Nashik Saptshrungi Devi : मोठी बातमी! सप्तशृंगी देवी मंदिरात आता सशुल्क व्हीआयपी दर्शन, विश्वस्त मंडळाचा निर्णय
Nashik Saptshrungi Devi : सप्तशृंगगड येथील सप्तशृंगी माता मंदिर दर्शनाबाबत विश्वस्त मंडळाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Nashik Saptshrungi Devi : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील सप्तशृंगी (Saptshrungi Devi) माता मंदिर दर्शनाबाबत विश्वस्त मंडळाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या ठिकाणचे व्हीआयपी दर्शन (VIP Darshan) सशुल्क करण्यात आले आहे. येत्या सोमवारपासून प्रती व्यक्ती 100 रुपयाचा पास घेवून व्हीआयपी दर्शन घेता येणार आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगी गड (Saptshrungi Gad) हे सह्याद्री पर्वत रांगेत डोंगर पठारावर असल्याने या ठिकाणी वर्षभरात लाखो पर्यावरण, निसर्गप्रेमी तथा भाविक हजेरी लावत असतात. समुद्र सपाटीपासून सुमारे 4600 फूट उंचीवर असून लाखो भाविक हे श्री भगवती सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. तर सुट्ट्यांच्या काळात सप्तशृंग गडावर भाविकांची गर्दी हाेते. त्यामुळे मंदिर देवस्थानच्या वतीने येणाऱ्या भाविकांची गर्दी विभागली जावी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वस्त संस्थेच्या वतीने देण्यात आली.
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेने भाविकांची दर्शन व्यवस्था सुलभ होण्याकरता हा निर्णय घेतला आहे. वर्षभरातील चैत्र आणि नवरात्र उत्सव पौर्णिमा त्याचबरोबर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार इत्यादी दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते. सदर गर्दीचे नियोजन तसेच नियंत्रण होण्यासाठी अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाने प्रति व्यक्ती 100 रुपये प्रमाणे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सप्तशृंगी मातेचे सशुल्क दर्शन सुविधा सोमवार, 13 फेब्रुवारीपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. मात्र सदरची सुविधा ही भाविकांसाठी संपूर्णतः ऐच्छिक असून भाविकांना सर्वसामान्य दर्शन व्यवस्था आहे तशी उपलब्ध असेल.
दरम्यान ऐच्छिक सशुल्क व्हीआयपी दर्शन सुविधेचा लाभ घेणाऱ्या वय वर्ष 10 वर्षाच्या आतील वयोगटातील भाविकांना सदरचा पास मात्र निशुल्क असेल. मात्र सदर सशुल्क व्हीआयपी दर्शन पास हे विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात, उपकार्यालयात सकाळी 9 ते 6 वाजे दरम्यान भाविकांना उपलब्ध होणार आहेत. तर सशुल्क व्ही आय पी दर्शन पासच्या माध्यमातून भाविकांना जलद भगवती दर्शन सुविधेची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर सप्तशृंग गडावरील स्थानिक ग्रामस्थांना आधार कार्ड तपासून मोफत दर्शन सुविधा देण्याचे योजले आहे अशी माहिती विश्वस्त संस्थेमार्फत देण्यात आली आहे.
प्रसादालयाचे संपूर्ण प्रामाणिकरण
देश विदेशातून असंख्य भाविक देवदर्शनसाठी सप्तशृंगी गडावर येत असतात. ही बाब लक्षात घेऊन अन्न आणि औषध प्रशासन नाशिक यांनी सप्तशृंगी मंदिर ठिकाणी प्रसादालय प्रमाणीकरण केले आहे. त्यानंतर सप्तशृंगी देवी ट्रस्टला अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रमाणपत्र देण्यात आले आहे.