(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pcmc News : पुण्यात हुल्लडबाजांकडून 20 वाहनांची तोडफोड; पोलिसांची नजर चुकवत आरोपी पसार
पिंपरी-चिंचवडमध्ये हुल्लडबाजांनी 22 वाहनांची तोडफोड केली आहे. रिक्षातून आलेल्या चौघांनी दगड, सिमेंट ब्लॉकने परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या तर घराबाहेर उभ्या असणाऱ्या दुचाकींची मोडतोड केली.
Pcmc News : पिंपरी चिंचवडमध्ये नव्या (Pcmc News) वर्षाचा पहिला दिवस उजडण्यापूर्वीच गुन्हेगारांनी तोंड वर काढलं आहे. रात्रभर पार्ट्या रंगणार असल्याने शहरभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. अशातही हुल्लडबाजांनी 22 वाहनांची तोडफोड केली आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना वाकड पोलिसांच्या हद्दीत घडली. रिक्षातून आलेल्या चौघांनी दगड, सिमेंट ब्लॉकने परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या तर घराबाहेर उभ्या असणाऱ्या दुचाकींची मोडतोड केली. विशेष म्हणजे पोलिसांच्या बंदोबस्तातून ते आरामात पसार झाले.
थर्टी फर्स्ट असल्याने अनेक लोक नवीन वर्षाच्या स्वागतात मग्न होते. कोणत्याही परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्या सगळ्यांची नजर चूकवून रिक्षातून आलेल्या 4 ते 5 हुल्लडबाजांकडून तब्बल 20 हून अधिक दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली.
गाड्या फोडल्या अन् पळ काढला.
रात्रीच्या वेळी ही घटना घडली. वाकड पोलिसांंनी या टोळीला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र या टोळीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला. या सगळ्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करत आहे. त्या फुटेजवरुन या टोळीचा शोध घेत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये अशा अनेक टोळ्या सक्रिय आहे. रोज नवे गुन्हे आणि हाणामारीच्या घटना समोर येतात. या घटनेमुळे पिंपरीमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांसमोर मोठं आव्हान
पिंपरी -चिंचवडमध्ये गुन्हेगारीत वाढ झाली आहे. अनेक टोळ्यादेखील सक्रिय आहेत. त्यामुळे या टोळ्यांना जेरबंद करणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. यंदा दोन वर्षांनी नवं वर्ष जल्लोषात साजरं झालं. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पिंपरीतदेखील हजारो पोलीस अनुचित घटना टाळण्यासाठी तैनात होते. अशा काही घटना सोडल्या तर शहरात नव्या वर्षाचं उत्साहानं स्वागत करण्यात आलं.
पिंपरीतही कोयता गॅंगची दहशत
राहटणी आणि पिंपळे सौदागर परिसरात तब्बल 20 हून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. हुल्लडबाजांकडून कोयते आणि सिमेंटच्या गट्टूनी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. पुण्यासोबतच आता पिंपरीतही कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. कोयता गॅंगच्या शहरातील घटना वाढत आहे. दोन दिवसांपूर्वीच सिंहगड रोडवर या कोयता गॅंगने दहशत निर्माण केली होती. दारु पिऊन रस्त्यावरील लोकांना धमकावत होते. पोलिसांनी दोघांना फिल्मी स्टाईल पाठलाग करुन जेरबंद केलं होतं.