पालोमा सारखी विद्यार्थी तयार झाली. जिणं शाळेचं नाव जगभरात पोचवलं. १५ ऑक्टोबर २०१३ ला वायर्डमध्ये जोशुआ डेव्हिड यांची स्टोरी छापून आली. बरोबर 10 वर्षांनी ख्रिस्तोफर झॅलानं यावर रॅडिकल हा सिनेमा बनवलाय. जोशुआ डेव्हिड यांनी या सिनेमाची निर्मिती केली. या सिनेमात शालेय शिक्षण पध्दतीत काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदल करायला हवेत… मुलं वाढवण्याची आर्थिक परिस्थिती नसेल तर अबॉर्शनचा पर्याय असावा असं ठासून सांगण्यात दिग्दर्शक झॅला यशस्वी झाला आहे.