Nashik Sinner Accident: तुळजाभवानीचं दर्शन अवघ्या काही अंतरावर होतं, मात्र.... सिन्नरच्या तीन मित्रांवर काळाचा घाला...
Nashik Sinner Accident : नाशिक (Nashik) जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली असून देव दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Nashik Sinner Accident News: नाशिक (Nashik) जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली असून आई तुळजाभवानीच्या (Tuljabhavani) दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची (major Accident) घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता सुमारास तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी नजीक हा अपघात झाला आहे. तर या अपघातात पाच जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सिन्नर (Sinner) तालुक्यातील चास गावातील काही मित्र सोमवारी देवदर्शनासाठी गेलेले होते. जवळपास नऊ जणांचा हा ग्रुप गावातून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाला होता. मात्र या मित्रांवर काळाने घाला घातला आहे. देवदर्शनासाठी जात असताना सोलापूर-तुळजापूर येथील महामार्गावरील तामलवाडी परिसरात चार चाकी गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात तीन मित्रांचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या अपघातात पाच गंभीर जखमी झाले आहेत मंगळवारी सकाळी सात वाजता सुमारास हा अपघात झाला असून तीन तरुणांचा या अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सिन्नर तालुक्यातील चास येथील 9 तरुण खासगी जीपने सोमवारी रात्री 10 च्या दरम्यान तूळजापूरकडे रवाना झाले होते. तूळजापूर अवघे 15 मिनिटांच्या अंतरावर राहीले असतांना आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान काळाने जीपवर घाला घातला. जीपचे टायर फुटल्याने सोलापूर-तुळजापूर रोडवरील तामलवाडी हद्दीत असलेल्या कटारे स्पीनिंग मिलजवळ जीप रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन उलटली. त्यात अनिकेत बाळासाहेब भाबड, अथर्व (श्याम) शशिकांत खैरनार, निखील रामदास सानप यांचा मृत्यू झाला. तर गणेश नामदेव खैरनार, पंकज रविंद्र खैरनार, जीवन सुदीप ढाकणे, तुषार दत्तात्रय बिडगर, दिपक बिडगर हे जखमी झाले आहेत. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत जीपमधील जखमींना बाहेर काढले. यानंतर त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील जखमींना अपघात नंतर सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्या असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातात मृत्यू झालेल्या तिघांच्या पार्थिवांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तामलवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत पंचनामा करत अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री उशिरा चास येथील म्हाळुंगी नदीच्या तीरावर तीनही तरुणांवर अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेने चाससह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.