Nashik Loksabha : प्रफुल्ल पटेल म्हणाले, शिंदेंनी नाशिकची जागा सोडावी, संजय शिरसाट म्हणतात, त्या जागेसाठी आमचा आग्रह नव्हे हट्ट!
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकची जागा आम्ही नक्कीच मागतोय, असे वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. यावरून संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi)शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) याने उमेदवारी दिली आहे. मात्र महायुतीत (Mahayuti) नाशिकच्या जागेवरून तिढा अद्याप कायम आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी नाशिकची जागा आम्ही नक्कीच मागतोय, असे वक्तव्य एबीपी माझाशी बोलताना केले होते. यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिक येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र श्रीकांत शिंदेंच्या घोषणेनंतर महायुतीकडून जोरदार विरोध करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. तसेच भाजपकडून देखील या जागेवर दावा करण्यात आल्याने नाशिकचा तिढा अद्याप कायम आहे.
नाशिकची जागा आम्ही नक्कीच मागतोय - प्रफुल्ल पटेल
नाशिक लोकसभेच्या जागेबाबत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, नाशिक जरी एकनाथ शिंदे यांची जागा आहे. तरी त्यांनी एक जागा कमी घेण्यास मान्य केले आहे. भाजपने (BJP) तयारी दाखवली तर आम्हाला बरं वाटेल. नाशिकमध्ये उमेदवार कोण राहील, याची चर्चा झालेली नाही. एकदा जागा निश्चित झाली की, उमेदवारीबाबत चर्चा करू. काही लोकं मात्र जागा कुणाची हे निश्चित होण्याच्या आधीच उड्या मारायला लागतात. कार्यक्रम करून टाकू अशा धमक्या देतात. नाशिकची जागा आम्ही नक्कीच मागतोय. तिथे कोणाला उभे करायचे तो आमचा पक्षांतर्गत विषय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी हा आग्रह नव्हे हट्ट - संजय शिरसाट
तर संजय शिरसाट यांनी म्हटले आहे की, नाशिकची जागा ही शिवसेनेची (Shiv Sena) आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे. ती जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह नाही तर हट्ट सुद्धा आहे. त्यामुळे आम्ही नाशिकची जागा मिळवणारच, यामध्ये शंका नाही. हा आता आमच्या सुधा प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला आहे. शिंदे साहेबांनी सगळ्या जागा सोडायचे मान्य केले का? शिरूरची जागा तुम्हाला दिली ना. आता महायुतीमध्ये तिढा निर्माण होऊ नये म्हणून आम्ही विनंती करतो की, जास्त आग्रह न करता ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्हाला लढवण्याचा अधिकार आहे. त्या जागा आम्हालाच मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे. आता नाशिकची जागा नेमकी कुणाला मिळणार? नाशिकमधून महायुतीचा उमेदवार कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकली राज ठाकरेंची छबी, मनसे आणि गोडसेंचं 'असं' आहे विशेष नातं