मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Sharad Pawar Meet PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली होती.
Sharad Pawar Meet PM Modi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) भेटीसाठी पोहोचले आहेत. संसदभवन (Parliament House) परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांनी भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. मराठी साहित्य संमेलनाचं (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) निमंत्रण देण्यासाठी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेल्याची माहिती मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आमच्यात चर्चा झाली, त्याव्यतिरिक्त आमच्यात काहीही चर्चा झालेली नाही.
यापूर्वी शरद पवारांनी मोदींना लिहिलेलं पत्र
98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडून तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना संमेलन उद्घाटनासाठी निमंत्रणाचं पत्र पाठवण्यात आलेलं. तालकटोरा येथे 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या संमेलनाचं उद्घाटन करण्यासाठी 21 फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. दुपारी 4 वाजता हा कार्यक्रम पार पडणार असून याच कार्यक्रमाचं आमंत्रण पंतप्रधान मोदींना देण्यात आलं आहे. 21 फेब्रुवारीला शक्य नसल्यास 20 फेब्रुवारीच्या संध्याकाळी वेळ राखून ठेवावा, अशीही विनंती पत्राद्वारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, संमेलनाचे संयोजक सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी केली होती. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनीही मराठी साहित्य संमेलनाची परंपरा नमूद करत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मोदी यांनी करावं, अशी विनंती केली आहे.
दरम्यान, जर सर्वांच्या विनंतीला मान देऊन पंतप्रधान मराठी साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहिले, तर 70 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. यापूर्वी 70 वर्षापूर्वी दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाला काकासाहेब गाडगीळ स्वागताध्यक्ष होते आणि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उद्घाटक होते. तीच परंपरा याही वेळी कायम राहावी, असा प्रयत्न असल्याचं नहार म्हणाले. साहित्य संमेलनस्थळाला छत्रपती शिवाजी महाराज नगरी असं नाव दिलं जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली होती.