(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता लढायचं आणि जिंकायचं! आठ दिवसांचे अनुष्ठान करत शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभेच्या रिंगणात
Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज हे नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र सध्या ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी आठ दिवसांचे अनुष्ठान केले.
Shantigiri Maharaj : एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. तर दुसरीकडे शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) देखील नाशिकमधून (Nashik) निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
शांतीगिरी महाराज हे नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून (Mahayuti) निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र सध्या ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. यासाठी शांतीगिरी महाराजांनी आठ दिवसांचे अनुष्ठानदेखील केले आहे. या अनुष्ठानानंतर आता शांतीगिरी महाराज निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहेत.
अनुष्ठानाची सांगता करत शांतिगिरी महाराजांचं त्र्यंबकला मोठं शक्तीप्रदर्शन
या अनुष्ठानाची त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) आज सांगता करताना शांतीगिरी महाराजांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. सकाळी त्र्यंबकेश्वर शहरातून हजारो भक्त परिवाराच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या तालावर आणि हातात भगवे झेंडे घेत यात्रा काढण्यात आली. यावेळी भक्तांच्या हाती 'आता लढायचं आणि जिंकायचं', 'खूप केलं नेत्यांसाठी यंदा लढू बाबांसाठी' अशा आशयाचे फलक बघायला मिळाले. या फलकाची आता नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
PM मोदींनीही याआधी केलंय अनुष्ठान
देशामध्ये होऊ घातलेली लोकसभा निवडणूक शांततेत आणि यशस्वीरित्या पार पाडावी यासाठी महाराजांनी हे अनुष्ठान केल्याची माहिती बाबाजी परिवाराकडून देण्यात आली आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केदारनाथला अनुष्ठान करून निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती. आता नाशिकमधून शांतीगिरी महाराजांनी देखील अनुष्ठान करत नाशिक लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे.
शांतीगिरी महाराजांचे अनेक उमेदवारांनी निवडणुकीसाठी घेतले आशीर्वाद
शांतीगिरी महाराजांचा छत्रपती संभाजीनगरसह नाशिकमध्ये मोठा भक्तपरिवार आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात बाबांचा भक्तपरिवार असल्याने तसेच त्यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील असल्याने त्यांचा नाशिकमध्ये दांडगा संपर्क आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभेचे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre), दिंडोरी लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti pawar) तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांच्यासह अनेक उमेदवारांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेत आशीर्वाद घेतले होते. शांतीगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार नाशिकमध्ये आहे. ते जर अपक्ष निवडणूक लढले तर महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नक्कीच तगडे आव्हान देऊ शकतात.
आणखी वाचा