एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

BLOG | ....अमृता @101

समाजानं आखून दिलेली रूढी परंपरांची लक्ष्मणरेषा ओलांडणं ज्या काळात पाप करण्यापेक्षा कमी समजलं जात नव्हतं त्या काळात तिने स्वतःच्या कार्यकर्तृत्वाच्या रेषा स्वतःच आखल्या. ज्या काळात घराबाहेर पडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हे स्त्रियांसाठी महाकर्मकठीण काम होतं त्या काळात ती स्वच्छंदपणे आकाश, समुद्र सारं काही धुंडाळून आली.

>> निकिता सुनिल पाटील काळाची बंधनं जिनं तोडली आणि येणाऱ्या काळाशी अनभिज्ञ न राहता त्याच काळावर स्वतःचं नाव कोरत जी बिनधास्तपणे पुढे निघून गेली अशा अमृता प्रीतमचा ३१ ऑगस्टला १०१ वा जन्मदिवस... प्रेम आणि द्वेष, स्वातंत्र्य आणि स्वैराचार, सहजीवन आणि विरह असा प्रत्येक बिंदू जिच्या आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्याला स्पर्श करून जातो... जिच्या वेदना असंख्य स्त्रियांच्या वेदनांचं प्रतिनिधित्व करतात...  आणि याच वेदनांमधून साकारलेल्या जिच्या अमूर्त प्रेमाची कथा येणाऱ्या पिढ्यांसाठी एक चिरकालीन दंतकथा म्हूणन कायमच जिवंत राहते, त्या प्रसिद्ध साहित्यिक अमृता प्रीतम यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा एक प्रयत्न...
अमृतानं पहिली बंडखोरी केली स्वतःच्या घरात. घरी येणाऱ्या मुस्लिम व्यक्तींसाठी माळ्यावरच्या एका कोपऱ्यात ठेवलेले,  एरवी कधीही नं वापरले जाणारे तीन ग्लास तिने घरातल्या इतर भांड्यामध्ये आणून ठेवले. जणू घरातल्या भांड्यांनाही दिलेल्या जातीधर्माच्या मर्यादा तिने त्या लहानश्या वयात तोडून टाकल्या. वयाच्या अकराव्या वर्षी आईचा मृत्यू,  आईच्या मृत्यूनंतर वडिलांच अलिप्तपण,  सोळाव्या वर्षी न कळत्या वयात झालेलं लग्न, लग्नानंतर होत असलेली घुसमट, आयुष्याच्या एका वळणावर भेटलेला साहिर, आणि अमृता साहिरवर जितकं प्रेम करायची तितकंच  प्रेम अमृतावर करणारा इमरोज... प्रत्येक कोपरा अन कोपरा भटकून आलेला तिचा हा प्रवास ती आयुष्यभर शब्दबद्ध करत राहिली...
समाजानं आखून दिलेली रूढी परंपरांची  लक्ष्मणरेषा ओलांडणं ज्या काळात पाप करण्यापेक्षा कमी समजलं जात नव्हतं त्या काळात तिने स्वतःच्या कार्यकर्तृत्वाच्या रेषा स्वतःच आखल्या. ज्या काळात घराबाहेर पडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हे स्त्रियांसाठी महाकर्मकठीण काम होतं त्या काळात ती स्वच्छंदपणे आकाश, समुद्र सारं काही धुंडाळून आली. लग्नाआधी होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा पाहणंसुद्धा ज्यावेळी शक्य नव्हतं त्यावेळी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी अमृता ही बंडखोरीच्या,  विद्रोहाच्या शिखरावर पोहचलेली, असंख्य स्त्रियांची रोल मॉडेल झालेली नायिका होती. पण तिच्या बंडखोरीला, स्वच्छंदीपणाला केवळ लिव्ह इन रिलेशनशिपपुरता किंवा तिच्या सिगारेट ओढण्यापुरता मर्यादित ठेवता येणार नाही. राज्यसभेत खासदार असतानाही स्त्रियांचे असंख्य प्रश्न अमृतानं मांडले. जगातल्या विविध समाजगटातल्या  प्रत्येक स्त्रीच दुःख, अडचणी सारंच काही अमृतानं भोगलं असं नव्हे.  पण स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या असहायतेचं, अडचणीचं,  त्रासाचं मूळ तिला उमगलं होतं. दुःखाचा सागर कितीही विस्तीर्ण असला तरी त्याचा किनारा तिला सापडला होता... म्हणून तिची बंडखोरी तिच्यापुरती मर्यादित राहिली नाही... ती कण्हत राहिली तिच्या लेखणीतून... तो अनेकांचा आवाज बनत गेला.
अमृताच्या 'आज आख्खा वारीस शाह नूं' या एका कवितेनं भारत-पाकिस्तानची सीमा अदृश्य करून टाकली.  फाळणीच्या यातना, त्यानंतर झालेला रक्तसंहार जेवढा भारताच्या वाट्याला आला, तेवढाच तो पाकिस्ताननंही भोगला.  त्यामुळे पुढची कित्येक वर्ष पाकिस्तानातल्या वारीस शहाच्या कबरीवर अमृताची कविता फुलं उधळावीत तशी गायली जात होती. वारीस शहा हा अठराव्या शतकातला प्रसिद्ध सुफी शायर ज्यानं हीर-रांझा या जोडीतल्या हीरचं महाकाव्य लिहिलं. असं म्हणतात वारिस शहाला हीरचं दुख कळलं त्यानं तिच्यावर महाकाव्य लिहलं.. आणि त्यानंतर रांझावर प्रेम करणाऱ्या हीरपेक्षा वारिसनं लिहिलेली हीर म्हणून ती अमर झाली.. वारिसला पंजाबच्या एका कन्येचं दुख कळलं पण फाळणीची विदारक चित्र डोळ्यांदेखत पाहणाऱ्या अमृताला अशा असंख्य पंजाबी मुलींचा आक्रोश ऐकायला आला...  विषण्ण मनानं आपल्या कवितेतून तिनं वारिसला साद घातली आणि जसं वारिसनं हिरला अमर केली तसं अमृतानं आपल्या कवितेतून वारीसला अमर केलं...
1950 साली प्रकाशित झालेली तिची पिंजर ही कादंबरी नंतर खुशवंतसिंग यांनी कंकाल म्हणून हिंदीत अनुवादीत केली. 1993 मध्ये त्यावर हिंदी चित्रपटही प्रदर्शित झाला. ही कादंबरी फाळणीचा असंख्य कुटुंबांवर झालेला खोलवर परिणाम विशद करते. सोबतच रक्ताच्या नात्यांमधला फोलपणा उघड करते.  मूठभर दांभिकांच्या धर्मवेडेपणामुळे बहुसंख्य लोकांच्या आयुष्याची झालेली वाताहत तिच्या कादंबरीची नायिका 'पुरो' ही नेमकेपणानं साकारते. फाळणीच्या वातावरणात, झालेल्या दंगलीत अनेक माणसं तावुनसुलाखून जगलीही. ही जिवंत पण मनानं मोलेली माणसं, मनानं कुजलेली माणसं तिनं दाखवली .जसं हिरोशिमा नागासाकीमधल्या अणुबॉम्बच्या खुणा आजही शारीरिकरित्या दिसतात... तशाच फाळणीमुळे प्रत्येकाच्या मनावर, श्रद्धांवर, गुण-स्वभाववैशिष्ट्यांवर कोरल्या गेलेल्या खुणा अमृतानं दाखवल्या. प्रश्न देशाचा असला तरी तिची नायिका एक स्त्री आहे कारण कोणत्याही अंतर्गत-बाह्य वादांमध्ये पुरती होरपळली जाते ती स्त्री, याची तिला पुरेपुर जाणीव होती.
अमृता म्हणते, 'गरोदरपणात एखाद्या देवाची किंवा एखाद्या  सुंदर व्यक्तीची प्रतिमा डोळ्यासमोर असली तर बाळही तसंच सुंदर जन्माला येतं असं म्हणतात. म्हणून मी माझ्या प्रियकराची साहिरची रात्रंदिवस कल्पना करायला लागले. आणि अहो आश्चर्ययम मुलगा नवराजही बराचसा साहिरसारखा दिसतो.'
कळत्या वयात आल्यावर मुलगा नवराज आपल्या आईला अमृताला विचारतो, 'मी साहिरचा मुलगा आहे का?' अमृता म्हणते, 'किती सुखदायी असतं जर तू साहिरचा मुलगा असतास तर...' व्यक्त होण्यासाठीची एवढी ताकद येते कुठून...आधुनिकतेची लेबलं लावून फिरणारी कितीतरी जोडपी विरहाच्या चटक्यांनी कुंठत आयुष्याची वर्ष फक्त घालवत राहतात. अन्यथा लग्नाचं निमित्त मिळाल्यावर प्रेमाला व्यभिचाराची लेबलं तरी लागतात. अशावेळी अमृतानं तिच्या मुलाला दिलेलं हे उत्तरं,  काहीही न लपवता जगासमोर उघड केलेले तिच्या प्रेमाचे कंगोरे हे काळाच्या कितीतरी पुढे गेलेले जाणवतात. तिची एक कविता ------
साइंसदानों दोस्तों!
गोलियाँ, बन्दूकें और एटम बनाने से पहले इस ख़त को पढ़ लेना! हुक्मरानों दोस्तो! गोलियाँ, बन्दूकें और एटम बनाने से पहले इस ख़त को पढ़ लेना! सितारों के हरफ़ और किरनों की बोली अगर पढ़नी नहीं आती किसी आशिक–अदीब से पढ़वा लेना अपने किसी महबूब से पढ़वा लेना और हर एक माँ की यह मातृ–बोली है तुम बैठ जाना किसी भी ठांव और ख़त पढ़वा लेना किसी भी माँ से फिर आना और मिलना कि मुल्क की हद है जहाँ है
वरवर पाहिलं तर तिच्या बऱ्याच कविता वैयक्तिक प्रेमकविता वाटतात.  पण त्या वैयक्तिक नाही तर समाजाशी जोडल्या गेलेल्या आहेत. कारण अमृतानं प्रेमाची व्याख्या फक्त साहिर, इमरोजपुरती मर्यादित ठेवली नाही. तिची व्याख्या व्यापक रीतीने तिने देशातल्या विविध जाती-धर्मातल्या द्वेषभावनेशी जोडली. प्रेमात अशी ताकद आहे जी अणुबॉम्बलाही निष्क्रिय करू शकते हे जाणलं आणि जाणवलं ते अमृताला.
राजकारण हा विषयही तिच्या लेखणीतून सुटला नाही. शासकीय, प्रशासकीय यंत्रणांच्या संथपणावर, वेळखाऊपणावर ताशेरे ओढताना आपल्या एका पत्रात ती म्हणते,
'मैं – एक आले में पड़ी पुस्तक। शायद संत–वचन हूँ, या भजन–माला हूँ, या काम–सूत्र का एक कांड, या कुछ आसन, और गुप्त रोगों के टोटके पर लगता है मैं इन में से कुछ भी नहीं। (कुछ होती तो ज़रूर कोई पढ़ता) सभा में जो प्रस्ताव रखा गया मैं उसी की एक प्रतिलिपि हूँ जो पास हुआ कभी लागू न हुआ और अब सिर्फ़ कुछ चिड़ियाँ आती हैं चोंच में कुछ तिनके लाती हैं और मेरे बदन पर बैठ कर वे दूसरी पीढ़ी की फ़िक्र करती हैं क्या किसी प्रस्ताव की कोई दूसरी पीढ़ी नहीं होती?'
अमृताला साहित्य अकादमी,  पदमश्री, पदमविभूषण, ज्ञानपीठ, असे अनेक पुरस्कार मिळाले. रशियापासून फ्रान्सपर्यंत परदेशातली अनेक निमंत्रणं, दिल्ली विद्यापीठ, जबलपूर विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठांच्या मानद पदव्यांनी तिला सन्मानित करण्यात आले. पण तिची लेखणी, तिचे शब्द, तिची अभिव्यक्ती केवळ सन्मान आणि पुरस्कारांच्या तराजूत तोलता येणार नाही. कारण अमृताच्या जीवनपद्धतीवर, तिच्या साहित्यकृतींवर मोठी टीकाही झाली.  गरोदर असताना तिने गुरुनानकांची आई माता त्रिप्ता यांना डोळ्यासमोर ठेवून एक कविता लिहिली. त्यावरून मोठे वादंग झाले. या कवितेमुळे अमृता मुळातच कामुक असल्याचे शेरेही तिच्यावर मारण्यात आले.
अमृताला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्या वर्षी ती स्वत: साहित्य अकादमी पुरस्काराच्या निवड समितीवर होती. त्यामुळे या पुरस्कारानंतर तिच्यावर अनेक आरोप झाले. प्रख्यात साहित्यिक खुशवंतसिंग यांनीसुद्धा त्यावेळी अमृताला मिळालेल्या पुरस्कारावर आक्षेप घेतला होता. तिच्यावर होणारे आरोप तिच्या मृत्यूनंतरही थांबले नाहीत. फरक फक्त एवढाच पडला की जिवंत असताना आपल्यावर होणारी टीका, केले जाणारे आरोप तिनं दुर्लक्षित केले आणि त्यांचा आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीत, लेखनशैलीत कधी अडसर येऊ दिला नाही आणि तिच्या मृत्यूनंतर तर तिच्यावर केलेली टीकाच अनेकांच्या प्रसिद्धिला, ग्लॅमरला कारणीभूत ठरली.
ऐंशी-नव्वदच्या दशकात प्रकाशित झालेली पंजाबी लेखक गुरबचनसिंग भुल्लर यांची ‘ये जन्म तेरे लेखे’ ही कादंबरी अनेक समीक्षकांच्या वादाचा विषय ठरली. एक प्रथितयश कवी या कादंबरीचा नायक आहे आणि स्वत:च्या फायद्यासाठी, प्रसिद्धीसाठी या नायकाचा वापर करुन घेणारी स्वार्थी स्त्री या कांदबरीची नायिका.  पंजाबी समीक्षक गुरदीयाल बाल यांनी या नायक-नायिकेचा संबंध अमृताच्या जीवनाला केंद्रस्थानी ठेवून जोडला गेला आहे, असा आरोप केला. त्यावर नंतर बरीच वर्ष उलटसुलट चर्चाही झाली. कालांतराने या कादंबरीवर आधारित पंजाबी चित्रपटही आला. महत्त्वाचा मुद्दा असा की अमृतानं समाजातले तशाकथित समज नाकारुन तिच्या वैयक्तिक  आयुष्यातले चांगले वाईट सगळे पत्ते खुले केले. तिच्या या स्वतंत्र विचारांचं मोठं कौतुकही झालं. पण त्याचवेळी दुसरा एक वर्ग असाही होता की, स्वत:च्या मर्जीनं जगणारी आणि कलेचा स्वत:च्या कलाकलानं मागोवा घेणारी स्त्री या वर्गाला मान्यच नव्हती.
