Nashik Shivjayanti : नाशिकच्या शिवजयंतीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, डीजेलाही बंदी, पोलिसांचं महत्वाचं आवाहन
Nashik Shivjayanti : नाशिकच्या शिवजयंतीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार असून पोलिसांनी महत्वाचे आवाहन केले आहे.
Nashik Shivjayanti : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात शिवजयंतीची जय्यत तयारी सुरु असून यंदाच्या शिवजयंतीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. त्याचबरोबर शिवजयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत डीजे वापरता येणार नाही, असा निर्णय नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शांततेत शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन पोलिसांकडून मंडळांना केले आहे.
शिवजंयती (ShivJayanti) अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली असून या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीत नाशिक शहरातील सर्व शिवजयंती आयोजक मंडळांनी उपस्थिती दर्शवली. शहरात शिवजयंतीनिमित्त आयोजित सोहळे व मिरवणुकांबाबत बैठका सुरू आहेत. सोहळा वेळेत साजरा करण्यासह डीजेचा (DJ) वापर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस ठाणेनिहाय बंदोबस्तासह मिरवणूक मार्ग व इतर नियोजन सुरू आहे. दरम्यान यंदाच्या शिवजयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत डीजे वापरता येणार नाही. त्याचबरोबर जयंती उत्सवासह मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमे-यांची (CCTV Camera) नजर ठेवली जाणार असल्याचे पोलिसांनी अधोरेखित केले आहे. विशेष शाखांसह गोपनीय विभागाचे सर्व हालचालींवर पोलिसांचे लक्ष असणार असल्याचे परिमंडळ 1 चे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी म्हटले आहे.
सत्तांतरानंतर साजरी होणारी पहिलीच शिवजयंती
राज्यातील सत्तांतर शिवसेनेचे आक्रमक झालेले ठाकरे व शिंदे गट या पार्श्वभूमीवर आठ दिवसांवर आलेल्या शिवजयंतीच्या नियोजनास पोलिस आयुक्तालयाकडून प्रारंभ झाला असून, उत्सव समित्यांच्या बैठकांनाही सुरुवात झाली आहे. पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी करण्यास सुरुवात केली असून, टवाळखोरांवर बारीक नजर ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी शिवजयंती समितीच्या बैठकीत शिवसेना ठाकरे व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना नाशिकरोड भागात घडली होती. या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले. सत्तांतरानंतर साजरी होणारी ही पहिलीच शिवजयंती असल्याने राजकीय वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांच्या माहितीनुसार सद्यस्थितीत कोणत्याही मंडळांत वाद नाहीत. मात्र, अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलीसांच्या काटेकोरपणे नियोजन करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंती निमित्त मंडळांोना अर्ज आणि परवानगी प्रक्रिया आयुक्तालयातर्फे सुरु आहे. त्यामुळे आयोजकांसह कार्यकत्यांच्या बैठका घेण्यास स्थानिक पोलिस ठाण्यांनी सुरुवात केली आहे. त्यामध्ये जयंती उत्सव नियमांत आणि कोणताही गोंधळ, वाद, टवाळखोरी न करता उत्साहात साजरा होईल, यासाठी आयोजकांनी दक्ष राहण्याचे सूचित करण्यात आले आहे. उपनगर व नाशिकरोड पोलिसांच्या हद्दीत सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
नाशिक पोलिसांचे आवाहन...
नाशिक पोलिसांकडून ठाणेनिहाय शांतता समिती, आयोजकांच्या बैठका घेण्यात येत असून टवाळखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याचबरोबर मिरवणुकीसह मंडळांमध्ये डीजेला मनाई करण्यात आली आहे. महिला व पुरुष स्वतंत्र विभाग करा, वाहतुकीला अडथळा टाळावा. मिरवणुकीसह सोहळा वेळेत करण्याचे आवाहन, मिरवणुकीसह सोहळ्यावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. शिंदे व ठाकरे गटांसह सर्व समित्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येईल. स्थानिक पोलिसांसह होमगार्ड, राज्य सुरक्षा दलाचा बंदोबस्त, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथकही तैनात राहणार आहे.