Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
Nitish Kumar : राष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. नितीशकुमारांची शांतता नेमक्या कोणत्या राजकीय वादळाचे संकेत देतेय याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.
पाटणा : संसदेचं हिवाळी अधिवेशन नुकतंच संपलंय, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सर्वांना वेध लागलेले आहेत. नवी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी राजकीय पक्षांनी त्याची तयारी सुरु केली आहे. याच दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचं नाव पुन्हा चर्चेत आहे. नितीशकुमार यांचा जदयू आणि भाजप सध्या बिहारमध्ये सत्तेत आहे. नितीशकुमार पुन्हा एकदा एनडीएची साथ सोडणार का अशा चर्चा सुरु झालेल्या आहेत. नितीशकुमार साधारण महिनाभरापासून शांत आहेत. त्यांच्या या शांततेच्या भूमिकेतचं भविष्यातील राजकीय वादळाचे संकेत असू शकतात अशा चर्चा आहेत. मात्र, नितीशकुमार किंवा जदयूच्या नेत्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही.
नितीशकुमार शांत असल्यानं चर्चांना उधाण
नितीशकुमार गेल्या काही दिवसांपासून शांत आहेत. नितीशकुमार यांची प्रगती यात्रा सुरु आहे. मात्र, केंद्र आणि राज्यातील ज्वलंत मुद्यांवर ते शांत आहेत. वक्फ बोर्ड संशोधन बिल, वन नेशन वन इलेक्शन, अमित शाह यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वक्तव्य, अरविंद केजरीवाल यांचं पत्र, याबाबत नितीशकुमार यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळं नितीशकुमारांच्या मनात नेमकं काय असा सवाल उपस्थित आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात केलेलं वक्तव्य नितीशकुमारांच्या शांततेला कारणीभूत मानलं जात आहे. ते म्हणाले होते की, बिहारमध्ये भाजपचं आपलं सरकार हीच वाजपेयीजींना खरी श्रद्धांजली असेल.
राजद जदयूसोबत पुन्हा आघाडी करणार?
राजदचे प्रमुख नेते बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बिहारचं सीएमओ भाजप चालवतं आहे. सीएमओचं नियंत्रण भाजपच्या हातात आहे. जदयूचे चार नेते भाजपच्या संपर्कात आहेत, पूर्ण नियंत्रण अमित शाह करत आहेत, असं तेजस्वी यादव म्हणाले. ललन सिंह, संजय झा, अशोक चौधरी आणि विजय चौधरींकडे तेजस्वी यादव यांचा रोख आहे. गृहमंत्रालय जरी नितीशकुमार यांच्याकडे असलं तरी दिल्लीतून बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तेजस्वी यादव वारंवार नितीशकुमार यांच्यावर हल्ला केला जात आहे. मात्र, जदयूकडून पलटवार केला जात नसल्याचं चित्र आहे. यापूर्वी राजदकडून आरोप झाल्यास जदयूकडून उत्तर दिलं जायचं. राष्ट्रीय जनता दल देखील पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या जदयूसोबत फारशी उत्सूक नसल्याचं म्हटलं जातंय.
एनडीए आणि राजद काँग्रेससोबत यापूर्वी सरकार
नितीशकुमार आणि राजद यांनी एकत्रितपणे 2015 मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी जदयू आणि राजदनं एनडीएला पराभूत केलं होतं. मात्र, सरकारला दोन वर्ष झाल्यानंतर नितीशकुमारांनी अचानक भाजपसोबत सरकार स्थापन केलं. मात्र, 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जदयूच्या जागा घसरल्या, भाजपच्या अधिक जागा निवडून आल्या. राजद आणि काँग्रेस विरोधात होती. मात्र, ऑगस्ट 2022 मध्ये अचानक मुख्यमंत्री नितीशकुमार माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी गेले. पुढं जदयू-राजदचं सरकार स्थापन झालं. पुन्हा दीड वर्षातच नितीशकुमार पुन्हा भाजपसोबत आले. 28 जानेवारी 2024 ला नितीशकुमार एनडीएत आले आणि मुख्यमंत्री बनले.
नितीशकुमार पुन्हा एनडीए सोडून इंडिया आघाडीत जातील अशा चर्चा सुरु असल्या तरी त्यांच्यासाठी हे आता सोपं राहिलेलं नाही. गेल्या 18-20 वर्षांपासून बिहारच्या राजकारणातील किंग असलेल्या नितीशकुमार यांची भविष्यातील वाटचाल निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. महाराष्ट्रात विधानसभा एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवण्यात आली, मात्र सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये होऊ नये म्हणून नितीशकुमार यांना बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएनं चेहरा जाहीर करावा असं वाटत आहे.
इतर बातम्या :