Badlapur School: पोलिसांची नेत्रदीपक कामगिरी, पीडित चिमुकलीसोबत गर्भवती आईला 12 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं: जितेंद्र आव्हाड
Crime news: बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर प्रचंड रोष व्यक्त होत आहे. याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप होत आहे. जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांना फटकारले
ठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन सध्या राज्यभरात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. बदलापूरमधील नागरिकांनी मंगळवारी जोरदार आंदोलन करत मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली होती. यावेळी संतप्त आंदोलकांनी रेल्वे पोलिसांच्या पथकावर जोरदार दगडफेक केली होती. या सगळ्या घडामोडींनंतर बदलापूरमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूर पोलिसांवर निशाणा साधला आहे. त्यांन एक ट्विट करत पोलिसांवर टीकास्त्र डागले आहे.
बदलापूर पोलिसांची नेत्रदीपक कामगिरी वाचा. बदलापूर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या जवळपास 300 हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले. काल मध्यरात्री चाळीस किंवा अधिक लोकांना अटक केली आहे. सर्वात महत्वाचे हे तेच बदलापूरचे पोलीस आहेत ज्यांनी अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीच्या गर्भवती आईला जवळपास बारा तास पोलीस स्टेशनमध्ये चिमुकली सोबत बसवून ठेवले. हे तेच बदलापुरचे पोलीस आहेत जे सत्ताधारी गटाच्या नेत्याने महिला पत्रकारावर अश्लाघ्य टीका केली तरी तिची F.I.R घेईनात ती पत्रकार काल चार तास पोलीस स्टेशनला असूनही तक्रार घेतली नाही, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
पोलिसांकडून विकृत प्रकार दाबण्याचा प्रयत्न; आव्हाडांचा आरोप
कालच्या बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्या 300 जणांवर पोलिसांनी नाहक गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी अनेक जणांना रात्रीच अटकही केली आहे. एकीकडे पोलिसांनीच हा विकृत प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे साहजिकच जनता चिडणार; वर त्याच जनतेला अटकही करणार, हा कुठला न्याय? बदलापुरात जे काही झाले ते पोलीस आणि शाळेची चूक आहे. त्या कन्यांचे झालेले शारीरीक शोषण आणि या पुढे त्यांना होणारा मानसिक त्रास, याची सरकार भरपाई करणार आहे का? निष्कारण आगीत तेल ओतू नका. या प्रकरणामुळे आता महाराष्ट्र बंद करावा लागेल, अशी वेळ आली आहे. सरकारने आता तरी शहाणे व्हावे. कळव्यातही एका दिव्यांग (गतिमंद) मुलीवर असाच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. कायद्याची भीतीच राहिलेली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र बंद होऊ नये, अशी आपली इच्छा असेल तर बदलापूरचे प्रकरण संवेदनशीलपणे सांभाळा; तिथे पोलिसी अतिरेक झाला तर मात्र वेगळा विचार करावा लागेल, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा
10 वाजल्यानंतर बाहेरुन लोंढा आला अन्... बदलापूर आंदोलनाबात चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप