Pahine Waterfall : पहिने धबधबा परिसरात हुल्लडबाजांवर कारवाईचा बडगा, नाशिक ग्रामीण पोलीस अखेर ॲक्शन मोडवर
Nashik Police : भावली धरण आणि पहिने धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्यामुळे हुल्लडबाज पर्यटकांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात निसर्गरम्य वातावरणात फिरण्यासाठी पर्यटकांची (Tourists) मोठी गर्दी होत असते. यंदा भावली धरण धबधबा (Bhavali Dam Waterfall) आणि पहिने धबधब्यावर (Pahine Waterfall) पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्यामुळे हुल्लडबाज पर्यटकांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) मोठी कारवाई केली आहे.
पुण्यातील लोणावळा (lonavala) येथे पावसाळी पर्यटनादरम्यान एका कुटूंबातील पाच जणांचा पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात कुठलही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पावसाळी पर्यटनाच्या (Monsoon Tourism) ठिकाणी नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) निर्बंध जारी करण्यात आले होती. मात्र नाशिकच्या भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे.
90 जणांवर कारवाईचा बडगा
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथे पोलिसांकडून हुल्लडबाज पर्यटकांची तपासणी करणायत आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 90 जणांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून 73 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. इगतपुरीच्या भावली धबधब्याशेजारी आणि त्र्यंबकेश्वरच्या पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी विकेंडला पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदीचा निर्णय घेतला आहे.
भावली धरण परिसरात हुल्लडबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल
शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी भावली धरणासह त्र्यंबकेश्वर परिसरातील धबधब्यांवर पर्यटकांची वर्दळ होत आहे. काही दिवसांपूर्वी भावली धरण परिसरात हुल्लडबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या प्रतिबंधित आदेशालाच पर्यटकांनी केराची टोपली दाखवल्याचे दिसून आले होते. नाशिक पोलीस यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता अखेर नाशिक ग्रामीण पोलिसांनी हुल्लडबाजांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पर्यटन स्थळांवर पोलिसांचे पथक तैनात
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणे, जीव धोक्यात घालून निसरड्या वाटेवर धबधब्यांवर गर्दी करणे, यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर निर्बंध लावत दुर्घटना घडू नये, यासाठी पोलिसांचे पथक पर्यटन स्थळांवर तैनात करणार असल्याचे सांगितले आहे.
आणखी वाचा