(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shirdi Sai Baba : शिर्डी साईबाबा संस्थानचा महत्वपूर्ण निर्णय, व्हीआयपी दर्शन होणार, मात्र...
Shirdi Sai Baba : शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक शिर्डीत येतात, याच पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थानने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Shirdi Sai Baba : शिर्डी (Shirdi)हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून दररोज हजारो भाविक साई चरणी लिन होतात. मात्र दर्शनाच्या नावाखाली अनेकदा भाविकांची फसवणूक होते. याच पार्श्वभूमीवर नेते मंडळींचे पीए किंवा एजंटद्वारे येणाऱ्या भाविकांना चाप लावण्यासाठी मंदिर प्रशासनाने (Saibaba Mandir) महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शिर्डी हे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. दरवर्षी साईबाबांच्या (saibaba) दर्शनासाठी लाखो भाविक शिर्डीत येतात. तसेच साईबाबांच्या श्रद्धेपोटी भाविक लाखो रूपये, सोने-चांदी तसेच इतर अनेक मौल्यवान वस्तूंचे दान करतात. अशावेळी महाराष्ट्रासह देशभरातून नागरिक शिर्डीला येत असतात. त्यामुळे या सर्वांचे दर्शन सुलभ होणे महत्वाचे आहे. मात्र अनेकदा व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली मंदिर परिसरात टोळी कार्यरत असल्याचे समोर आले होते. नेतेमंडळी किंवा लोकप्रतिनिधी हे नेहमी शिर्डीला येत असतात. त्यामुळे काही लोक लोकप्रतिनिधींच्या नावाखाली पीए असल्याचे सांगून तर भाविकांना दर्शन घडवून अनंत असल्याचा प्रकार प्रशासनांच्या निदर्शनास आल्याने निर्णय घेतला आहे.
शिर्डी संस्थानने यासंदर्भातील महत्वपूर्ण निर्णय घेतला असून लोकप्रतिनिधींचे पीए असल्याचे किंवा एजंट म्हणून वावरणाऱ्यांना चाप बसणार आहे. शिर्डीला येणाऱ्या भाविकांना साईबाबांचे व्हिआयपी दर्शन घडवून बोगस पीए आणि एजंट यांना संस्थानने धडा शिकवला आहे. आजी -माजी आमदार, खासदार तसेच विश्वस्तांच्या पीएंना मंदिर परिसरात नो एन्ट्री (MLA PA) असणार आहे. दररोज व्हिआयपी दर्शन घडवण्यासाठी मोठी गर्दी असल्याचे लक्षात घेऊन संस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी याबाबत थेट आदेशच काढले आहे.
साईभक्तांची लूट थांबणार
शिर्डी संस्थानच्या कार्यालयासह मंदिर परिसरात यापुढे आजी माजी मंत्री, आमदार, खासदार आणि विश्वस्तांच्या अधिकृत स्विय सहाय्यकाकडून संस्थानला पत्र द्यावे लागेल. तरच व्हीआयपी दर्शनासाठी सेवा संबंधित पीए किंवा इतर लोकप्रतिनिधींच्या नावे येणाऱ्या नागरिकांना मिळणार आहे. शिर्डी संस्थानच्या काही बाबी लक्षात आल्यानंतर नव्याने रुजू झालेले सीईओ राहुल जाधव यांनी हा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे साईभक्तांची लूट थांबणार आहे. भाविकांची व्हिआयपी दर्शनाच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबणार असून प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाचा गैरवापर देखील थांबणार आहे. व्हिआयपी दर्शन घडवणाऱ्या संस्थान कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. शिर्डी संस्थानकडून दर्शनसाठी व्हीआयपी सेवा आहे, त्याच्या नावावर आर्थिक लूट करणारी टोळीच संस्थानच्या आवारात फिरत असल्याच्या तक्रारी आणि काही बाबी निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.