मोठी बातमी! शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला, कुठल्याही क्षणी अटक होणार?
Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा कोल्हापूर सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे.

Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे आता कोरटकर याच्या अडचणी वाढल्या आहेत. अंतरिम जामिनाचा अर्जच फेटाळण्यात आल्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
17 मार्च रोजी सुनावणी पूर्ण, 18 मार्च रोजी निकाल
हा निर्णय देताना कोल्हापूर सत्र न्यायालयाने सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांची विनंती मान्य केली आहे. प्रशांत कोरटकर याच्या अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी 17 मार्च रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने या जामीन अर्जावरील निकाल 18 मार्चपर्यंत राखून ठेवला होता. आता हा निकाल समोर आला असून न्यायालयाने कोरटकरला अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
प्रशांत कोरटकरने काही दिवसांपूर्वी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन केला होता. हा फोन करून त्याने सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे. सोबतच यावेळी कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याचाही आरोप आहे. याच प्रकरणात कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर कोरटकरने अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने मात्र हा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता कोरटकर याला कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
न्यायालयात जोरदार युक्तिवाद
कोरटकरच्या अंतरिम जामिनावर 17 मार्च रोजी युक्तिवाद झाला होता. यावेळी इंद्रजित सावंत यांची बाजू वकील असीम सरोदे यांनी मांडली होती. सरकारी वकील विवेक शुक्ल यांनीदेखील जोरदार युक्तिवाद केला होता. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. गुन्हा दाखल होताच कोरकटर तो माझा आवाज नाही म्हणत फरार झाला, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर आरोपी प्रशांत कोरटकर याची बाजू वकील सौरभ घाग यांनी मांडली.
इंद्रजित सावंत नेमकं काय म्हणाले?
न्यायालयाने कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर इंद्रजित सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा त्याने अवमान केला होता. त्यामुळे मी व्यथित होऊन फिर्याद दिली होती. आता पोलिसांनी बिळात लपलेल्या कोरटकरला शोधून काढलं पाहिजे. त्याला कायद्यानुसार शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईल अशी आशा आहे. कोरटकरला तत्काळ अटक झाली असती तर फोनमधील अनेक गोष्टी कळाल्या असत्या. तो जर फरारी नसेल, थोडी जरी लाज शरम वाटत असेल तर त्याने पोलिसांसमोर यायला हवं. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालतं, त्यामुळे सरकार योग्य ती कारवाई करेल, असे इंद्रजित सावंत म्हणाले.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

