एक्स्प्लोर
‘तळवलकर क्लासिक’ शरीरसौष्ठव स्पर्धा 28 नोव्हेंबरला
भारतातील शरीरसौष्ठवाची सर्वात ग्लॅमरस आणि श्रीमंत स्पर्धा म्हणजे अर्थातच ‘तळवलकर क्लासिक 2017’ पुन्हा मुंबईकरांना देहभान विसरायला लावण्यासाठी सज्ज झाली आहे.

मुंबई : भारतातील शरीरसौष्ठवाची सर्वात ग्लॅमरस आणि श्रीमंत स्पर्धा म्हणजे अर्थातच ‘तळवलकर क्लासिक 2017’ पुन्हा मुंबईकरांना देहभान विसरायला लावण्यासाठी सज्ज झाली आहे. यंदाची तळवलकर क्लासिक गतवेळपेक्षा अधिक ग्लॅमरस आणि भव्यदिव्य करण्यासाठी ऐतिहासिक षणमुखानंद सभागृहात आयोजित केली जाणार आहे.
लोकांना शरीरसौष्ठवाचे महत्त्व पटवून देताना शरीरसौष्ठवपटूंना व्यावसायिकतचे धडे आणि उत्पन्नाचे साधन मिळवून देणाऱ्या व्यायाममहर्षी मधुकर तळवलकरांच्या कल्पेनेतून आणि पुढाकाराने शरीरसौष्ठवातील सर्वात श्रीमंत अशी तळवलकर क्लासिक स्पर्धा येत्या 27 आणि 28 नोव्हेंबरला मुंबईत रंगेल. या स्पर्धेच्या सोबतीला मोजक्या मिश्र दुहेरीतील फिट ऍण्ड फाइन जोड्या आपले तालबद्ध फिटनेस प्रदर्शन दाखविण्यासाठी उत्सुक आहेत.
तळवलकरांची स्पर्धा क्लासिक ठरावी म्हणून मि.वर्ल्ड, मि.एशिया, मि. इंडियासारखे सर्वोच्च बहुमान संपादणारे सर्वच खेळाडू आपले कसब पणाला लावण्यासाठी सज्ज होत आहेत. विशेष म्हणजे ही स्पर्धा केंद्र सरकारची मान्यता असलेल्या इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने होत असल्यामुळे शरीरसौष्ठवातील सुपरस्टार षणमुखानंदच्या अतिभव्य मंचावर पाहण्याची सुवर्णसंधी मुंबईकरांनी प्रथमच मिळणार आहे.
यापूर्वी शरीरसौष्ठवाची एकही स्पर्धा या ऐतिहासिक सभागृहात आयोजित झालेली नाही. एवढेच नव्हे तर पुरुष आणि महिलांची मिश्र स्पर्धाही मोजक्या जोड्यांच्या सहभागामुळे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल. स्पर्धेची प्राथमिक फेरी जुहू येथील समुद्रकिनारी असलेल्या जुहू हॉटेलमध्ये 27 नोव्हेंबरला खेळविली जाईल तर अंतिम फेरी म्हणजेच तळवलकर क्लासिकची टॉप टेन स्पर्धा 28 नोव्हेंबरला षणमुखानंद सभागृहात इतिहास रचेल.
तळवलकर क्लासिक ही आजवरची सर्वात श्रीमंत स्पर्धा ठरणार आहे. 20 लाखांची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत विजेता 6 लाखांचा मानकरी ठरेल. टॉप टेनवर बक्षीसांचा पाऊस पाडला जाणार असून उपविजेता 3 लाखांचा तर दहावा क्रमांक 50 हजारांचा धनी होईल. मिश्र जोडींच्या या स्पर्धेत विजेती जोडीही लखपती होईल अशी माहिती आयोजकांनी दिली.
‘गेली सहा दशके मी शरीरसौष्ठवाशी बांधील आहे. समाजात फिटनेस विषयी जागरूकता निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी म्हणून मी तळवलकर क्लासिकच्या नावाने शरीरसौष्ठवाचा मोठा सोहळा पुन्हा एकदा त्याच जोशात आयोजित करण्याचे ठरवले आहे. याचबरोबर उदयोन्मुख खेळाडूंना आपले ध्येय साध्य करता यावे यासाठी मी सदैव प्रयत्न करीत असतो.’ असं मत शरीरसौष्ठवाचे पितामह असलेल्या मधुकर तळवलकर यांनी व्यक्त केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
सांगली
राजकारण
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
