Farmers Day : शेतकऱ्यांसमोर असणारी 10 संकटे कोणती? वाचा सविस्तर
Farmers Day : सध्या शेतकऱ्यांना विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. पाहुयात राष्ट्रीय शेतकरी दिवसानिमित्त शेतकऱ्यांसमोर असणाऱ्या 10 संकटाचा आढावा.
National Farmers Day 2022 : आपला भारत (India) देश हा कृषीप्रधान आहे. शेती क्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानलं जातं. त्यामुळं शेती क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. आज राष्ट्रीय शेतकरी दिवस (National Farmers Day) आहे. दरवर्षी 23 डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांच्या जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात येतो. मात्र, आज शेतकऱ्यांना विविध संकटाचा सामना करावा लागतो. कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकट येतात. या कृषी दिनाच्या निमित्तानं भारतीय शेतकऱ्यांसमोर नेमक्या कोणत्या समस्या आहेत? या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) आणि किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात.
चौधरी चरण सिंह यांनी आपल्या कार्यकाळात कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय सुद्धा घेतले होते. शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवशी म्हणजेच 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. पण सध्या जर देशात बगितलं तर शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या नेमक्या समस्या कोणत्या ते पाहुयात...
'ही' आहेत 10 संकटे
1) शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खते, बियाणे याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामानाने शेतकऱ्यांच्या पिकांना बाजारभाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
2) नैसर्गिक संकटाचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस तर कधी चक्रीवादळ अशी संकट येत आहेत. या संकटामुळं शेतकरी उद्धवस्थ होताना दिसत आहे.
3) राजकीय लोकांचा शेती क्षेत्राला किंवा शेतकऱ्यांना असणारा पाठिंबा कमी होताना दिसतोय. त्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. शेतकऱ्यांच्या हिताची धोरण राबवली जात नसल्याचा फटाका शेतकऱ्यांना बसत आहे. त्याचा देखील शेतीवर परिणाम होताना दिसत असल्याचे डॉ. अजित नवले म्हणाले.
4) शेती कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भातील एक उदादरण म्हणजे केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे. शेतीचं होणार कॉर्पोरेटीकरणं हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचे मत डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केले आहे.
5) शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो दर मिळत नसल्यानं शेती संकटात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मालाला आधारभावाचे संरक्षण देण्यात यावं. त्यामुळं शेतकऱ्यांचा तोटा होणार नाही
6) सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा हे देखील शेतीसमोरील संकट आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या योग्य त्या सुविधा नसल्यानं शेतीला फटका बसत आहे. ज्यावेळेस पिकांना पाण्याची गरज असते तेव्हाच पाणी मिळत नाही. त्यामुळं सिंचनाच्या सुविधा होणं गरजेचं आहे.
7) शेतीसाठी योग्य प्रकारचा वीजपुरवठा होणं गरजेचं आहे. पण सध्या अनेक ठिकाणी कमी दाबानं योग्य प्रकारे वीजपुरवठा होत नाही. त्याचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे.
8) तापमान वाढ हे सुद्धा शेतीसमोरील मोठं संकट आहे. याचाही शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. हावामानातील बदलामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसत आहे. या संकटाचा सुद्धा सामना करण्यासाठी योग्य ते धोरण राबवणं गरजेचं असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं.
9) 100 टक्के पिकांना हमीभाव मिळावा. सध्या देशात 4 ते 5 टक्के पिकांना हमीभाव असतो. मात्र, इतर पिकांना हमीभाव मिळत नसल्यानं शेती तोट्यात जात असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.
10) रस्ता, पाणी आणि वीज या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. हे मूलभूत प्रश्न सुटणे गरजेचे आहे. हे तिन्ही घटक शेतीसाठी अत्यंत गरजेचे असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. शेतीसाठी चांगले रस्ते हवेत, योग्य त्या प्रकारच्या पाण्याच्या सुविधा हव्यात तसेच वीजेचा प्रश्न सुटला पाहिजे असे शेट्टी यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: