दिव्यांग पक्षकाराला पाहून न्यायाधीश खुर्ची सोडून खाली उतरले, सोलापूर जिल्हा न्यायालयातील न्यायदानाचे सुखद चित्र
सोलापूर जिल्हा न्यायालयात सोमवारी न्यायदानातील एक सुखद चित्र पाहायला मिळाले. दिव्यांग पक्षकाराला पाहून न्यायाधीश स्वत: आपले खुर्ची सोडून खाली आले. पक्षकाराची बाजू ऐकून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वादावर तोडगा देखील काढला.

Solapur News : न्यायालयातील न्यायदानाच्या प्रक्रियेबद्दल आपण नेहमी ऐकत असतो. सोलापूर जिल्हा न्यायालयात सोमवारी (11 जुलै) न्यायदानातील एक सुखद चित्र पाहायला मिळाले. दिव्यांग पक्षकाराला पाहून न्यायाधीक्ष स्वत: आपले खुर्ची सोडून खाली आले. पक्षकाराची बाजू ऐकून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वादावर तोडगा देखील काढला. न्यायालयात घडलेली ही घटना पाहून साऱ्यांनाच सुखद अनुभव प्राप्त झाला.
सोलापूर जिल्हा न्यायालयात सोमवारी एका दिवाणी प्रकरणावर सुनावणी सुरु होती. यावेळी अपीलकर्ते पक्षकार वयस्कर आणि दिव्यांग असून त्यांना मुलाने उचलून आणताना न्यायाधीक्षांनी पाहिले. त्यांना न्यायलयात उभं देखील राहणं शक्य नसल्याचे लक्षात येताच सोलापूर जिल्हा प्रमुख न्यायाधीक्ष शब्बीर अहमद औटी हे स्वत: डायस सोडून खाली आले. विशेष म्हणजे न्यायाधीक्ष औटी हे स्वत: दिव्यांग आहेत. एका दिव्यांगाला न्याय मिळवून देण्यासाठी ते स्वत: खाली उतरले. यावेळी त्यांनी पक्षकारासमोर बसून बाजू देखील ऐकून घेतली. 2016 पासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर तोडगा काढत त्यांनी वाद देखील मिटवला.
पक्षकार प्रताप गणपतराव भोसले हे मूळचे वैराग येथील असून निवृत्त शिक्षक आहेत. 80 वर्षे वय असलेले भोसले हे दिव्यांग आहेत. 2016 पासून ते संपत्ती वाटणीविषयक प्रकरणात न्यायालयात खेटा मारत होते. सोमवारी ते याच प्रकरणाच्या युक्तीवादाकरता न्यायालयात आले. त्यांना चालता येत नसल्याने मुलाने त्यांना उचलून न्यायालयात आणले. हे चित्र सोलापूर जिल्हा प्रमुख न्यायाधीक्ष शब्बीर अहमद औटी यांनी पाहिले. "मी देखील दिव्यांग आहे. तुमच्या प्रकरणचा निर्णय आजच करुन टाकू?" असा प्रश्न केला. यावेळी प्रताप भोसले म्हणाले ' आपण या प्रकरणाचा काहीही निकाल द्या. तो मला मान्य असेल. माझ्या डोळ्यादेखत मला हा वाद मिटवायचा आहे'. यानंतर न्यायाधीक्ष औटी यांनी वादावर तोडगा सांगितला. या तोडगा सर्वांनी मान्य केला आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रकरणाचा निकाल लागला.
न्यायाधीक्ष शब्बीर अहमद औटी हे मागील महिन्यातच सोलापूर येथे जिल्हा प्रमुख न्यायधीक्ष म्हणून रुजू झाले आहेत. रुजू झाल्यापासून त्यांनी प्रलंबित प्रकरणाचा निकाल लावण्याची गती वाढवली आले. न्यायाधीक्ष औटी हे जलदगतीने न्यायदान करण्यासाठी नेहमीच आग्रही असतात. त्या दृष्टीने ते वकिलांना देखील सूचनाही करत असतात, असे मत वकिलांनी व्यक्त केले. प्रताप भोसले यांच्या ही प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर दोन्ही पक्षकारांनी समाधान व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