सरंजामशाही आणि पुरुषप्रधान वातावरणात जगलेल्या, वाढलेल्या या वर्गाकडे इतका उदारपणा दाखवण्याची लवचिकताच नव्हती मुळी. अमृतानं या साऱ्याला उघडउघड उत्तर देण्यापेक्षा आपल्या लेखनातून ती प्रत्युत्तर देत राहिली.1983 मध्ये बल्गेरियात झालेल्या शब्द महोत्सवासाठी अमृता निमंत्रित पाहुणी होती. तो महोत्सव पार पडल्यावर भारावलेल्या मनानं भारतात परतलेली अमृता एका पत्रातून इमरोजला लिहिते... ‘एक असा देश आहे जिथे एका स्वतंत्र कवयित्रीच्या शब्दांना हा शब्द महोत्सव समर्पित आहे. आणि एक असाही प्रदेश (पंजाब) आहे जिथे माझ्या शब्दांवर पहारा ठेवला जातो. पण मी गेल्यानंतर शब्दांवर गोळ्या झाडणाऱ्या त्या पहारेकऱ्यांना सांगा, सत्याला ठार करू शकेल अशी गोळी अजून जगात तयार झालेली नाही... ’  सत्याची स्वत:ची अशी एक ताकद असते असं मानणाऱ्या अमृताचे एवढे शब्द पुरेसे आहेत...अमृताच्या कथा कवितांमध्ये जेवढं सौंदर्य भरलेलं होतं तेवढीच ती चेहऱ्यानंही सुंदर होती.  तिचे समकालीन लेखक तिच्या सौंदर्यावर तर भाळले पण तिच्या शब्दांच्या वास्तविकतेची सुंदरता त्यांना पचली नाही. तिची कीर्ती त्यांना रुचली नाही.  तिचे सन्मान, पुरस्कार, प्रसिद्धी ही त्यांची अडचण नव्हती. तिने एक स्त्री म्हणून अनेक पुरुषांना मागे टाकत हे सगळं मिळवणं आणि तथाकथित पुरुषी मानसिकतेचा अहंभाव दुखावला जाणं ही त्यांची खरी अडचण होती. त्यांच्याविरुद्ध ती लढत राहिली आपली लेखणी घेऊन.... आणि ती  जिंकली... म्हणूनच आपलं आत्मचरित्र, आपल्या सगळ्या कथा-कविता-कादंबऱ्या अमृताला एखाद्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलासारख्या वाटतात. ती म्हणते,  'माझ्या जगण्यातल्या वास्तवाचा मनातल्या स्वप्नावर जीव जडला आणि त्यातून या सगळ्या साहित्यकृती जन्माला आल्या, ज्यांनी एखाद्या अनौरस संततीप्रमाणे नेहमीच समाजानं त्यांच्या भाळी लिहिलेलं दुःख भोगलं.स्त्रियांच्या समस्या, भावभावना, स्वातंत्र्यची परिकल्पना हा नेहमीच तिच्या साहित्याचा गाभा राहिला. इमरोज चित्र काढायचा त्याठिकाणी बऱ्याच महिलांची चित्र पडलेली असायची. एके दिवशी अमृता इमरोजला म्हणाली, ‘’तू तुझ्या कुंचल्यानी बऱ्याच स्त्रियांची चित्र काढतो. तुझ्या रंगानी साध्यासुध्या चेहऱ्यालाही अतिशय सुंदर करून टाकतोस. पण तू कधी मन असलेल्या स्त्रीचं चित्र काढलंय?’’ इमरोज आयुष्यभर शोधत राहिला पण अमृताच्या कल्पनेतली मन असलेली स्त्री कॅनव्हासवर उतरवणं इमरोजला कधीच जमलं नाही.. जी स्त्री अमृतानं वेळोवेळी तिच्या कागदावर उतरवली आहे. स्वतःच्या जीवनात अनेक उदासवाणे प्रसंग असतानाही तिच्या शब्दांमधून ती कायमच आशेची किरणं दाखवत राहिली. जरी इमरोज अमृतावर भरभरून प्रेम करत राहिला तरी अमृताच्या हृदयातली जागा शेवटपर्यंत साहिरसाठी राहिली.  