KKR vs SRH : हैदराबादची भक्कम फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काव्या मारनच्या संघाची पराभवाची हॅटट्रिक, केकेआरचा घरच्या ग्राउंडवर दणदणीत विजय
KKR vs SRH : कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायजर्स हैदराबादला 80 धावांनी पराभूत केलं. काव्या मारनच्या हैदराबादचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.

कोलकाता : काव्या मारनच्या सनरायजर्स हैदराबादनं आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध स्वीकारला. कोलकाता नाईट रायडर्सनं सलग तिसऱ्या सामन्यात एसआरएचचा पराभव केला. सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. केकेआरच्या फलंदाजांनी 200 धावा केल्या. तर, हैदराबादचा संघ 120 धावांवर बाद झाला. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन लवकर बाद झाल्यानंतर हैदराबादची फलंदाजी गडगडली. केकेआरकडून वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी दमदार गोलंदाजी केली. यामुळं केकेआरनं 80 धावांनी विजय मिळवला.
फलंदाजांनंतर गोलंदाजांनी करुन दाखवलं
कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांनी 10 विकेट घेत संघाला यश मिळवून दिलं. केकेआरकडून वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांनी सनरायजर्स हैदराबादच्या डावाच्या सुरुवातीलाच दणका दिला. हैदराबादच्या तीन विकेट 10 धावा होण्याअगोदर गेल्या होत्या. वैभव अरोरानं पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर धोकादायक ट्रेविस हेडला बाद केलं. त्यानंतर वैभव अरोरानं आणखी दोन विकेट घेतल्या. ट्रेविस हेडनंतर अरोरानं पॅट कमिन्सची महत्त्वाची विकेट घेतली. हर्षित राणानं अभिषेक शर्माला बाद केलं. यामुळं सुरु झालेली डावाची पडझड कमी झाली नाही.
सनरायजर्सचे तारे जमिनीवर
कोलकाता नाईट रायडर्सचा विरुद्ध सनरायजर्सला सर्वात मोठा पराभव स्वीकारावा लागला. केकेआर विरुद्ध सनरायजर्स हैदराबादची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. सनरायजर्स हैदराबादनं आतापर्यंत यंदाच्या आयपीएलमध्ये चार सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. गेल्या वर्षी आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या हैदराबादची कामगिरी यंदा समाधानकारक नाही. त्यामुळं यावेळी हैदराबाद कमबॅक करणार का ते पाहावं लागेल.
केकेआरचे फलंदाज अजिंक्य रहाणे, अंगकृष रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग यांनी केलेल्या धावसंख्येच्या जोरावार कोलकाताचा संघ 200 धावांपर्यंत जाऊन पोहोचला. या धावांचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदरबादचा संघ 120 धावांवर बाद झाला. त्यामुळं एक प्रकारे सनरायजर्स हैदराबादचे तारे जमिनीवर आल्याचं बोललं जातंय.
हैदराबादवर विजय मिळाल्यानंतर केकेआरच्या संघानं गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर, सनरायजर्स हैदराबादचा संघ शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पंजाब किंग्जचा समावेश आहे. त्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स हे संघ आहेत. दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्त्व अक्षर पटेल करतोय तर, पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर आहे.
इतर बातम्या :
























