(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : गोगलगाय नियंत्रणासाठी कृषी विभागाने सुचवला 'हा' पर्याय; असा होणार फायदा
Agriculture News : अनेक भागात सध्या शेतकऱ्यांना गोगलगायीच्या संकटाचा सामना करावा लागत असून, यामुळे पिकांना मोठ्याप्रमाणात फटका बसत आहे.
Agriculture News : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यासह मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गोगलगायीचा सामना करावा लागत असून, यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. तर मागील वर्षी सतत चालू असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना कोळपणी करता आली नव्हती. त्यामुळे गोगलगायींनी मातीच्या वरच्या थरात घातलेली अंडी नष्ट झाली नव्हती. परंतु या वर्षी सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी तात्काळ कोळपणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून मातीच्या वरच्या थरातील अंडी नष्ट होतील व पुढच्या वर्षी गोगलगाय प्रादुर्भावाचे नियंत्रण होण्यास मदत होईल, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
चालू हंगामामध्ये कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी गोगलगाय नियंत्रणाबाबत शेतामध्ये विविध उपाययोजना केल्यामुळे गोगलगायींचा सद्यस्थितीत प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. तथापी पुढील काळात गोगलगायींचा उद्रेक वाढू नये म्हणून प्राधान्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकामध्ये कोळपणी करावी. जेणेकरुन तणनियंत्रणासह गोगलगायींची अंडी देखील नष्ट होतील. तसेच मागील वर्षी सोयाबीन पिकावर काही भागात पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. या रोगामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असल्याने या रोगाचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे.
सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग असून तो मूगबिन येलो मोझॅक या विषाणूमुळे होतो. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने पांढरी माशी या किटकाद्वारे होतो. रोगट झाडांच्या पानांचा काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात बाधित झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते. पाने सुरकतून जातात. फुलांची व शेंगाची संख्या देखील कमी होते. सोयाबीनच्या उत्पन्नावर या रोगाचा विपरीत परिणाम होतो, त्यासाठी देखील कृषी विभागाने काही पर्याय सुचवले आहेत.
पिवळा मोझॅक रोग कमी करण्यासाठी हे करावे...
- पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे दिसताच शेतातील रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत, पिकांमधील व बांधावरील तण नियंत्रण करणे आवश्यक आहे.
- पांढरी माशी व मावा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिवळे चिकट सापळे (15 x 30 सेमी) सोयाबीन पिकात हेक्टरी 10 ते 12 प्रमाणे लावावेत.
- या विषाणूजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने पांढरी माशी व मावा या किडीद्वारे होत असल्याने या किडींच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रीड 17.8 टक्के एस.एल 2.5 मि.ली. किवा फ्लोनिकामिड 50 % डब्ल्यू जी 3 ग्रॅ. किंवा थायोमिथाक्झाम 25 % डब्ल्यू जी 3 ग्रॅ. या किटकनाशकाची प्रति 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- पायरेथ्राईड किटकनाशकाचा वापर टाळावा.
- अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा. असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांच्या वतीने करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: