Pune Accident: नगर - कल्याण मार्गावर भीषण अपघात! पाच शेतमजुरांना चिरडले, तिघांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरू
Pune Accident: गाडीचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे : कल्याण-नगर (Kalyan Nagar Highway) महामार्गावरील डिंगोरे हद्दीत दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुलालगत भरधाव येणाऱ्या कारने परप्रांतीय पाच मजुरांना चिरडल्याची घटना (Accident News) घडली आहे. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून एकाचा उपाचरादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण शेतमजुर असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याच्या शेतावर शेतामजूर म्हणून ते कामाला आले होते अशी माहिती समोर आली आहे. जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत झालेल्या तिघांची नावे असून आज रात्री साधारण आठ ते सव्वा आठव्या सुमारास हा अपघात झाला आहे. गाडीचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर - कल्याण महामार्गावर दोन ते तीन दिवसांपूर्वीच डीगोरे परिसरात पाच शेतमजूर मध्यप्रदेश येथून आले होते. मात्र आज संध्याकाळी शेतातील कामे उरकून पायी घरी जात असताना महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकी क्र एम एच 12 व्ही क्यू 8909 ही भरधाव वेगात होती. त्या गाडीने या पाच मजुरांना जोरात धडक दिली त्यात ते चिरडले गेले त्यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. हे सर्वजण घरी जात असताना ही दुर्देवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील कारवाई करत तिथे पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे.
गेल्या चार-पाच दिवसात नगर - कल्याण महामार्गावर वारंवार अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे प्रशासनाने गावागावालगत गतिरोधक बसवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कल्याण-अहमदनगर महामार्गावर गेल्या काही वर्षांत वर्दळ वाढली आहे. मात्र याच महामार्गाची गेल्या काही वर्षांपासून दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे.बेशिस्तपणे वाहतुकीमुळे अपघातांची मालिकाच सुरू आहे.
हे ही वाचा :