(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
Ganesh Visarjan 2024 Time : दहा दिवस मनोभावे बाप्पाची सेवा केल्यानंतर आता वेळ आली आहे बाप्पाला निरोप देण्याची. उद्या अनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन होईल, पण विसर्जनाचा शुभ मुहूर्त नेमका कोणता? जाणून घ्या
Ganesh Visarjan 2024 : गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2024) दिवशी 7 सप्टेंबर 2024 पासून देशभरात गणेशोत्सव सुरू झाला. दहा दिवस मोठ्या भक्तिभावाने गणेशाची पूजा-अर्चना झाल्यानंतर अखेर अनंत चतुर्दशीला वेळ आलीये बाप्पाला भरलेल्या डोळ्यांनी निरोप देण्याची. उद्या गणपती विसर्जनाने गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. यंदा गणेश विसर्जन (Ganesh Visarjan 2024) मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. या वर्षी गणपतीच्या निरोपाची शुभ मुहूर्त कोणती? पंचागानुसार, जाणून घ्या गणपती विसर्जनाची शुभ वेळ आणि पूजेची पद्धत.
हिंदू धर्मात गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व
हिंदू धर्मात गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत श्रीगणेशाची आराधना केल्याने माणसाचे सर्व दु:खं दूर होतात, असा समज आहे. गणपती विसर्जन गणेश चतुर्थीच्या दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला केले जाते. असे मानले जाते की, या दिवशी बाप्पा आपल्या घरी परत जातात. अशा स्थितीत त्यांना आनंदाने निरोप दिला पाहिजे.
गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त (Ganpati Visarjan 2024 Shubh Muhurat)
17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे, या दिवशी गणपती विसर्जनासाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत. वैदिक पंचांगानुसार, पहिला मुहूर्त सकाळी 9:10 ते दुपारी 1:47 पर्यंत असेल. दुसरा मुहूर्त दुपारी 3:18 ते संध्याकाळी 5:50 पर्यंत असेल आणि तिसरा मुहूर्त संध्याकाळी 7:51 ते रात्री 9:19 पर्यंत असेल. चौथा शुभ मुहूर्त रात्री 10:47 ते दुसऱ्या दिवशी 18 सप्टेंबर रोजी 03:12 पर्यंत असेल. या शुभ मुहूर्तांमध्ये तुम्ही विधींनुसार गणपतीला निरोप देऊ शकता.
गणेश विसर्जनाची पूजा पद्धत (Ganesh Visarjan Puja)
बाप्पाच्या विसर्जनासाठी आधी पाट तयार करून त्यावर स्वस्तिक चिन्ह बनवून गंगाजल शिंपडावं. यानंतर गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून, नवीन पिवळे वस्त्र परिधान करून कुंकू तिलक लावावं. पूजेदरम्यान श्रीगणेशाला लाल चंदन, लाल फुले, दुर्वा, मोदक, सुपारी, सुपारी, धूप-दीप इत्यादी अर्पण करा.
त्यानंतर आपण आपल्या कुटुंबासह श्रीगणेशाची आरती करावी आणि झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागून मूर्तीचे विसर्जन करावं. अशा प्रकारे, आपण गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करू शकता आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणत त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :