डॉ. शैलेश पुणतांबेकर – पुण्याचे डॉ शैलेश पुणतांबेकर प्रसिद्ध आहेत लॅप्रोस्कोपीच्या माध्यमातून कर्करोगाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी. त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचं जे तंत्र विकसित केलं त्या तंत्राला पुणे टेक्निक म्हणून नावाजलं गेलंय. तेच तंत्र आता 40 देशांमध्ये वापरलं जातं..इतकं मोठं या क्षेत्रातलं त्यांचं काम आहे..पण गेल्यावर्षी डॉ शैलेश पुणतांबेकर यांच्याकडे जगाचं लक्ष गेलं ते अभूतपूर्व अशा एका शस्त्रक्रियेच्या प्रयत्नामुळे... गेल्यावर्षी डॉ पुणतांबेकरांच्या गॅलेक्सी लॅप्रोस्कोपीक इन्स्टिट्यूटमध्ये देशातलं पहिलं कृत्रिम गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आलं. सलग दोन दिवस या शस्त्रक्रिया करुन एक प्रकारचा जागतिक विक्रमच त्यांनी केला आणि आई होण्याची इच्छा असलेल्या अनेक महिलांना एक आशेचा किरण दाखवला. एक वर्षाच्या काळात अशा अनेक गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करुन त्यांनी खरोखर वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवली आहे.. डॉ पुणतांबेकरांच्या वैद्यकीय क्षेत्रातली कामासाठी एबीपी माझाचा सलाम..आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
2/12
सध्या पृथ्वी शॉ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने त्याच्या वतीने वडिलांनी हा पुरस्कार स्वीकारला.
3/12
क्रिकेट विश्वातील उगवता तारा पृथ्वी शॉला माझा सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आलं. फलंदाजांची खाण अशी ओळख लाभलेल्या मुंबईनं भारतीय क्रिकेटला दिलेला नवा हिरा म्हणजे पृथ्वी शॉ. यंदाच्या अंडर नाईन्टिन विश्वचषकानं पृथ्वीच्या फलंदाजीतल्या गुणवत्तेची आणि त्याच्या नेतृत्वगुणांचीही जगाला ओळख करून दिली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं अंडर नाईन्टिन विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला. पृथ्वीमधला फलंदाज वयाच्या अठराव्या वर्षी किती प्रगल्भ झाला आहे, याची थोरामोठ्यांना यंदाच्या आयपीएलनं जाणीव करून दिली. आयपीएलच्या रणांगणात दिल्ली डेअरडेव्हिल्सला यंदा मोठी कामगिरी बजावता आली नाही. पण डेअरडेव्हिल्सचा हा वामनमूर्ती फलंदाज उद्या खूप मोठा होणार आहे, अशी भविष्यवाणी अनेक जाणकारांनी केली. पृथ्वी शॉच्या या उज्ज्वल भवितव्याची मुंबईकरांना आधीच कल्पना आली होती. हॅरिस शिल्ड आंतरशालेय सामन्यात पृथ्वीनं ५४६ धावांचा विक्रम प्रस्थापित केला, त्याच दिवशी मुंबईकरांना हा आपल्या शहराचं नाव राखणार असा विश्वास निर्माण झाला. पृथ्वी शॉनं गेल्या पाच वर्षांत तो विश्वास सातत्यानं सार्थ ठरवला आहे. भविष्यात हा विश्वास वृद्धिंगत होवो, हीच एबीपी माझाची सदिच्छा.
4/12
गायक शौनक अभिषेकी – संगीतातला महामेरु घरात असताना त्यांचं दडपण न घेता त्यांचा सांगितिक वारसा त्यांनी पुढे चालवला. गुरुमुखी विद्या त्यांनी केवळ आत्मसात केली नाही तर जपली,वृद्धिंगत केली. असे शास्त्रीय गायक, संगीतकार पंडीत शौनक अभिषेकी. पंडीत जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र आणि शिष्य शौनक अभिषेकी यांची ख्याल गायकी सर्वश्रुत आहे. आग्रा आणि जयपूर घराण्याच्या हिंदुस्थानी रागदारी संगीताच्या विविध छटा त्यांच्या गायनातून ऐकायला मिळतात. भक्तीसंगीत, नाट्यसंगीताचा ‘स्वराभिषेक’ त्यांनी आपल्या गायनातून रसिकांवर केला. संगीतातली आतुरता आणि संगीतातल्या शाब्दिक संहितेच्या रचनेविषयीची भावनिकता रसिकांना मंत्रमुग्ध करते. शौनकजी, आम्हांलाखात्री आहे जिथे आपल्यासारखे गुरु आहेत, तिथे शिष्योत्तम तयार होत राहतीलच. आपण आपल्या स्वरसाधेनेने अवघ्या संगीत विश्वाला असंच समृद्ध करत राहा हीच सदिच्छा
5/12
ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर - मराठी काव्यविश्वात विहार करणारा निसर्गकवी म्हणून ख्याती असलेले ना. धों. महानोर.. ‘रानातल्या कविता...या काव्यसंग्रहाने कवितेच्या अंगणात बाग फुलवली. रान-शिवाराची चैतन्याने ओथंबलेली कविता म्हणून तिचा सर्वत्र बोलबाला झाला. समकाळातील कवी-कवयित्रींनी तिच्याकडे अवाक् होऊन पाहिले. एवढेच नव्हे, कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर आणि कुसुमाग्रज यांसारख्या कवींनी तिचे भरभरून कौतुक केले. पळसखेड नावाच्या खेड्यात एका गरीब कुटुंबातला त्यांचा जन्म. मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्याच काळात त्यांनी अफाट वाचन केलं. मुळातच कवीतेची गोडी असल्याने कवीतेचा कोंब मनात रुजला आणि कवीता कधी स्फुरली हे कळलंच नाही. एक अद्भुत आणि नवखं जग अनेख्या शैलीत कवीतेच्या स्वरुपात जेव्हा लोकांसमोर आलं तेव्हा रसिक वाचकांना त्यातलं शृंगाराचं तरल आणि उत्कट रूप भावलं. आपल्या रांगड्या आवाजात लोकगीतांच्या लयीवर ना.धों. महानोर कवितावाचन करु लागले ज्याला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. कवीतासंग्रहासोबत,गंधारी नावाची कादंबरी, गावातल्या गोष्टी नावाचा कथासंग्रह तसंच शेतीवरची, जलसंवर्धनावरची अनेक पुस्तकं ही त्यांची साहित्यसंपदा. जैत रे जैतची गीतं त्यांच्या कारकीर्दीतलं आणखी एक मानाचं पान. एक होता विदूषक, सर्जाच्या गीतांनीही रसिकांच्या मनात रुंजी घातली. ‘पानझड’ या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार तसंच जनस्थान पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. या पद्मश्रीप्राप्त निसर्गकवीला एबीपी माझाचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन.
6/12
अभिनेते डॉ. मोहन आगाशे -एखाद्या ग्रीक पुतळ्याची आठवण व्हावी, असा चेहरा. देखणा, चारचौघांत उठून दिसेल असा. टोकदार नाक, आणि अतिशय बोलके डोळे. डॉ. मोहन.. आगाशे. मराठी रंगभूमीवरचे भीष्म पितामह, काटकोन त्रिकोणातला ९० अंशाचा कोन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठं आभिनेते.. बी. जे. मेडिकल महाविद्यालयातून मानसशास्त्रज्ञ म्हणून पदवी मिळवल्यानंतर तिथेच नोकरी करणाऱ्या आगाशे यांच्या रक्तात जन्मत:च नाटक भिनलेलं. उत्पल दत्त यांच्यासारख्या नटाचे नाटक परीक्षेच्या आदल्या दिवशी पाहात बसण्याचे धाडस करणाऱ्या या कलावंताला आयुष्यातली पहिली ओळख मिळाली ती ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकातील नाना फडणवीसाच्या भूमिकेमुळे. सतीश आळेकरांच्या ‘बेगमबर्वे’तल्या शामराव टांगेवाल्याच्या भूमिकेने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. सत्यजित राय, श्याम बेनेगल, गौतम घोष,मीरा नायर, जब्बार पटेल यांच्यासारख्या दिग्गजांप्रमाणेच अनेक नावजलेल्या व्यावसायिक दिग्दर्शक आणि निर्मात्यांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आगाशेंच्या कारकीर्दीतील पुढचे महत्त्वाचे पाऊल म्हणजे बर्लिनमधील ‘ग्रिप्स थिएटर’ त्यांनी मराठीत आणले. बालरंगभूमीकडे अभिनव दृष्टीने पाहणारी आणि अत्यंत वेगळ्या पद्ध्तीने मुलांची नाटके साकारणारी ‘ग्रिप्स’ ही नाट्य चळवळ. कितीही छोटी भूमिका असली, तरीही त्यात चमक आणणाऱ्या मोहन आगाशे यांना मराठी नाट्यपरिषदेने जीनवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित तर केलंय पण १९९० साली भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला आहे. नाट्य व सिनेवर्तुळातील एक लोहचुंबक मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठ आभिनेत्याला एबीपी माझाचा मानाचा मुजरा
7/12
अफरोझ शाह - वर्सोव्याचा समुद्र किनारा आज स्वच्छ दिसतोय.पण तीन वर्षांपूर्वी याच समुद्र किनाऱ्याला कचऱ्याने गिळंकृत केल होतं. कचरा, प्लास्टिक याच्या स्वच्छतेची जबाबदारी घेणार कोण? अशात मुंबईतील सागरी किनाऱ्यांवर होणाऱ्या प्रदूषणाला आपणच जबाबदार असल्याचं वर्सोवाचे रहिवासी अफरोझ शहा यांच्या लक्षात आलं. पेशाने वकील असलेल्या अफरोझ यांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या स्थानिकांसोबत तीन वर्षांपूर्वी वर्सोवा किनारपट्टीवरचा कचरा हटवण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 40 लाख किलोहून अधिक कचरा त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढला आहे. आणि याची दखल संयुक्त राष्ट्राने देखील घेतली आहे. फक्त कचरा उचलणं इतकचं ध्येय न ठेवता या किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांचे विचार त्यांनी बदलले. याचं फळ त्यांना मिळालं तेमार्च 2018 साली ऑलिव्ह टर्टलची पिल्लं समुद्र किनारी आढळली तेव्हा .. अशा या सजग मुंबईकराला आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी एबीपी माझाची साथ आणि खूप शुभेच्छा
8/12
महाराष्ट्रात किंवा देशातच नव्हे, तर जगभरात मराठीचा झेंडा फडकवणाऱ्या मराठमोळ्या रत्नांना एबीपी माझाने 'माझा सन्मान' पुरस्कार देऊन गौरवलं. 'एबीपी माझा'च्या 'माझा सन्मान' पुरस्कार सोहळ्यात समाजसेवा, कला, क्रीडा, विज्ञान, उद्योग क्षेत्रातील दहा दिग्गजांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दहा दिग्गजांना 'माझा सन्मान' प्रदान करण्यात आला. माझा सन्मान पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण तुम्हाला शनिवार 8 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता 'एबीपी माझा'वर पाहता येणार आहे. तर या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण रविवार 9 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता 'एबीपी माझा'वर होईल.
9/12
उद्योजक प्रमोद चौधरी - जैवतंत्रज्ञान आणि जैवइंधन क्षेत्र म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहाते ती ‘प्राज इंडस्ट्रीज’.. पर्यावरणाच्या असमतोलानं जे आव्हान जागतिक पातळीवर निर्माण झालं आहे. त्याकडे सकारात्मक दृष्टीने आणि संधी म्हणून पाहत, प्राज इंडस्ट्रीजची मुहुर्तमेढ रोवली ती प्रमोद चौधरी यांनी. प्रमोद चौधरी यांचे वडील कृषी अधिकारी आणि आई शिक्षिका असं मध्यमवर्गीय कुटुंबातला जन्म. आयआयटीतून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरीच्या माध्यामातून अनुभवाचं गाठोडं सोबत बांधलं आणि व्यवसाय करण्याच्या इच्छेच्या दिशेने मार्गक्रमण केलं. मंदीच्या काळात न डगमगता त्याकडे परत उभारण्याची संधी म्हणून त्यांनी पाहिलं आणि संधीचं सोनं केलं. जगभरात ऊर्जा क्षेत्रात उलथापालथ होत असताना, वातावरणात इथेनॉलसारख्या ऊर्जास्नेही घटकावर काम करून त्यावर उद्योग उभारण्याचे ‘प्राज’चे कार्य अत्यंत महत्त्वाचं ठरतं. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि जिद्द यामुळेच त्यांनी उभा केलेला प्राज इंडस्ट्रीजचा डोलारा आजही खंबीरपणे आपले पाय रोवून उभा आहे. ‘तर असं झालं…’ म्हणत वातावरणात इथेनॉलचे महत्त्व अधोरेखित तर केलंचं शिवाय नवउद्यमींना नीतीमंत श्रीमंत होण्याची प्रेरणा आपण दिलीत. आपल्या लढण्याच्या उर्जेमुळे आज उद्योगक्षेत्रात आपण अढळ स्थान निर्माण केलं आहात, आपल्या या कार्याला एबीपी माझाचा मानाचा मुजरा…
10/12
दिग्दर्शक मधुर भंडारकर - चार भिंतीआडचं नागडं/भीषण वास्तव तितक्याच प्रखरतेनं पडद्यावर मांडणारा अवलिया दिग्दर्शक… पद्मश्री मधुर भंडारकर. या चार भिंती कधी जेलच्या होत्या, कधी फॅशन विश्वाच्या तर कधी कॉर्पोरेट जगताच्या… रियल जगाला रिलमधून जगासमोर आणताना मधुर यांनी कसलाच विधीनिषेध बाळगला नाही. जे आहे, जसं आहे तसंच आणि तितक्याच भेदकपणे त्यांनी साकारलं. चांदनी बार, पेज थ्री, जेल, फॅशन, कॉर्पोरेट, हिरॉ़ईन, ट्रॅफिक सिग्नल हे फक्त सिनेमे नाहीत तर मधुर यांनी थेट व्यवस्थेला विचारलेले टोकदार प्रश्न आहेत. मधुरच्या याच कामाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. आत्तापर्यंत चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर त्यांनी नाव कोरलं आहे. व्हिडीओ कॅसेट लायब्ररीत काम करणारा एक डिलिव्हरी बॉय ते स्वत:च्याच सिनेमांची लायब्ररी बनवण्यापर्यंतचा मधुर यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. अशा या प्रतिभावंत लेखक, निर्माता आणि दिग्दर्शकाला एबीपी माझाचा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
11/12
डॉ. अविनाश पोळ - साधारण वीस वर्षांपूर्वी साताऱ्यातल्या बेबलेवाडीपासून त्यांचं काम सुरु झालं, जलसंधारण, ग्राम स्वच्छता, तंटामुक्ती, श्रमदानाचं महत्व त्यांनी लोकांना पटवून दिलं. डॉ. अविनाश पोळ..साध्या सोप्या सहज भाषेत संवाद साधणं ही त्यांची हातोटी. फक्त बोलायचं नाही तर थेट उतरुन काम करायचं ही त्यांची खासियत. त्याचीच एक झलक म्हणजे अजिंक्यतारा किल्ल्याचा झालेला कायापालट. अनेक वर्ष दुर्लक्षित उजाड राहिलेल्या या ऐतिहासिक किल्ल्यावर आज वनराई नटलीय, 3300 फूट उंचीवरच्या जलसाठ्यात पुन्हा पाणी खेळू लागलंय. याचं बरंचसं श्रेय सतत तीन वर्ष रोज दोन तास तिथे नेटाने काम करणाऱ्या डॉक्टर आणि त्यांच्या मित्रपरिवाराला दिलं जातं. आपण दुष्काळाशी दोन हात करु शकतो हा विश्वास हजारो गावकऱ्यांमध्ये निर्माण करण्यात आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनचा जेव्हढा वाटा आहे, तितकाच डॉक्टरांच्या नियोजनाचा देखील आहे. लोकसहभागातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी झटणाऱ्या या पाण्याच्या डॉक्टरला माझाचा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा
12/12
अभिनेत्री अमृता खानविलकर - गोलमाल सिनेमातून तिने सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकलं आणि मग हा चेहरा सतत झळकत राहिला. अमृता खानविलकर.. फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही तिचा वावर कायम राहिला. राम गोपाल वर्मांचा फुँक, अजय देवगणचा हिम्मतवाला ते अगदी अलिकडचा मेघना गुलझार यांचा राझी अशा सिनेमांमध्ये अमृताने आपली छाप पाडली. ग्लॅमरस चेहरा आणि अंगी असलेली नृत्यकला या दोन जमेच्या बाजू असल्या, तरी तिच्यातली अभिनेत्री नेहमीच चाहत्यांना भावली. केवळ सिनेमा क्षेत्रातच नाही तर टेलिव्हिजन आणि आता डिजीटल मिडियावर देखील अमृता आपल्या अभिनयने छाप पाडतेय. घरातून अभिनय किंवा नृत्याचा वारसा मिळालेला नसताना अमृताने घेतलेली ही झेप नक्कीच कौतुकास्पद आहे. तिच्या पुढील देदीप्यमान वाटचालीसाठी एबीपी माझाच्या शुभेच्छा.