राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी येत्या दोन दिवसात राजकीय भूमिका मांडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला
मुंबई : शिवसेनेतील पक्षफुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेले माजी आमदार राजन साळवी (Rajan salvi) आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकांवेळी देखील राजन साळवी यांच्यावर दबाव टाकण्यात येत असून त्यांच्यावर राजकीय हेतुने प्रेरीत होऊन तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर होत होता. त्यातच, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाल्याने कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे, राजन सावळी आता ठाकरेंची साथ सोडून भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यावर, पुढील दोन दिवसांत राजन साळवी आपली भूमिका मांडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात त्यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी फोनवर संपर्क झाल्याचेही समजते.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी येत्या दोन दिवसात राजकीय भूमिका मांडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला असल्याचे समजते. राजन साळवी हे आपल्या मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत पुढील राजकीय निर्णय घेणार आहेत. परंतु, स्थानिक पदाधिकारी ठाकरेंना सोडून जाण्यास तयार नाहीत. मात्र, असं असताना सुद्धा राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून दोन दिवसात आपली भूमिका आपण जाहीर करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे, साळवी हे शिवबंधन तोडणार असल्याची चर्चा सुरू असून सूत्रांनी देखील याबाबत माहिती दिली आहे.
भाजप-शिवसेनेकडून स्वागत
दरम्यान, राजन साळवी हे शिवसेना सोडत असल्याची चर्चा सुरू होताच भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून त्यांचं कौतुक होत असून ते चांगले मित्र व नेते असल्याचं बोललं जात आहे. राजन साळवी हे शिवसेनेचे एक चांगले कार्यकर्ते आहेत, उरलेले उबाठाचे नेते अस्वस्थ आहेत. राजन साळवी यांचा भाजपामध्ये येण्याचा विचार असेल तर चांगल्या नेत्यांचं आम्ही नेहमी स्वागतच करतो, असे भाजप नेते व आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. तर, नरेश म्हस्के यांनी देखील राजन साळवी माझे चांगले मित्र आहेत, असे म्हणत त्यांचं स्वागत केलंय. यावेळी, ठाकरे गटावरही त्यांनी टीका केली.
हेही वाचा
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग