'मोठ्ठ्या ताई, तुम्ही आता आयुष्यभर बोटं मोडत बसा'; लाडक्या बहिणींना सल्ला देणाऱ्या सुप्रिया सुळेंना चित्रा वाघांनी झापलं!
Chitra Wagh on Supriya Sule : माझ्या बहिणींना विनंती करते, तुम्ही पटकन बँकेतून पैसे काढून घ्या. कारण भारतीय जनता पक्षाचे दोन-दोन लोक म्हणत आहेत की, आम्ही पैसे परत घेऊ, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.
Chitra Wagh on Supriya Sule : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (CM Ladki Bahin Yojana) पहिला हफ्ता खात्यामध्ये जमा झाला आहे. रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan 2024) पूर्वी लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारने (Maharashtra Government) केली होती. मात्र, प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day ) पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले आहेत. यावरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींनी पटकन बँक खात्यातून काढून घ्यावे, असे म्हणत सरकारला डिवचले. आता यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं की, माझ्या बहिणींना विनंती करते, तुम्ही पटकन बँकेतून पैसे काढून घ्या. कारण का तर भारतीय जनता पक्षाचे दोन-दोन लोक म्हणत आहेत की, आम्ही पैसे परत घेऊ. ज्यांच्या अकाऊंटला पैसे आले, अशा सर्व महिला भगिनींना माझी विनंती आहे की, पैसे काढून घ्या. या सरकारचे काही सांगता येत नाही, अशी टीका त्यांनी केली होती.
बारामतीच्या मोठ्ठ्या ताईंची पोटदुखी पुन्हा समोर
सुप्रिया सुळेंच्या टीकेवर चित्रा वाघ म्हणाल्या की, महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले आणि बारामतीच्या मोठ्ठ्या ताईंची पोटदुखी पुन्हा समोर आली. स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्याने केलेले बघवत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. मोठ्ठ्या ताई तुम्ही आयुष्यभर बोटं मोडत बसा. या योजनेबाबत त्यांनीच काय तर महाबिगाडीच्या नेत्यांनी अपप्रचार सुरु केला आहे. खरे तर, या योजनेचे खुल्या दिलाने त्यांनी स्वागत करायला हवे होते. मात्र, त्यांनी आपली विकृत मनोवृत्ती दाखवून दिली.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वचनाला पक्के
पक्षात नसलेला कुणीतरी एखादा आमदार काहीतरी गमतीने बोलला, तर त्याचे भांडवल करण्याचा उद्योग या पाताळयंत्री विरोधकांनी सुरु केला आहे. महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होऊ लागले आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तुमचे भाऊ वचनाला पक्के आहेत. हे त्यांनी वचनपूर्ती करत दाखवून दिले आहे. माझी राज्यातील तमाम महिला वर्गाला विनंती आहे, अपप्रचार करणाऱ्या या मोठ्ठ्या ताईंपासून आणि त्यांच्या टोळक्यांपासून सावध राहा, असेही त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
Supriya Sule : रक्षाबंधनाला अजितदादांना राखी बांधणार का? सुप्रिया सुळेंनी एका शब्दात विषय संपवला