पण जेव्हा साहिरचा गायिका सुधा मल्होत्रावर जीव जडला तेव्हा अमृता पुरती कोलमडून पडली. इतकी की तिच्या सर्वात वेदनादायक, दुःखाने भरलेल्या कथा-कादंबऱ्या तिने याच काळात लिहिल्या. प्रेमाच्या या तिहेरी गुंत्यात अमृताला इमरोजची जाणीव नव्हती असं म्हणता येणार नाही. पण साहिरवरच्या प्रेमाच्या अट्टहासातून इमरोजच्या प्रेमाला गृहीत धरणारी अमृता स्वतःच्या जीवनकथेतल वळण बदलताना अपयशी ठरली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्त्रीच हळवंपण, उदासपण, मनाचं कोमलपण सगळं दिसतं अमृतामध्ये.. होत असलेलं दुःख मांडताना ती कचरली नाही कधी..  पण प्रेमात होतं असलेला त्रास मोडून काढण्याची हिंमत अशाप्रसंगी तिच्याकडे पाहायला मिळाली नाही.  स्त्रीला प्रसंगी गरजेचं असणारं कठोरपण ती बऱ्याचदा हरवून बसली. आशा भोसले एके ठिकाणी म्हणतात,  कलाकाराचं जीवनच मुळी वेदनांनी भरलेलं असतं. जितकी त्याची वेदना जास्त तितकी त्याच्या कलेला धार येत जाते. मला अमृताच्या लेखनकलेपेक्षा जगण्याच्या कलेविषयी बोलायचंय. ती फक्त जगली नाही. तिनं जगणं पुरेपुर उपभोगलं. त्याचा पुरेपुर आस्वाद घेतला. त्यात विरह होता, वेदना होत्या, दु:ख होतं, एकटेपणा होता, बऱ्याचदा बेफिकीरी होती, क्षुल्लक गोष्टींतला क्षणिक आनंद होता.  इतके सारे रागरंग होते म्हणूनच तिच्या जगण्याच्या कलेला धार होती जी धार तिच्या लेखनाला आपसूकच येत गेली. अमृता म्हणते, ‘शरिरात कुणीतरी सुया टोचाव्यात आणि आपण कण्हत कण्हत त्या बाहेर काढाव्यात तशा माझ्या एक एक कथा मी कागदावर उतरवत गेले’... अमृतानं फक्त तिच्या जखमा कागदावर उतरवल्या नाहीत तर तिच्या कथा वाचणाऱ्यांच्या मनावरही बऱ्याच काळापर्यंत एक जखम कोरली जाण्याचं कसब साधलंय अमृतानं तिच्या लेखनातून... आपल्या एक अतिशय जवळचा मित्र, सज्जाद हैदरीबद्दल अमृता म्हणते,  - 'कविता नेहमीच प्रेमाच्या वादळतून जन्माला येत नाही. कविता कधी कधी मैत्रीच्या शांत लहरीवर तरंगतही येते.' त्यापुढेही ती म्हणते,  'सज्जाद मेरा एक दोस्त था... पुरी तरह से दोस्त..' एखादा पुरुष मित्र असणं आणि तो पूर्णपणे फक्त मित्र असणं... ही मैत्रीच्या नात्यातली बारीक रेषा तिने ओळखली. पुरी तरह से दोस्त होना म्हणजे नेमकं काय हे फक्त अमृताच सांगू शकते. आणि   मैत्रीतल्या उमदेपणासोबतच ती पुढे म्हणते,  ‘साहिर मेरी जिन्दगी के लिए आसमान हैं, और इमरोज मेरे घर की छत.’ स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना पुरुषांना विरोध करणं हा तिचा अजेंडा कधीच नव्हता हा पैलूही लक्षात घ्यावा लागेल. अमृताला रेखाटताना इमरोजला दुर्लक्षित करून चालणार नाही. ज्यावेळी अमृता आणि इमरोज यांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अमृता इमरोजला म्हणते, 'तू एकदा सर्व जग फिरून ये आणि मग माझ्याकडे ये. तोपर्यंत मी इथेच तुझी वाट पाहत राहिन. 'इमरोजने तिथेच घराला सात फेऱ्या मारल्या आणि मग तो अमृताला म्हणाला, 'माझं जग फिरून झालं. आता मी तुझ्यासोबत राहण्यासाठी मोकळा आहे.' 2005 मध्ये अमृताचा मृत्यू झाला. त्यावेळी इमरोज म्हणाला, 'ती इतकं वेदनादायी आयुष्य जगली की ती शेवटी मृत्यूमुळे तिच्या दुःखातून मुक्त झाली याचं मला समाधान वाटतंय. तिला तिच्या वेदनांमधून मुक्त करणं जे मला इतक्या वर्षात जमलं नाही ते मृत्यूनं एका क्षणात करून दाखवलं. ती शरीरानं आता नसली तरी नेहमीच माझ्या सोबत असणार आहे.'  प्रत्येक स्त्रीची इच्छा असते अमृता प्रीतम होण्याची. पण प्रत्येकीच्या नशिबात इमरोजचा असा सहवास नसतो..  म्हणून अमृता जितकी अमूर्त तितकाच इमरोजही अमर राहिल. आयुष्यातली तीस पस्तीस वर्ष इमरोजच्या कॅनवासला बोलकं करण्याचं काम अमृताच्या शब्दांनी केलं.. आणि अमृताच्या कागदावर उतरणाऱ्या शब्दांना भावनेच्या रंगानी ओतप्रोत भरण्याचं काम इमरोजच्या कुंचल्याने केलं. ती सारी वर्ष तो कॅनवास बोलत राहिला आणि कागद आयुष्याचे प्रत्येक रागरंग चितारत राहिला...  1980-81 साली अमृताच्या 'कागज और कॅनवास'ला  ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला... तो फक्त तिच्या लेखणीला मिळालेला पुरस्कार नव्हता... एके काळी समाजानं स्वेर ठरवलेल्या तिच्या जगण्याचा, तिच्या प्रेमाचा, तिच्या मुक्तीच्या कल्पनांचा तो अप्रत्यक्ष पुरस्कार होता... आज 'मी' आणि माझ्यासारख्या कित्येक  'ती' अमृता प्रीतम होण्यासाठी आतल्या आत धडपडत असतात.  बऱ्याचदा अमृताचा हेवा वाटून कुढत असतात. आवडणाऱ्या पुरुषाला हजारवेळा चोरून बघतात पण एकदाही व्यक्त होण्याची हिंमत दाखवत नाहीत. कलेची कदर असणारा नवरा होता पण तरीही घुसमट होतं असल्यानं अमृतानं नवरा सोडला. कर्तृत्वाला क्षुल्लक लेखणारा नवरा असला तरी शालिनतेच्या पडद्यामागे लपण्यात वर्षानुवर्ष धन्यता मानतो आम्ही. स्वतःच्या इच्छा आकांक्षा दडपून टाकतो आणि समोर असलेल्या एखादीच्या महत्वाकांक्षेचे मुडदे पडलेलेही (पाडले गेलेले)पाहतो पण कधीच ब्र काढत नाही.  तिच्यासाठी नाही तर निदान स्वतःसाठीही काढत नाही.  मी आणि माझ्यासारखा प्रत्येक स्त्रीच्या मानत एक अमृता दडलेली असते. पण बंडखोरी, विद्रोह एखादीच करू शकते, विरोध पत्करून आडवळणानं एखादीच जाऊ शकते म्हणून ती आणि फक्त तीच अमृता प्रीतम असते. जी जातानाही म्हणते, मैं और तो कुछ नही जानती पर इतना जानती हूं की वक्त जो भी करेगा यह जन्म मेरे साथ चलेगा यह जिस्म खत्म होता हे तो सबकुछ खत्म हो जाता है पर यादों के धागे कायनात की लम्हों की तरह होते हैं में उन लम्हों को चुनूंगी ऊन धागों को समेट लुंगी मै तुझे फिर मिलूंगी कहा कैसे पता नही पर मैं तुझे फिर मिलूंगी...
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget