दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
संग्राम शिंदे आणि शरद शिंदे या भावा भावात भांडण सुरू असताना सचिन भांडण सोडवायला गेला असताना हा खून झाला. या खूनप्रकरणी संग्राम कमलाकर शिंदे या तरुणाला इस्लामपूर पोलिसांनी अटक केलीय
सांगली : दुसऱ्याच्या भांडणात पडू नये असे जुने-जाणते सांगत असतात. पण, माणुकीच्या व मैत्रीच्या नात्याने तिसरा माणूस एखादी भांडणं सोडवू लागते. मात्र, अशारितीने भांडणं सोडवणंच संबंधित व्यक्तीच्या जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यात घडला आहे. दोन भावा भावांमध्ये काही कारणावरून सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मित्राचाच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठ येथे घडला. सचिन सुभाष लोंढे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून सचिनचा छातीत चाकू भोसकून खून झालाय. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून गुन्हा देखील दाखल झाला आहे.
संग्राम शिंदे आणि शरद शिंदे या भावा भावात भांडण सुरू असताना सचिन भांडण सोडवायला गेला असताना हा खून झाला. या खूनप्रकरणी संग्राम कमलाकर शिंदे या तरुणाला इस्लामपूर पोलिसांनी अटक केलीय. न्यायालयाने या आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संग्राम शिंदे आणि शरद शिंदे हे भाऊ भाऊ पेठ येथे वास्तव्यास आहेत. या दोघांच्या शेजारीच सचिन लोंढे यांचे घर असून हे तिघे मित्र आहेत. शिंदे भावामध्ये सतत काही ना काही कारणावरुन वाद होत असत. त्यावेळी सचिन हा शरद व संग्राम यांच्यामधील भांडणात मध्यस्थी करत होता. मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास सचिन लोंढे व त्याचे मित्र विश्वजीत शिंदे, शाकिर शिंदे , ऋषिकेश वारे हे भीमनगर परिसरात उभा होते. तेथून शरद शिंदे व संग्राम यांची बहिण मयुरी हे दोघे त्यांचे घरी निघाले होते. त्यावेळी संग्राम शिंदे हा दुचाकीवरून हातामध्ये चाकू घेवून तेथे गेला. संग्राम व शरद यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर, दोघांत शिवीगाळी सुरू झाली. शरद व संग्राम यांच्यात जोरात भांडण सुरू झाले. त्यावेळी तेथे असलेला सचिन हा भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेला. मात्र, संग्रामने , तू आमच्या भांडणामध्ये यायचे नाही, असे म्हणून हातातील चाकू सचिनच्या छातीत खुपसला. या घावामुळे सचिन जोरजोराने ओरडला, चाकूचा घाव वर्मी लागल्याने तो खाली पडला. त्याच्या छातीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावदेखील झाला. सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून संग्रामने तेथून पळ काढला. दरम्यान, तेथील मित्रांनी जखमी सचिनला इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याप्रकरणी, इस्लामपूर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी संग्रामला अटक केली आहे. मात्र, या घटनेत नाहक सचिनचा जीव गेला.
हेही वाचा
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय